तीन मुले 59
‘आई, खाऊ देतेस?’ सोन्याने विचारले.
‘उद्या आणू सोन्या.’ आई म्हणाली.
‘रोज रोज म्हणतेस उद्या आणू.’ तो म्हणाला.
‘ही आजी आली आहे. तिच्याजवळ माग खाऊ.’
‘ही का आजी?’
‘हो.’
ये बाळ. ये माझ्याजवळ म्हणजे खाऊ देईन.’ म्हातारी म्हणाली.
‘आधी द्या खाऊ. मग येईन.’
‘नाही. तुम्ही मग देणार नाही.’
‘मोठी माणसे का खोटं बोलतील? फसवतील?’
‘हो.’
‘असे म्हणू नये.’
‘बाबा म्हणतात खाऊ देईन व पाठीत मारतात हळूच बुक्की आणि म्हणतात, हा गोड धम्मक लाडू.’
‘बरे, हा घे खाऊ.’ असे म्हणून आजीने खाऊची पुडी सोडली. तिने खडीसाखर व खारका आणल्या होत्या.
‘इतकाच? आणखी दोन खडे.’ सोन्या म्हणाला.
‘मला द्या.’ रुपल्या म्हणाला.
‘सोन्या, एकदम का सारा खायचा आहे? मी ठेवून देत्ये हो. उद्या नको का?’
‘आजी, तू रोज येशील?’ सोन्याने विचारले.