तीन मुले 20
‘काय झाले बाबा? मधुरीने विचारले.’
बाप बोलला नाही. तो खाटेवर पडला. दांतओठ खात होता. अद्याप त्याचा राग शांत झाला नव्हता. मधुरी बापाजवळ बसली होती. ती त्याचे डोके दाबीत होती. ती दु:खाने त्याच्याकडे बघत होती. आता बाप जरा शांत झाला. मधुरीने पुन्हा प्रश्न केला.
‘बाबा, काय झाले?’
‘मारामारी झाली.’
‘कोणी मारले कपाळावर? ‘
‘मंगाच्या बापाने.’
‘हो.’
‘काय झाले कारण?’
‘बोलाचाली.’
‘कशाची?’
‘तुझ्या लग्नाची.’
‘काय म्हणत होता मंगाचा बाप?’
‘म्हणत होता की मधुरीला विकणार आहेत.’
‘खरंच?’
‘हो. मला राग आला. शेवटी भांडण झाले. मी त्याच्या अंगावर धावून गेलो. त्याने मला आपटले. डोक्याला लागले.’
‘तुमच्या मदतीला कोणी धावून नाही आले?’
‘मंगा आला धावत. त्यानेच शेवटी मारामारी सोडविली.’
‘माझ्या मंगाने?’
‘तुझा मंगा?’
‘हो. माझा मंगा. मला आवडतो बाबा. त्यानेच सोडविले तुम्हांला?’
‘मधुरी, मंगाचे नाव पुन्हा काढू नकोस. ज्याच्या बापाने माझा अपमान केला त्याचे नाव नको. माझ्या घरात तरी नको.’
‘परंतु मंगाचा काय अपराध? काय दोष?’