तीन मुले 51
‘आजी!’
‘काय बाळ!’
‘नीट होईल ना माझे बाळंतपण?’
‘तू माझ्याकडेच ये बाळंतपणाला. मी तरी कोणाचे करु! मलाही आनंद मिळू दे. मधुरी, माझे घर म्हणजे तुझे माहेर. येशील का? देशील का मला ही धन्यता, कृतार्थता?’
‘लोक हसतील आजी.’
‘हसतील विचारे. ज्यांना हृदये आहेत ते आनंदतील. त्यांना बरे वाटेल.’
‘मंगाला काय वाटेल माझ्या?’
‘काय रे मंगा? आजीने प्रश्न केला.’
‘मी विचार करीन.’
‘विचार रे कसला करायचा त्यात?’
‘आजी, मंगा स्वाभिमानी आहे.’
‘माझ्याकडे येऊन थालीपीठे मागणारे ते का स्वाभिमानी? तुमचा स्वाभिमान का माझ्याजवळ पोरांनो?
‘आजी, जन्मदात्यांजवळ स्वाभिमान दाखविणारी आम्ही पोरे. निदान माझ्याजवळ तुम्ही नाही दाखवता कामा. पहिले बाळंतपण तरी तुझे करु दे. तू पहिलटकरीण. तुझा धीर चेपू दे. पुढे दुस-या वेळेस मी नाही हट्ट धरणार. तुलाही भय वाटणार नाही. पहिल्याने धास्ती वाटते.’
‘येईन हो तुझ्याकडे. मंगा येऊ ना?’
‘ये.’
दोघे तेथून गेली. हळूहळू चालत होती. वाळवंटात हिंडत होती.
‘म्हातारबाईचे किती प्रेम, नाही का! जणू आई!’ मधुरी म्हणाली.
‘देव कोणाला तरी उभे करितो. नाही तर हा मंगा असा दरिद्री! तुझे कसे झाले असते! मी आता निर्धास्त झालो. मधुरी, रोज मला भीती वाटे, धाकधूक वाटे.’
‘बस जरा, दमलीस तू.’
‘त्या टेकडीवर जाऊ. आपले प्रेममन्दिर तेथे आहे.’