तीन मुले 152
आजारी
मंगा आता चांगलाच आजारी पडला. फणफणून ताप त्याच्या अंगात असे. ताप निघेना. घाम फुटेना. दुखणे हटेना, म्हातारी सेवाश्रूषा करीत होती.
‘तुम्हांला उगीच त्रास.’ मंगा म्हणे.
‘मी आता बरा नाही होणार. तुमच्या झोपडीतच माझी कुडी पडेल. येथूनच प्राण उडेल.’
‘असे नका बोलू. बरे व्हाल हो.’
म्हातारी धीर देई. एके दिवशी म्हातारी औषध आणायला बाजारात गेली होती. मंगा एकटा अंथरुणावर होता. शांतपणे पडून
होता. हळूहळू तो रडू लागला. ओक्साबोक्शी रडू लागला. थोडया वेळाने म्हातारी आली.
‘हे काय? रडू नका असे. अशाने दुखणे वाढते.’
‘वाढू दे दुखणे. मरू दे लौकर.’
‘मी तुम्हांला मरू देणार नाही. निजा.’
‘आजी, माझी नका करू शुश्रूषा. कोणासाठी जगविता?’
‘असतील तुमची मंडळी त्यांच्यासाठी आणि कोणी नसले म्हणून काय झाले? मला तरी कोण आहे? तरी मी जगतेच.’
‘तुम्ही थोर आहात.’
‘आणि तुम्ही का चोर आहोत? पडून रहा.’
मंगा झोपला. त्याने आता शांतपणे पडून राहावयाचे ठरविले.
तिसरे प्रहरी बुधा व मधुरी आली होती.
‘आजी, ही घे फळे.’ बुधा म्हणाला.
‘कोठे आहे तो वाटसरू?’ मधुरीने विचारले.
‘झोपला आहे.’ म्हातारी म्हणाली.
मधुरी आत आली. तिने पाहिले. काय दिसणार? पाहुण्याच्या अंगावरून पांघरूण होते. परंतु ती गोधडी घोंगडीतून बाहेर पडलेली दिसत होती. त्या गोधडीकडे मधुरी पाहू लागली. तिला मंगाची आठवण झाली. ती खाटेजवळ गेली. त्या गोधडीला तिने हात लावला. एकदम थरारला. जणू भाजला. ती मागे आली.
‘आजी, छान आहे गोधडी नाही?’ मधुरी म्हणाली.
‘तेवढयाने त्याची थंडी राहते.’ म्हातारी म्हणाली.