तीन मुले 64
‘मला माहीत नाही.’
‘मंगा, घाबरु नकोस. बाबा दुष्ट नाहीत. मी जातो. मला जाऊ दे.’
‘मीही येतो तुझ्याबरोबर.’
‘नको बुधा, मला एकटयालाच जाऊ दे.’
‘जा तर.'
मंगा निघाला. तो सारखे मागे पाही. कोणी येत नाही असे पाहिल्यावर त्याच्या जिवात जीव येई. तो घाबरला होता. कसा तरी आला घरी. येऊन एकदम दारात पडला. मधुरी जागी होती. ती बाहेर आली. तेथे मंगा घामाघूम होऊन पडला होता. ती घाबरली. परंतु ती धीराची होती. तिने मंगाच्या डोक्यावर पाणी ओतले. डोके पुसून तिने मांडीवर घेतले. पदराने ती वारा घालू लागली. थोडया वेळाने मंगा शुध्दीवर आला.
‘आत येतोस ना राजा?’
‘ने. हात धरुन उठव मला.’
मधुरीने त्याला हात धरुन आत नेले. अंथरुणावर तिने त्याला निजवले. त्याचा सर्व घाम तिने पुसला. त्याला बरे वाटले. तरी अद्याप तो बोलत नव्हता.
‘मंगा काय रे झाले?’
‘मी घाबरलो.’
‘कशामुळे?’
‘मला भूत दिसले आज.’
‘भूत?’
‘हो.’
‘कोठे दिसले?’
‘टेकडीवर’
‘मंगा, तुला सांगितले होते की टेकडीवर जाऊ नकोस म्हणून. तू का गेलास?’
‘तुला माहीत होते टेकडीवर भूत दिसते असे?’
‘हो.’
‘कोणी सांगितले?’
‘बुधाने.’
‘हो.’