तीन मुले 108
आणि एकदम झोपेतून उठली. मधुरी अशी तिला हाक ऐकू आली. ती दचकून उठली. कोठून आली हाक? भास झाला की खरेच कोणी हाक मारली? परंतु कोणी नव्हते. तिने दार उघडून अंगणात पाहिले. कोणी नव्हते. रातकिडे किर्र करीत होते. तारे चमचम करीत होते. ती परत आली व झोपली. पुन्हा दचकून जागी झाली. पुन: मधुरी अशी हाक. मंगाच्या आवाजासारखी हाक. अगदी हुबेहूब तशीच. मधुरी भ्यायली. मंगाच्या मधुर हाकेने का भ्यायचे? त्या ओळखीच्या प्रेमळ हाकेने का घाबरावयाचे?
‘मंगा? कोठे रे आहेस तू? का मला हाका मारतेस? ये व मला भेट रे राया. असा दडून नको बसू; गुप्त राहून नको हाका मारू. मी भिते, घाबरते हो मंगा.’ मधुरी भित्री आहे असे ती म्हणाली. पुन्हा पडली. मग ती पुन्हा नाही जागी झाली. सकाळपर्यंत ती निजली. सकाळी सारी उठली. रोजचे कामकाज हळूहळू सुरू झाले. दिवस जाऊ लागले. एके दिवशी समुद्राच्या काठावर तिने फुले सोडली.
‘माझ्या मंगाच्या आत्म्याला. त्याला फुले आवडतात. फुलासारखे त्याचे मन. लाटांनो, मंगाला ही फुले द्या आणि ही आसवांचीही माला त्याला द्या. माझ्या डोळयांतील फुले. असे म्हणत रडत रडत ती फुले मंगाच्या पवित्र प्रेमळ स्मृतीस तिने वाहिली. एकवार समुद्राकडे भरलेल्या दृष्टीने तिने पाहिले. किती तरी वेळ ती दूर पहात होती. तिला का कोणी दिसत होते? तिला का मंगाची मधुर मूर्ती तिकडे कोठे लांब दिसत होती? लाटा येत होत्या, वारे वहात होते आणि मधुरी दूर कोठेतरी पहात तेथे पाण्यात उभी होती. शेवटी तिने एक प्रणाम केला व ती माघारी आली. मुलांसाठी माघारी आली.