तीन मुले 97
ती मधूनमधून समुद्रावर जाई. वा-या, वा-या, मंगाला सुखी ठेव असे म्हणे. ती समुद्राकडे पाही. कोठे असेल मंगा असे मनात येऊन तिला वाईट वाटे. देवाला हात जोडून ती परत येई.
आणि एके दिवशी प्रचंड वादळ सुटले. तुफान वारे उठले. घों घों आवाज होत होता. किती झाडे पडली. बंदरावरची शेकडो नारळाची झाडे पडली. कित्येक घरांवरची छपरे उडून गेली. वाळूच्या नवीन टेकडया तयार झाल्या. समुद्र असा कधी खवळला नव्हता. बंदरातील काही गलबते मोठया मुश्किलीने वाचली. काही होडया, काही पडाव उलटले. पर्वतासारख्या लाटा. एका तडाख्यासरशी होडया पालथ्या होत. सारी मंडळी दारे लावून घरी बसली होती. मुलांना घेऊन मधुरी झोपडीत होती. झोपडीत वारा घुसे, झोपडी उडून जाईल असे वाटे. मुले आईला मिठी मारीत. बिलगून बसत.
मधुरीच्या डोळयांसमोर मंगा आला. तो कोठे असेल? समुद्रात अशी वादळे उठतात. त्याचे गलबत नसेल ना सापडले वादळात असेल ना ते सुखरूप? नाही नाही ते तिच्या मनात येई. तिला अनेक गोष्टी आठवत व तिच्या अंगावर काटा उभारे.
लोक म्हणाले, असे वादळ कित्येक वर्षांत झाले नव्हते. ज्याच्या त्याच्या तोंडी वादळाच्याच गोष्टी. अनेक लोकांचे नुकसान झाले होते. काहींचा माल यायचा होता. ती गलबते वादळात तर नसतील ना सापडली? अनेकांचे चेहरे चिंतातूर होते.
काही दिवसांनी नवीन गलबते बंदरात आली. बंदरावर गर्दी झाली. वादळाची हकीकत सारे विचारीत होते. भयंकर गोष्टी. समुद्रातील हकिकती! आपण आता बुडणार असे कसे वाटले, परंतु पुन्हा कसे सावरलो; आमच्या डोळयांदेखत काही गलबते, मचवे कसे बुडले, त्यांच्या किंकाळया, आक्रोश कसे सारे ऐकले वगैरे गोष्टी आलेल्या गलबतावरील लोक सांगत होते. मधुरीही बंदरावर गेली होती. गेल्यापासून मंगाने चिठ्ठीचपाटी पाठविली नव्हती! का नाही पाठविली? तो मधुरीला का विसरला? त्याला का राग आला होता? का त्याला दुसरे गलबत भेटलेच नाही? मंगाच्या काही निरोप कळेल, काही बातमी मिळेल, म्हणून मधुरी आशेने आली होती. परंतु काही कळले नाही. ती खिन्न होऊन माघारी गेली.
नवीन गलबत आल्याचे कळले की ती वा-याप्रमाणे बंदरावर जाई. काही निरोप मिळतो का बघे. खलाशांना विचारी; परंतु पत्ता लागत नसे. जड मनाने ती घरी परत येई. मधुरी आता नेहमी सचिंत असे. तिचा आनंद मावळला. ती रात्री देवाला आळवीत बसे. काय करावे तिला सुचेना.
आता कशात सोन्या आजारी पडला.
मधुरीला कामाला जाता येईना. ती सोन्याजवळ बसलेली असे. नवीन बाळ मेलेलेच जन्मले. आता जिवंत आहेत ती तरी राहू देत. मंगा येईल, त्याच्याजवळ ही त्याची जिवंत दौलत मी पुंन्हा देईन, असे ती मनात म्हणे. सोन्याच्या डोक्यावरुन ती हात फिरवी सोन्याचा ताप निघेना. मधुरी आता मजुरीसाठी जात नसे. घरातले पैसे संपले. मंगाने अडीअडचणीसाठी म्हणून ठेवलेले पैसे तेही संपले. आता खायचे काय? कशाचे औषध? कोठले दूध? कोठले फळबीळ?
‘आई, बाबा कधी येतील? लौकर येईन म्हणाले. अजून का येत नाहीत? कधी येतील? खरे सांग, कधी येतील?’ सोन्याने विचारले.
‘येतील रे राजा. शांत पडून रहा.’ आई समजावी.
आणि सोन्या आता वातात असे. वातात बडबडे. उठू बघे.