कला म्हणजे काय? 152
''खरेच हे झाड कशासाठी? काय याचा उपयोग?'' मी म्हटले.
''त्याच्यापासून तराफे बनविण्यासाठी'' सेमका म्हणाला.
''परंतु उन्हाळयात त्यांचा काय उपयोग? उन्हाळयांत त्याची तोड कोठे झालेली असते. ज्यावेळेस झाडे उभी असतात त्यावेळेस त्यांचा काय उपयोग?'' फेडकाने विचारले.
''त्यावेळेस त्यांचा उपयोग नाही.'' सेमका म्हणाला.
''का बरे हे झाड उगवते, वाढते? काय कारण?'' फेडकाने पुन्हा विचारले.
आमच्या बोलण्यात मग असे ठरले की जगातील प्रत्येक वस्तू उपयोगासाठीच म्हणून नसते. उपयुक्ततेखेरीज सौंदर्य म्हणून एक गोष्ट आहे. काही गोष्टी गोड दिसतात. सुंदर दिसतात. त्या तशा सुंदर दिसणे हाच त्यांचा उपयोग. कला म्हणजे सौंदर्य. आम्हाला ते समजले सारे असे वाटते. ते झाड का उगवते, चित्रकला कशासाठी, गाणे कशासाठी... हे फेडका समजला.
प्रोंकाचेही म्हणणे आमच्याप्रमाणेच होते. परंतु तो म्हणाला, ''जे चांगले आहे ते सुंदर आहे.'' नैतिक सौंदर्य म्हणजे सौंदर्य, साधुता म्हणजे खरे सौंदर्य, असे काही तरी त्याला वाटत होते. त्याची अशी कल्पना होती.
सेमकाच्याही डोक्यात प्रकाश पडला. तो हुशार होता. परंतु ज्या सौंदर्याचा प्रत्यक्ष उपयोग नाही, त्या सौंदर्याची त्याला कल्पना करता येईना. ज्यांची बुध्दि तर्ककठोर असते, ते संशयात असतात. सेमका संशयात पडला. कला म्हणजे एक शक्ति आहे हे त्याच्या हृदयाला पटले. परंतु ह्या शक्तीची जरूर काय ते त्याच्या बुध्दीला उलगडेना. बुध्दीने कला समजून घेण्याचा तो प्रयत्न करीत होता.
''कुणाला उद्या' हे गाणे आपण गाऊया. त्या गाण्यातील माझा भाग मला आठवतो.'' सेमका म्हणाला. सेमकाला गाण्याची जरी विशेष अभिरुचि नसली व त्यातील फारसे जरी कांही कळत नव्हते, तरी कांही सूर वगैरे त्याच्या नीट ध्यानांत राहतात. म्हणतांना तो चुकत नाही. सेमकाला जर कलेचा बौध्दिकदृष्टया उलगडा झाला नाही तरी फेडकाला मात्र समजले की झाडाला पाने असली म्हणजे ते सुंदर दिसते. फेडकाला तेवढे बस्स होते. उन्हाळयात झाड सुंदर दिसते. त्याला समजले.
प्रोकालाही समजले व अशा सुंदर झाडाला कापतात याचे त्याला वाईट वाटले. कारण त्या झाडाला जीव असतो.
''खरेच आपण जेव्हा झाडांचा चीक वगैरे काढतो, तेव्हा त्यांचे ते रक्तच घेत असतो.'' प्रोंका म्हणाला.
सेमका कांहीएक बोलला नाही. जिवंत व रसयुक्त झाडाचा उपयोग काय हेच त्याच्या लक्षात येत नव्हते. झाड वाढले, मेले, म्हणजेच त्याचा खरा उपयोग. मग त्याचे तराफे करता येतील.
त्यावेळी आम्ही कायकाय बोललो ते सारे पुन्हा सांगणे जरा चमत्कारिक व विचित्र वाटत आहे. परंतु उपयुक्तता, सौंदर्य, सारे काही निघाले होते.