तीन मुले 129
माझ्यासाठीच तुम्ही आला असे मला वाटते. तुम्ही माझे आहात. मी तुम्हांला जाऊ देणार नाही. तेथे आपण दोघे झुरून झुरून मरू. तुम्ही रडा, मी रडेन. तुमचे खाण्यापिण्यात लक्ष नाही. माझे आहे वाटते? मी माझ्या महालाच्या खिडकीतून सारखी तुमच्याकडे पहाते. ही तुमची जागा म्हणजे माझे मंदिर. तुम्ही माझे देव. नका जाऊ तुम्ही. तुमचे नाव मंगा मला फार आवडते.’
‘तुमचे काय नाव?’
‘तुम्हांला आवडेल का?’
‘नाव मला आवडेल.’
‘आणि स्वत: मी? माझ्या जीवनाचे फुल तुम्हांला आवडेल का? या फुलाचा कोणीही वास घेतलेला नाही. हे फूल न हुंगलेले, अनाघ्रात असे आहे. हे नाही का तुम्हांला आवडत? हे फूल तुमच्यासाठीच फुललेले आहे. माझे जीवन कोणासाठी, खरेच कोणासाठी, म्हणून मी रात्रंदिवस मनात म्हणत असे. माझ्या जीवनाच्या फुलातील मध कोणाला देऊ, रसगंध कोणाला देऊ, सौंदर्य कोणाला अर्पण करू असे वाटे. अनेक राजपुत्र आले गेले. सारे माझ्या मते अनुत्तीर्ण झाले. माणे हृदय त्यांना पाहून हसले नाही, शरीर थरथरले नाही, त्यांना पाहून पदर सरसावला नाही, श्वास वेगाने सुरू झाला नाही. मी तशीच राहिल्ये. माझ्यासाठी राजा रडे, राणी रडे. माणे आईबाप माझ्यामुळे दु:खी कष्टी होतात. एकदा तर म्हणाले, जा जगात व शोध तुझा वर.’
‘मग का गेला नाहीत तुम्ही धुंडाळायला?’
‘माझा वर येथे आपण होऊन चालत येईल असे मी म्हणे. माझे फूल घ्यायला तो येईल. मला फुलून राहू दे. मधुकर येईल. भुंगा गुं गुं करीत येईल. माझ्याभोवती रुंजी घालील.’
‘परंतु तो तर मी नाही, तो अजून यायचाच आहे. त्याची वाट पहा. नाही तर तो येईल व त्याची निराशा होईल.’
‘मंगा!’
‘काय?’
‘तुम्ही असे कसे दुष्ट? एकीला सुखविलेत, आता मला सुखवा.’
‘असे का जगात शक्य आह? आमची लहानपणची गोष्ट आहे.’
‘सांगा.’
‘तुम्हांला कंटाळा येईल.’
‘तुमच्याजवळ मी युगानुयुगे ऐकत बसेन. गुणगुण गोड वाटते. पक्ष्यांची किलबिल कशी नीरस वाटत नाही. चंद्राचे चांदणे कधी शिळे होत नाही. फुलांचा गंध कधी नकोसा वाटत नाही. बोला, माझ्याजवळ पोटभर बोला तरी.’