तीन मुले 41
‘समुद्र बुडवील, पोटात गुदमरवील.’
‘ते बुडवणे, ते गुदमरणे गोड असते मंगा.’
‘मग जाशील त्याच्याकडे?’
‘हो. आज रात्री जाईन व लगेच परत येईन.’
‘मी टेकडीवर असेन.’
‘ठरले तर तोपर्यंत अशीच येथे बसू. मी निजते.’
‘नीज.’
मधुरी मंगाच्या मांडीवर निजली. ती थकली होती, तिच्या म्लान परंतु मधुर मुद्रेकडे मंगा पाहत होता. आपले दारिद्र्य त्याला आठवले. बुधाकडे मधुरीने पैसे मागण्यासाठी जाणे त्याला कसे तरी वाटले. त्याचा स्वाभिमान दुखावला जात होता. बुधाच्या मदतीवर का मी नवा संसार करु? हा मिंधेपणा आहे. लाजिरवाणे आहे हे. तो खिन्न झाला.
मधुरी एकदम जागी झाली. मंगा सपाट समुद्राकडे शून्य दृष्टीने पहात होता. मधुरी त्याच्याकडे भरलेल्या दृष्टीने बघत होती. ती भुकेली होती. मंगाला ती खात होती. पीत होती. एकदम तिने आपले दोन्ही हात मंगाच्या गळयात घालून त्याला खाली वाकविले, त्याचे तोंड जवळ ओढले. फुले भेटली. श्वासोच्छ्वास मिसळले.
‘खाऊ तुला, खाऊ?’
‘हूं खा.’
दोघे शांत झाली. मधुरी बसली. सायंकाळ होत होती. समुद्रावर लाल प्रकाश पसरला होता. तांबडा समुद्र जणू तेथे नाचत होता. अनुरागाचा लाल सागर. मधुरीच्या व मंगाच्या प्रेमाला पाहून तो समुद्रही रंगला, का त्या दोघांची प्रेमाने रंगलेली अनंत हृदये तेथे बाहेर पडून नाचत होती?
‘मधुरी. चल, काठाकाठाने परत जाऊ. पाय दुखतो का?’
‘नाही दुखत. चल, धर माझा हात.’
‘दोघे समुद्रकाठाने चालली.’
‘पाण्यातून चल.’
‘नको रे मंगा.’
‘चल. मी आहे बरोबर.’
‘मला भीती वाटते!’
‘थोडया पाण्याचीही भीती?’
‘बरे, चल.’
‘दोघे पाण्यातून जाऊ लागली. मंगा पाण्यात पुढे चालला.’
‘मंगा, पाण्यात तिकडे कोठे जातोस?’