तीन मुले 43
‘मधुरी!’
‘काय बुधा?’
‘तू आज आलीस?’
‘क्षणभर आल्ये आहे.’
‘हा क्षण अमर आहे. अत्तराचा एक थेंबही सारे घमघमाटाचे करतो. हा एक क्षणही माझ्या सर्व जीवनाला दरवळील. का आलीस?’
‘तुझ्याजवळ मदत मागायला!’
‘प्रेम माग.’
‘ते दिलेसच आहे.’
‘काय मदत देऊ? मी कोण देणारा! सारे तुझेच आहे. येथून हक्काने ने.’
‘उद्यापासून मंगा व मी एकत्र राहणार. आम्ही दोघेही निराधार आहोत. घरातून त्याला बाहेर काढण्यात आले तसेच मलाही. आम्हाला राहायला एखादी झोपडी हवी आहे. उद्या घेते एखादी झोपडी. राहू कोठे तरी. आम्ही मजुरी करुन राहू, परंतु आरंभी थोडी मदत हवी. जवळ नाही काही, भांडे ना कुंडे.
‘मधुरी, माझ्याकडेच तुम्ही दोघे येऊन राहा ना.’
‘नको. मंगाला ते आवडणार नाही.’
‘तू लहानपणी काय म्हणत असस?’
‘त्याची आठवण आता नको. देतोस का मदत?’
‘मी शेवटी तुझा कोणीच नाही ना?’
‘तुझ्याकडे निर्लज्जपणे भीक मागायला आले, यावरुन तरी तू मला परका वाटत नाहीस, हे नाही का दिसत? तुम्हां पुरुषांना काही कळत नाही. तू माझा म्हणूनच मी तुझ्याकडे आले, खरे ना?’
‘होय.’
‘दे लौकर मदत!’
‘किती देऊ?’
‘दे दोनशे रुपये.’
‘पुरेत?’
‘पुरे.’
‘पुन्हा कधी लागले तर मागशील ना?’
‘मागेन.’
बुधा उठला. त्याने दोनशे रुपये आणले व दिले. दोघे बसली होती.