तीन मुले 93
मंगाने मुलांचे मुके घेतले. मधुरीचा हात हाती घेतला. तिच्याकडे डोळे भरून त्याने पाहिले. लौकर येईन, जप. असे अश्रुपूर्ण शब्दांनी म्हणून तो होडीत बसला. होडी निघाली. झरझर जात होती. मधुरी पहात होती. मुले पहात होती. होडी गलबताजवळ गेली. मंगा गलबतावर चढला. होडी परत आली. मंगा तेथे उभा होता. इकडे बंदरावर मुलांसह माता उभी होती. गलबत हाकारण्याची वेळ झाली. निघाले गलबत. मंगाने हात हालवला. मधुरीने हालवला. मुलांनी आपल्या बाहूंचे बावटे नाचविले. गलबत हळूहळू निघाले. मधुरी पहात होती. तिचे सौभाग्य चालले होते. तिच्या जीवनातील सर्वांत मोठा माल त्या गलबतात होता. किती तरी वेळ ती तेथे उभी होती. शेवटी दिसेना काही. गलबत वळले, दृष्टीआड झाले.
‘आई, चल घरी.’ सोन्या म्हणाला.
‘आई, धर माझा हात.’ रुपल्या म्हणाला.
मनीला जवळ घेऊन रुपल्याचा हात धरून ती माता घरी आली आणि अंथरुणावर पडली. जमिनीच्या अंथरुणावर दाबलेले अश्रू बाहेर आले. तिचे रडू थांबेना.
‘आई!’ सोन्या हाक मारी.
‘हे काय आई?’ रुपल्या म्हणे.
शेवटी ती शांत झाली. मुलांदेखत रडणे तिला पाप वाटले. ती जरा हसली. तिने त्यांना जवळ घेतले, त्यांचे पापे घेतले. मुले आनंदली.
‘आम्ही जाऊ खेळायला?’
‘जा. भांडू नका.’
‘भांडू कसे? बाबांनी सांगितले आहे भांडू नका.’ सोन्या म्हणाला. असे म्हणून मुले गेली. मधुरीने मनीला जरा निजविले आणि ती? तिला काही सुचेना. सारे तिला शून्य वाटत होते. गळून गेल्यासारखे वाटत होते. ती अंगणात आली. तिने फुले पाहिली. दूर बसली. डोळे मिटून बसली. अपार सागरात त्याचात आधार. त्याच्या स्मृतीचाच आधार.
‘देवा, आण हो माझा राजा लौकर. सुखरुप आण.’ ती म्हणाली. डोळयांतून अश्रूंची फुले घळघळली आणि मंगा! तोही तिकडे प्रभूची, अश्रुमय पूजा करीत होता.