तीन मुले 83
मंगाचे प्रयाण
आणि मंगा आता जाणार होता. बंदरात एक दूरचे गलबत आले होते. त्या गलबतातूनच त्याने जावयाचे ठरविले. लौकरच ते गलबत हाकारले जाणार होते. तयारी होत आली होती. निरनिराळे व्यापारी आपापला माल भरीत होते. मंगाने काही भांडवल गोळा केले होते. त्याने होत नव्हते ते विकले. दोनचार दागिने होते ते विकले. घरातील काही भांडीकुंडीही त्याने विकली. मधुरीनेच आग्रह केला. ती म्हणाली, आम्हांला काय करायची भांडी? मातीची भांडी असली तरी चालतील. मंगा, तुझ्याजवळ जितके जास्त पैसे असतील तितके चांगले.
मंगाने आपल्या गावचा काही माल खरेदी केला. त्या गलबतात त्याने तो माल भरला. तो माल चढवीत असता त्याचे हृदय आशेने नाचत होते. गलबतात माल भरला जात होता. हृदयात आनंद भरत होता. आपण व्यापारी होत आहोत असे त्याला वाटले. आता मंगा शेटजी होत होता.
हमालाचा शेटजी होत होता.
घरी मधुरी एक गोधडी शिवीत होती. गावातील शिंप्याकडून तिने चिंध्या आणिल्या. छान छान चिंध्या. धोतरे, लुगडी आत घालून वरून त्या नाना रंगांच्या चिंध्या तिने शिवल्या. किती सुंदर होती ती गोधडी.
‘आई, कोणासाठी ही? मनीला?’ सोन्याने विचारले.
‘अरे, एवढी मोठी मनीला कशाला?’ ती म्हणाली.
‘मग मला? रुपल्या व मी आम्ही दोघे त्यात मावू.’
‘बघू पुढे. तुम्हांला मी दुसरी करून देईन हो.’
‘मग ही कोणाला?’
‘बाळ, कोणाला बर?’
‘बाबांना? ते जाणार आहेत दूर. त्यांना, होय ना?’
‘होय हो.’ मधुरीने त्याला जवळ घेऊन म्हटले.
मधुरी मंगाची तयारी करून देत होती. एकीकडे तिला वाईट वाटत होते, परंतु तिलाच तयारी करून द्यावी लागत होती. तिने लाडू केले. काही वडया केल्या. थोडे पोहे, पापड तिने तयार करून ठेविले. लोणच्याची लहानशी बरणी बांधून ठेविली. गलबत हेच आता मंगाचे घर होणार होते.
मधुरीने ती सुंदर गोधडी अद्याप मंगाला दाखविली नव्हती. परंतु त्या दिवशी सोन्या म्हणाला,
‘बाबा, तुम्हीसुध्दा कुकुले बाळच!’
‘कशावरून रे?’
‘आईने तुमच्यासाठी गोधडी शिवली आहे. आमच्यापेक्षा का तुम्ही लहान? तुमच्यासाठी आईला चिंध्यांची गोधडी करावी लागली.