तीन मुले 154
‘त्याला आणखी पांघरूण का नाही घालीत?’
‘तो नको म्हणतो. मघा घोंगडी काढून टाकली त्याने. आता मी पुन्हा घातली. गोधडीच पुरे म्हणतो आणि मधुरी, ती गोधडी त्याला समुद्रतीरी सापडली. वहात आली होती म्हणाला. त्याला आवडली. ती पांघरली म्हणजे मला बरे वाटते. मग मला मुळीच थंडी वाजत नाही असे म्हणतो.’
‘खरे की काय? आजी तुला एक सांगू?’
‘काय बेटा?’
‘मी मंगाला अशीच एक गोधडी शिवून दिली होती. शिंप्याकडून नाना रंगाचे तुकडे मी आणले होते. त्याची सुरेख गोधडी शिवली. मंगाला जाताना दिली. त्याला सांगितले, मंगा, माझ्या हृदयाचे तुकडे काढून ते शिवून मी ही गोधडी केली आहे.’
‘मग, ही मंगाची तर नाही गोधडी?’
‘असेल. गलबत बुडाले त्या वेळी मंगाच्या अंगाभोवती ती असेल. आजी, तू त्यांच्याजवळ ती गोधडी माग. ती मला हवी. काही कर. माझ्या मंगाचीच ती गोधडी असेल.’
‘पण त्याजवळून कशी घेऊ?’
‘धुण्यासाठी माग.’
‘बरं, बघेन.’
मधुरी गेली. म्हातारीने दिवा लावला. मंगा पांघरुणातच होता. तो ते बोलणे ऐकत होता. म्हातारी अंथरुणाजवळ आली. कपाळाला तिने हात लावला.
‘ताप आहेच.’ ती म्हाणाली.
‘तो निघणार नाही.’ मंगा म्हणाला.
‘निघेल. ताप निघेल.’
‘शेवटच्या क्षणी निघेल. तो निघेल; पण कायमचाच निघेल. मंगा मग थंड होईल. शांत हाईल.’
‘कोण मंगा? स्वप्नात का आहात तुम्ही?’
‘ती तुमची गोष्ट, ती नावेच तोंडात येतात. तो मंगा मीच असे वाटू लागते.’
‘मी तुम्हांला सांगू का, ही गोधडी अंगावरची काढून द्या. या गोधडीमुळे तुम्हांला भ्रम होत असावा.’
‘काही भूतबीत असेल का वाटते तुम्हांला?’
‘शक्य आहे. तुम्हांला ही गोधडी समुद्राकाठी सापडली. कोणी तरी पाण्यात बुडाला त्याची असेल. तो बुडणारा गोधडी शोधीत असेल किंवा त्याचे भूत असेल तिच्यात. ती गोधडी नका घेऊ अंगावर आणि सांगू का, मघा मधुरी आली होती; तिने मंगाला अशीच एक गोधडी शिवून दिली होती. मंगाचे गलबत बुडाले. ही गोधडी त्याच्या अंगाभोवती असेल. मधुरीने त्याला सांगितले होते की, माझ्या हृदयाच्या तुकडयाची ही गोधडी आहे. ही तुला तारील. सुखरूप परत आणील. मंगा तिला विसंबत नसेल; परंतु आता मंगाच्या देहाची खोळ गेली. ही गोधडी मात्र राहिली. कदाचित तीच ही गोधडी असेल. मधुरीला तसे वाटले. काय असतील धागेदोरे कोणाला माहीत? तुम्ही ती काढा अंगावरून.’