तीन मुले 22
‘त्या वेळेस अल्लड होतो.’
‘आज वयात आलो आहोत.’
‘त्या वेळेस पाखराचे पंख होते आपल्याला.’
‘आज दु:खाचे, चिंतांचे दगड गळयाभोवती आहेत.’
‘मंगा!’
‘काय मधुरी?’
‘समुद्र कसा उचंबळतो आहे!’
‘आणि आपली मनेही उचंबळत आहेत.’
‘मंगा, मला जाऊ दे.’
‘माझ्याजवळ बसावे असे तुला नाही वाटत?’
‘मी काय सांगू? तूच उत्तर दे.’
‘मधुरी, आपण कधी लग्न लावावयाचे?’
‘बाबा नको म्हणतात.’
‘ते तुझ्या कलाने घेत असत ना? तू म्हणशील तो नवरा तुला देईन असे म्हणत असत ना?’
‘परंतु आता म्हणतात की मंगाचे तोंड पाहू नकोस. त्या दिवशीची तुमची ती मारामारी ना.’
‘मीच तर ती सोडविली.’
‘तरीही तुमच्याविषयी त्यांच्या मनात अढी बसली आहे. काय करु मी?’
‘तुझे हृदय सांगेल तसे कर.’
दोघे बोलायची थांबली. त्यांचे हात एकमेकांच्या हातांत होते. मधून मधून एकमेकांच्या तोंडाकडे बघत, पुन्हा समोरच्या समुद्राकडे पहात.
इतक्यात मधुरीचा हात कोणी तरी ओढला.
‘कोण?’
‘तुझा बाप. ऊठ, निघतेस की नाही? ऊठ, की कमरेत लाथ मारु?’
‘खबरदार माझ्या देखत बोलाल तर! तिला लाथ माराल तर मी तुम्हाला समुद्रात फेकीन.’
‘ती माझी मुलगी आहे.’
‘ती माझी मैत्रीण आहे.’
‘बाबा, भांडण नको. मंगा, शांत हो.’