तीन मुले 144
त्याच्याजवळ मधुरीची गोधडी होती; ती त्याने अंगाभोवती घेतली. गार वारा होता. ती गोधडी पांघरून तो बसला. रात्र संपून उजाडले. दूर कोठे गलबत दिसते का तो पहात होता. एक गलबत दिसले. परंतु ते फार लांब होते त्या गलबताजवळ आपण कसे पोचणार? चालली होती नाव. मारीत होता वल्हे. लावीत होता शीड. आशातंतूवर तो जगत होता. मधुरीची मूर्ती डोळयांसमोर आणीत होता. ते गलबत दिसेनासे झाले. आशा अस्तास गेली. कोठे नाव घेऊन जात होता, तो त्याला दूर जमीन दिसली. त्याने नाव तिकडे चालविली. नाव चालवून थके. मग झोपे. स्वत:ला समुद्राच्या लाटांच्या व वा-यांच्या स्वाधीन करून ती मधुरीने दिलेली गोधडी पांघरून झोपी जाई. जणू त्याला सागरमाता सांभाळीत होती. तो सृष्टीचा बालक झाला होता. असे दिवस चालले होते.
शेवटी एकदाची मंगाची नाव एका किना-याला आली. त्याने नाव किना-याला ओढून आणली. तेथे लोक होते. इतर नावा होत्या. त्याच्याकडे सारे पहात होते. त्याने दागिने एका पेटीत ठेविले होते. सामान काढून तो तेथे उभा राहिला. लोक त्याच्याभोवती होते. इतर नावा होत्या. परंतु त्यांना त्याची भाषा कळेना व त्याला त्या लोकांची भाषा कळेना. इतक्यात एक मनुष्य तेथे आला. तो खलाशी होता. अनेक देशांच्या भाषा त्याला येत होत्या. मंगाजवळ तो बोलू लागला.
‘त्या का गलबतावरील तुम्ही? ते तर बुडाले म्हणून ऐकले.’
‘मी वाचलो. एके ठिकाणच्या लोकांनी ही लहान नाव दिली.
तिच्यात बसून निघालो. परंतु या नावेने दूर सुखरूप कसा जाणार?’
‘तुम्ही येथे राहा. थोडया दिवसांनी एक गलबत येथे येणार आहे. कदाचित ते तुमच्या देशालाच जाईल असे वाटते.’
‘तोपर्यंत मी येथे तुमच्यात राहीन.’
‘राहा.’
आणि मंगा त्या गावी राहू लागला. तो तेथे एका खानावळीत जेवायला येई. गावच्या लोकांना गोष्टी सांगे. तेथे काम करू लागला. राहू लागला. बरेच दिवस झाले. गलबत आले नाही. रोज तो येई. समुद्राकडे पाही. काही दूर दिसते का पाही. निराशेने परत येई. गावातील भाषा त्याला समजू लागली. त्याची करूण कहाणी ऐकून लोकांना वाईट वाटे. स्त्री-पुरुष रडत. लहान मुले पाहिली की त्याला घरची आठवण होई. तो लहान मुले जमवी व त्यांना खाऊ वाटी.
पुढे आले एकदा गलबत आणि ते मंगाच्या देशावरून जाणारे होते. मंगाने त्यांना काही देण्याचे कबूल केले आणि तो त्या गलबतावर चढला. गावचे लोक त्याला निरोप द्यायला आले होते. मुले टाळया वाजवीत होती.
'रडका बाबा चालला.’ कोणी म्हणाले.
‘खाऊ वाटणारा चालला.’
‘जाऊ दे आपल्या घरी. जाऊ दे आपल्या मुलामाणसांत. म्हातारे म्हणाले आणि मंगा गेला. आपण मधुरीला आता भेटू. मुलांना भेटू. या आनंदात तो होता; परंतु ओळखतील का मला असे मनात येऊन तो हसे.’