तीन मुले 138
‘मंगाला का पुढचे दिसत होते? बुधाची बासरी ऐकत मधुरीच्या पोटात बाळ वाढत असेल, असे का त्याला दिसले? अशी हसते आहे लबाड? समजते का ग तुला? तुला आहे का माझा मंगा माहीत? आला तर त्याला ओळखशील का ग लबाडे?’ असे म्हणून मधुरीने वेणूचे मुके घेतले.
एके दिवशी मधुरी एकटीच बसली होती. जवळ वेणूला निजवली होती. जशी जाईजुईची कळी, मोग-याची कळी - मधुरी काही तरी विचार करीत होती. इतक्यात बुधा आला. मधुरीजवळ बसला.
‘मी पण निजतो.’ तो म्हणाला.
‘नीज हो राजा.’ ती म्हणाली.
आणि तो तेथे निजला. मधुरीच्या उशीवर डोके ठेवून तो निजला. मधुरीने थोडया वेळाने त्याचे डोके उचलून स्वत:च्या मांडीवर घेतले. तो हसला.
‘काय झाले हसायला?’ तिने विचारले.
‘तुम्ही बायका वेडया.’ तो म्हणाला.
‘हो, आम्ही वेडया आहोत. प्रत्येक गोष्टीतून प्रेम प्रकट करावे असे वाटते. हृदयातील प्रेम मावत नाही; ते कोणत्या तरी निमित्ताने आम्ही बाहेर ओततो.’
‘मधुरी, मी आता आलो तेव्हा तू का विचार करीत होतीस?’
‘हो.’
‘कसला विचार?’
‘सांगितला तर रागावशील.’
‘हे काय असे बोलतेस?’
‘ऐक तर. तू एक मंगाचे मोठे चित्र कर ना तयार. मंगाही माझ्या दिवाणखान्यात हवा. करशील तयार?’
‘करीन.’
‘बुधा, तुला मत्सर नाही वाटत? मंगाचे नाव काढले म्हणजे वाईट नाही वाटत?’
‘मत्सर न वाटू द्यायला तू शिकविले आहेस. तुझा आनंद तो माझा.’
‘बुधा, तू किती चांगला. असे चांगले लोक फार नसतात हो. जगात मत्सर फार. द्वेष फार. सरळपणा कमी. माझा बुधा सरळ मनाचा आहे. थोर मनाचा आहे. रंगव हो माझा मंगा. माझ्या जीवनाला रंगवणारे तुम्ही रंगारी. दोन रंगारी. मंगा व बुधा. एक रंगवून गेला. दुसरा रंगवीत आहे. कुंचले फिरवीत आहे. खरे ना लबाडा? खरे ना रंगा-या?’ असे म्हणून तिने त्याच्या नाकावर बोट मारले.