तीन मुले 3
‘त्या घराभोवती बाग आहे, हो ना?’ मधुरीने विचारले.
‘हो.’ बुधाने उत्तर दिले.
‘आम्ही गरीब आहोत.’ मंगा म्हणाला.
‘मी निरनिराळे खेळ आणत जाईन. खाऊ आणीत जाईन. आपण एकत्र खेळू. एकत्र खाऊ. आपण तिघं मित्र.’ बुधा म्हणाला.
अशी त्या तिघा मुलांची ओळख झाली. दिवसेंदिवस ओळख दृढ होत गेली. एकमेकांशिवाय त्यांना करमत नसे. संध्याकाळी तिघे समुद्रावर येत. समुद्रकाठी एक लहानशी वाळूची टेकडी होती. त्या टेकडीवर तिघे बसत. दुरुन समुद्र हसे. कधी कधी त्या टेकडीवरुन खाली घसरुन जाण्याचा खेळ ती खेळत. मंगा व मधुरी एकमेकांचा हात धरुन झरकन् घसरत खाली जात; परंतु त्यांचा हात धरावयास बुधा धजत नसे.
‘बुधा, मी मध्ये बसते. माझ्या उजव्या बाजूस मंगा बसेल व डाव्या बाजूला तू बस. एक हात तू धर, एक हात मंगा धरील. आपण तिघे एकदम घसरत खाली जाऊ.’ मधुरी म्हणाली.
त्याप्रमाणे तिघे बसली. एक, दोन, तीन करुन घसरगुंडी सुरु झाली. परंतु बुधा मध्येच थबकला. मंगा खाली गेला. बुधा वरच राहिला. मधुरीच्या हातांची ओढाताण झाली. व शेवटी मंगाने त्या दोघांना ओढले. बुधाने मधुरीचा हात सोडला. मधुरी व मंगा खाली जाऊन उभी राहिली. बुधा ओशाळला व रडवेला झाला.
‘बुधा, तू भित्रा आहेस.’ मंगा म्हणाला.
‘श्रीमंतांची मुले भित्री असतात.’ मधुरी म्हणाली.
‘मधुरी, तू एकटीच माझा हात धर. बघ येतो की नाही खाली घसरत. मी भित्रा नाही.’ बुधा म्हणाला.
आणि मधुरीने बुधाचा हात धरला. दोघे घसरत खाली गेली. बुधाचे तोंड फुलले. आपण भित्रा नाही असे त्याने दाखविले.
एके दिवशी बुधाने सुंदर पतंग आणला होता. मंगाने खूप उंच उडविला; परंतु बुधाला उडविता येईना. मंगा त्याला चिडवू लागला. बुधा रडू लागला.
‘बुधा, रडतोस काय मुलीसारखा?’ मधुरी म्हणाली.
‘रडू नको तर काय करु?’ तो म्हणाला. ‘घे पतंग व उडव.’ ती म्हणाली.
‘आपण दोघे मिळून उडवू ये. तू पण दोरा धर, म्हणजे मला धीर येईल. तू अशी दूर उभी राहून बघू नकोस. ये ना ग मधुरी!’ तो म्हणाला. आनंदला. मंगा नेहमी नवीन नवीन खेळ शोधून काढी. तो चपळ होता, नारळाच्या झाडीवर चढे, तो माशाप्रमाणे समुद्राच्या पाण्यात नाचे. तो वाटेल तेथून उडी टाकी. परंतु बुधा सौम्य होता, शांत होता.