तीन मुले 47
‘बुडव या मधुरीला दूर पाण्यात. का रे आलास टेकडीवरुन? एकत्र राहिलो नाही तोच मला कंटाळलास ना? बायकांची वेडी जात. तुम्हा पुरुषांना काही नाही. तुम्हांला माया नाही, दुस-याला मनाची कल्पना नाही. तुमचे खेळ होतात; पण आमचे जीव जातात.’
‘मधुरी, चल बाहेर.’
दोघे टेकडीवर आली. जवळ जवळ बसली.
‘आणलेस पैसे?’
‘हो.’
‘किती?
‘पुरेसे. उद्या एक झोपडी विकत घेऊ.’
‘एक लहानशी झोपडी आहे. पन्नास-पाऊणशे रुपयांत मिळेल. तू किती आणलेस पैसे?’
‘दोनशे रुपये. झोपडी घेऊ, भांडीकुंडी घेऊ, संसार मांडू.’
‘मधुरी!’
‘काय?’
‘आपले लग्न लागले का?’
‘अद्याप शंका का आहे? मी माझ्या बाबांना सांगितले की, आमचे लग्न लागले. नकोत समारंभ काही. उद्यापासून संसार सुरु.’
‘हे रुपये नकोत असे मला वाटते. बुधा हिणवील. लोकांजवळ सांगेल.’
‘बुधा कोणाजवळ बोलत नाही. बिचारा घरातून बाहेरही पडत नाही. तो का परका आहे?
‘नकोतच हे रुपये. फेकून हे ते समुद्रात. दुस-याचे काही नको.’
‘मंगा, नको रे मला रडवू, मला छळू.’
‘बरे तर, राहू देत. तुम्ही बायका म्हणजे रडणा-या.’
‘तुम्ही पुरुष रडवणारे. मी दमून गेले आहे. निजते आता मी. तूही नीज.’
‘नीज. मीही निजतो.’
दोघे तेथे झोपली. प्रेमाची पासोडी पांघरुन दोघे झोपी गेली. गार वारा वहात होता. वरती तारे चमचम करीत होते. समुद्र झोपला नव्हता. तो या दोन प्रेमी जीवांना गाणी म्हणत होता. दोघांचे हात एकमेकांच्या हातात होते. प्रेमावर पोसलेले जीव. प्रेमावर जगणारे जीव. प्रेमासाठी घरेदारे, आईबाप, धनदौलत सारे सोडणारे ते जीव. घाल, वा-या, त्यांना प्रदक्षिणा घाल. समुद्रा, त्यांना गाणी गा. ता-यांनी, वरुन त्यांच्यासाठी शांतिमंत्र म्हणा. सा-या विश्वास प्रेमाचे आकर्षण आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत; चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. घाला सारे प्रेमाच्या प्रदक्षिणा घाला. अशा प्रदक्षिणा घालून जीवनात थोडाफार प्रकाश आणा. थोडीफार सहृदयता, कोमलता, मधुरता आणा. मंगा, मधुरी, तुम्ही दोघे झोपा. शांतपणे या प्रेमळ आकाशाच्या खाली झोपा. मने शांत करुन उठा.’