तीन मुले 120
‘मधुरी, किती येथल्या आठवणी!’
‘आपण येथे खेळत असू. तुला पतंग उडवता येत नसे. आठवते! मंगा तुला चिडवी. तू रडायला लागस.’
‘परंतु तुझा हात मदतीला घेताच माझा पतंग उंचच उंच उडे. गोता खात नसे. खरे ना? मंगाच्या पतंगापेक्षाही मग आपला पतंग उंच उडे.’
‘आणि एके दिवशी संध्याकाळी समुद्रात मंगा गेला आणि तू घरी जायला निघालास. मला भीती वाटते म्हणालास. मी तुला धरून ठेवले. नाही का?’
‘हो.’
‘आणि ती तुमची भांडणे. एके दिवशी तर तुम्ही मारामारी केलीत. माझ्यासाठी मारामारी. आणि मग आजीकडे गेलो. आठवतो का तो खेळ?’
‘लटोपटीच्या लग्नाचा खेळ.’
‘आणि मी भांडण मिटविले.’
‘मधुरी, तू काय म्हटलेस तेव्हा, आठवते?’
‘हो.’
‘सांग ग.’
‘भांडू नका. रडू नका. मी तुमची दोघांची छोटी बायको होईन असे मी म्हटले.’
‘आणि आम्ही आनंदलो. खरे ना?’
तिकडे सूर्य मावळत होता. नारळीच्या झाडांवर शेवटचे किरण खेळत होते. जाताजाताच्या गुजगोष्टी करीत होते. समुद्र लालसर दिसत होता. आणि मधुरी व बुधा यांचे चेहरेही जरा लालसर दिसत होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पुन्हा समोर समुद्राकडे त्यांनी डोळे केले. मुले खेळत होती. बुधा-मधुरीचाही खेळ चालला होता. मनकवडेपणाचा खेळ. लपंडावाचा खेळ.
‘बुधा!’
‘काय मधुरी!’
‘एकदा मी लपले होते. तुम्ही दोघे मला धुंडीत होता. आठवत तुला?’
‘हो, आठवते. त्या पलीकडील दरडीत तू लपली होतीस आणि भरती येत होती. पाणी येऊ लागले. आणि तू हाका मारल्यास. तू घाबरलीस, खरे ना?’
‘आणि मंगा पळत आला.’
‘मीही येत होतो. परंतु वाटेत पायाला लागून पडलो.’