तीन मुले 145
एक मुशाफर
आणि काही दिवसांनी ते गलबत, सारंग गावी आले. हिंडत आले. कोणी उतरले. मंगाही उतरला. त्याच्या चेह-यात किती तरी फरक पडला होता. परदेशाची हवा, दु:खे, संकटे, निराशा यांचा परिणाम त्यांच्यावर झाला होता. त्याची दाढी वाढली होती. तो एखाद्या फकिरासारखा दिसे. साधुबोवासारखा दिसे. तो एकदम घरी थोडाच जाणार होता? म्हातारीच्या खानावळीत आधी जायचे त्याने ठरविले. सामान घेऊन तो आला. म्हातारी दारात बसली होती.
‘उतरू का तुमच्या खानावळीत?’ त्याने विचारले.
‘उतर बाबा. लांबून दिसतोस आलेला.’ ती म्हणाली.
‘हो, फार थकलो आहे. विसावा हवा आहे.’ तो म्हणाला.
‘वाटेत आजारी पडलेत वाटते?'
‘हो.’
‘येथे रहा. या गावची हवा सुंदर आहे. येथे आजारी बरे होतात. रोगी चांगले होतात.’
‘तुमच्या झोपडीत राहू?’
‘रहा.’
आणि मंगा तेथे राहिला. तो बाहेर फिरायला पडला. तो गावात शिरला. आपल्या झोपडीकडे गेला. तो तेथे त्याला काही दिसले नाही. तो तेथे उभा राहिला. कोठे आहे मधुरी? कोठे आहेत मुले? कोठे गेली सारी? जिवंत नाहीत का? एखाद्या साथीत मरण तर नाही पावली? दु:खाने मुलांना बरोबर घेऊन मधुरीने जीव तर नाही ना दिला? कोठे आहे मधुरी?
तो पुन्हा बंदरावर आला व झोपडीत खाटेवर पडला. तो अस्वस्थ होता.
‘बरे नाही का वाटत?’ म्हातारीने विचारले.
‘आजीबाई येथे तुम्ही किती दिवस आहात?’ त्याने विचारिले.
‘किती तरी वर्षे झाली. माझी खानावळ काढून चाळिसाहून अधिक वर्षे झाली.’
‘या गावची तुम्हाला सारी माहिती असेल?’
‘हो, सारी माहिती आहे.’
‘या गावात मंगा म्हणून कोणी एक तरुण मागे होता का?’
‘मंगा ना? हो, होता. त्याची बातमी तुम्ही आणिली आहे का?
‘या गावात नाही का तो?’
‘त्याची मोठी दु:खदायक कहाणी आहे.’
‘सांगा बरे.’