कला म्हणजे काय? 17
हेगेलच्या मते सत्य व सौंदर्य एकच आहेत. फरक इतकाच की मूलभूत निराकार अविकृत कल्पना म्हणजे सत्य व ती कल्पना साकार करणे म्हणजे सौंदर्य. सत्याला प्रकट केल्याने ते अधिकच यथार्थपणे आपण समजतो इतकेच नव्हे तर ते प्रिय वाटू लागते, गोड व सुंदर दिसू लागते. मूळ सत्य स्वरूपाचे बाह्य आविष्करण म्हणजे सौंदर्य होय.
वेसी, अनौंल्ड रूगे, रोझेन क्रँस, थिओडर व्हिशर वगैरे हेगेलच्याच मताचे पुरस्कर्ते व अनुयायी आहेत.
वेसी (१८०१ ते १८६७) सौंदर्याची जी अंतिम आध्यात्मिक सत्यता ती ह्या सोपाधिक सृष्टीत आणणे म्हणजे कला होय. या जड, नीरस व मुर्दाड सृष्टीत जर ही सुंदरता आणली नाही, तर ही सृष्टी भयाण स्मशानच वाटेल. वेसीचे म्हणणे असे की सत्याच्या कल्पनेत विरोध आहे. ज्ञानाच्या व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा दोन बाजू आहेत व ह्या दोहोंत विरोध आहे. व्यक्तीचा अहंविश्वाला विलोकू शकतो-हा विरोध भासतो; परंतु हा खरा निसून विरोधाभास आहे. या विरोधाचा परिहार करता येईल. सत्याच्या कल्पनेत व्यक्ति व विश्व ह्या ज्या दोन विभिन्न कल्पना असतात, त्या एकत्र आणल्याने हा विरोध विरून जाईल. असे हे एकीकरण म्हणजेच परस्परानुकूल परस्पराश्रयी व परस्परपूरक सत्य म्हणजेच सौंदर्य.
अर्नोल्ड रूगे (१८०२-१८८०) हा हेगेलचा कट्टा अनुयायी आहे. स्वत:ला प्रकट करणारे ज्ञान म्हणजेच सौंदर्य. ज्यावेळेस ज्ञान आपण होऊन स्वत:ला प्रकट करते, त्यावेळेस तेथे सौंदर्य निर्माण होते. स्वत:चे चिंतन करणारा आत्मा एक दिवस स्वत:ला पूर्णपणे प्रकट करतो. हे जे स्वत:चे आविष्करण, पूर्णप्रकटीकरण-तेच सौंदर्य. आत्म्याचे कधी कधी अर्धवट आविष्करण होत असते. ह्या सदोष व अर्धवट प्रकटीकरणाला पूर्ण व निर्दोष करण्यासाठी जो व्यापार, जी चेष्टा, जो धडपड आत्मा करितो, ती जी विधात्री चेष्ठा, तीच कला होय.
व्हिलर (१८०७ ते १८८७). हा म्हणतो अनंताने शांतरूपाने प्रकट होणे म्हणजेच सुंदरता. मूलज्ञान हे काही अखंड, सलग, अविभाज्य असे नाही. मूलज्ञान म्हणजे अनेक कल्पनांचे मेळावे. ह्या कल्पना उतरत्या, चढत्या रेषांनी दाखविता येतील. कल्पना जितकी वरची, जितकी उंच-तितकी ती अधिक सुंदर होय. परंतु अत्यंत नीच अशा खालच्या कल्पनेतही सौंदर्य असतेच. कारण ती क्षुद्र कल्पनाही त्या अत्यंत कल्पनासागरांतीलच एक आहे. ज्ञानाचे सर्वोच्च मूर्त स्वरूप म्हणजे श्रेष्ठ व्यक्तित्व होय. ज्या कलेचा परमोच्च व्यक्तित्व हा विषय असेल, ती कला सर्वश्रेष्ठ होय.
हेगेलच्या परंपरेत वाढलेल्या सौंदर्यमीमांसकांची ही अशी मते आहेत. सौंदर्य विषयक विचारांचा सारा मक्ता यांनीच घेतला असे नव्हे. जर्मनीत हेगेलच्या अनुयायांबरोबरच दुसरेही भिन्न विचारसरणीचे विद्वान वावरत होते. हेगेलच्या मतांहून ह्यांची मते स्वतंत्र होती. ज्ञानाचे मूर्तस्वरूप म्हणजे सौंदर्य ह्या मताविरूध्द त्यांचे मत होते. हेगेलच्या मतांची त्यांनी टर उडविली आहे व ती झुगारून दिली आहेत. हर्वार्ट व विशेष करून शौपेनहार यांनी हेगेलच्या विरूध्द विचारसरणी मांडिली आहे.
हर्बार्ट (१७७६-१८४१) हा म्हणतो की, केवळ सौंदर्य अंतिम सत्य ह्या अर्थी अस्तित्वांत असणे शक्य नाही. वस्तूशिवाय सौंदर्याची कल्पनाच करणे अशक्य आहे. सौंदर्य हे कशात तरी राहते. निराधार व निरालंब सौंदर्य कोठे राहणार? जे काही आहे ते आपले मत आहे, आपला विचार आहे. हे आपले मत कसे बनते, त्याचा उगम कोठे आहे, हे पाहणे जरूरीचे व महत्त्वाचे आहे. आपल्या इंद्रियांवर जे ठसे उठतात, जे संस्कार होतात-त्यांतून आपली मते तयार होत असतात. आपण काही संबंधांना सुंदर अशी संज्ञा देतो. हे संबंध शोधून काढणे हे कलेचे काम आहे. हे संबंध चित्रांत, पुतळयांत किंवा शिल्पांत एकसमयावच्छेदेंकरून राहतात. एकदम एका क्षणात ते प्रतीत होतात. संगीतात हे संबंध क्रमाने व एकदम-दोन्ही त-हेने प्रतीत होतात. काव्यात हे संबंध क्रमवारच असतात. पूर्वीच्या सौंदर्यमीमांसकांविरूध्द हर्बार्टचे असे म्हणणे आहे की, जे पदार्थ काहीच दर्शवीत नाहीत, ते पदार्थ रमणीय नसतात असे नाही. उदाहरणार्थ इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्याची सुंदरता, रंग व रेखा यात आहे, इंद्रधनुष्यासंबंधीच्या ज्या नाना दंतकथा व कल्पना आहेत, त्याममध्ये ती नाही.