तीन मुले 121
‘लहानपणाच्या गंमती लहानपणाबरोबर जातात.’
‘परंतु आठवणी कायमच्या असतात. तू आता लपतेस मधुरी? मी पुन्हा तुला शोधू?’
‘आता नको शोधू.’
‘खरेच नको! तू का सापडलीस मला?’
इतक्यात मुले आली. उडया मारीत आली. मनी मागे राहिली. रडू लागली.
‘अरे, मनीला आण सोन्या. ती लहान आहे.’
‘मी आणतो मधुरी.’ असे म्हणून बुधाच गेला.
‘आई, बुधाकाका चांगले आहेत.’ सोन्या म्हणाला.
‘तुम्हांला आवडतात का?’
‘हो. पण नेहमीच का नाही ते आपल्याकडे रहात? मग मनीला घेतील. आम्हांला गोष्टी सांगतील.’
‘मधुरी, मनी आली बघ मजजवळ.’ बुधा म्हणाला.
‘तू आलास म्हणजे तिला खाऊ देतोस. गोड दिले की मुले राजी.’ मधुरी म्हणाली.
‘मोठया माणसांना काय दिले म्हणजे ती राजी होतात?’ त्याने विचारले.
‘त्यांनाही गोड मिळाले म्हणजे ती राजी होतात.’ ती म्हणाली.
‘आई, चल घरी.’ रुपल्या म्हणाला.
‘चला, दिवे लावण्याची वेळ झाली.’ मधुरी म्हणाली.
ती घरी जायला निघाली. मनी बुधाजवळ होती.
‘चालू दे तिला. लहान नाही ती आता. चल ग मने.’ मधुरी म्हणाली.
‘मी नाही चालत. मी बसते यांच्या खांद्यावर.’ मनी कुरकुरली.
‘बरे हो, नाही खाली ठेवीत तुला.’ बुधा म्हणाला.
आणि मधुरीचे घर आले. बुधा उभा राहिला.
‘ये ना आत.’ मधुरी म्हणाली.
‘जातो आता.’ तो म्हणाला.
‘जाशील. तुला घरी काय, इथे काय? आहे कोण घरी वाट पाहायला?’