तीन मुले 30
‘हो.’
‘तुम्ही काय करता?’
‘मजुरी.’
‘काय, मजुरी?’
‘हो, या बंदरात माल चढविण्या-उतरविण्याचे काम मी करतो.’
‘तुमचा हात पाहू?’
‘तुम्ही का ज्योतिषी आहात?’
‘परंतु पाहू दे.’
मंगाने आपला हात पुढे केला. त्या व्यापा-याने तो पाहिला.
आपल्या हातात घेऊन त्याने तो दाबला.
‘तुमचा हात राकट नाही. मऊ आहे. तुम्ही श्रीमंत व्हाल. तुमच्या हातांवर पैसां आहे.’
‘श्रीमंत व्हावे असे मला वाटते. मी पुढे श्रीमंत होणार आहे. सामासमुद्राच्या सफरी करणार आहे. जगातील माणिक, मोती, हिरे, रत्ने मी आणीन; मी कुबेर होईन.’
‘तुम्हांला श्रीमंत व्हावे असे वाटते?’
‘हो.’
‘तुम्हांला मजुरीचा कंटाळा आहे?’
‘मला मजुरीचा कंटाळा नाही. अंगातून घाम आला, मी काम करुन दमलो म्हणजे मला बरे वाटते. परंतु श्रीमंत व्हावे असे वाटते. श्रीमंत झाल्यावरही मी काम करीन. बाग करीन. बागेत फुले व फळझाडे लावीन. मला फुलांचा मनातून फार नाद. परंतु आज कोठे लावू फुले? जवळ जमीन नाही. काही नाही. नाना प्रकारची फुले व फळे यांचे मी प्रयोग करीन. परंतु आधी मला श्रीमंत होऊ दे. जगभर हिंडू दे. जगातील फुले, फळे पाहू दे. व्यापाराच्या निमित्ताने मी जगभर जाईन, पैसा मिळवीन. नाना गोष्टी बघेन आणि मग या सारंग गावी मी मळे फुलवीन.’
‘आणि आजच कोणी तुम्हांला श्रीमंत केले तर?’
‘खोटया कल्पनांत रमणे मला आवडत नाही.’
‘परंतु खरोखरच तुम्हांला कोणी धनदौलत दिली तर?’
‘आयती संपत्ती मला नको. मी स्वत: मिळवीन.’
‘तुम्ही किती वर्षांचे आहात?’
‘वीस-बावीस वर्षांचा असेन.’
‘तुम्ही लग्न केलेत का?’