तीन मुले 94
एकटी मधुरी
मंगा गेला. मधुरी घर चालवीत होती. मंगाने जाताना काही रुपये देऊन ठेविले होते; परंतु ते पैसे तिने बाजूला ठेविले अडीअडचणीसाठी ठेवून दिले. ती मोलमजुरी करू लागली. मुलांना ती भाकर करून देई व कामाला जाई.
सोन्या, भांडू नको हो. मी जाते कामाला. मनीला नीज आली तर निजव.’ असे सांगून ती कामाला जाई, आणि मुले भांडत नसत. आई येईपर्यंत खेळत, मनीला निजवीत. कामावरून आल्यावर ती मुलांना जवळ घेई. त्यांच्या पाठीवरून हात फिरवी. भांडलेत नाही ना राजांनो! असे म्हणे.
‘गुणाची आहेत माझी बाळे.’ असे म्हणे.
एके दिवशी ती कामावरून आली. मुलांना घेऊन बसली.
‘आई, बाबा कधी येतील ग?’ सोन्याने विचारले.
‘येतील हो लौकरच. का रे?’ तिने त्याला जवळ घेऊन प्रश्न केला.
‘आई, मला शाळेत जावेसे वाटते. तू रे का शाळेत येत नाहीस?’ असे तो गोविंदा म्हणाला.
‘तू काय सांगितलेस!’
‘बाबा आले म्हणजे मी येईन शाळेत. ते मला पाटी आणतील. चित्रांची पुस्तके आणतील, असे मी सांगितले.’
‘होय हो, ते पुस्तक आणतील, सारे आणतील.’
मधुरीला वाईट वाटत होते. ती आता गरीब होती. घरी मुलांना सांभाळायला कोणी तरी पाहिजे. सोन्याला शाळेत जाऊन कसे चालेल? तिला कामाला जायचे असे. गरिबांच्या मुलांना कोठली शाळा, कोठले शिक्षण? घरी खायला नसता शाळा तरी सुचणार कशी? सक्तीचे शिक्षण केलेत तर गरिबांवर ती खरीच आपत्ती आहे. गरिबांची मुले घरी पाहिजे असतात. ती लहान असतात तोच मदत करू लागतात. शेण गोळा करतात, गुरे राखतात, काही काम करतात. त्यांच्या घरी खाण्यापिण्याची ददात नसेल तेव्हाच ती शिकायला येतील. हातात आधी भाकर द्या व मग पाटी द्या. हातात आधी भाकर द्या मग ज्ञान द्या. देव द्या. सारी संस्कृती अन्नब्रह्मावर उभारलेली आहे. अन्न म्हणजे परमेश्वर असे म्हटले आहे ते खरे आहे. या परब्रह्माचा साक्षात्कार सर्वांना आधी करून द्यायला पाहिजे.
मधुरी फार काम करी. सोन्याही एके ठिकाणी काम करायला जाऊ लागला. परंतु एके दिवशी धन्याने सोन्याच्या थोबाडीत मारली तो रडत रडत घरी आला. मधुरी आल्यावर त्याने सारी हकीकत सांगितली.