कला म्हणजे काय? 123
एखाद्या धबधब्याचा उपयोग करून त्याच्यापासून वीज निर्माण करून त्यामुळे आपणास प्रचंड कारखाने चालविता येतात, किंवा पर्वतातून आपण बोगदे खणतो, असल्या गोष्टींचा अर्वाचीन शास्त्रज्ञांस व स्थापत्यविशारदांस फार अभिमान वाटतो. पहा शास्त्राची अचाट करणी-असे ते म्हणतात. परंतु दु:खाची गोष्ट एवढीच की ह्या धबधब्याच्या शक्तीचा उपयोग मजुरांच्या हितार्थ त्यांची स्थिति सुधारावी म्हणून न होता, जे आधीच श्रीमंत आहेत त्यांना अधिक श्रीमंत करण्याकडे होत असतो. जे भांडवलवाले ऐषआरामाच्या वस्तू निर्माण करितात तेच मनुष्याचा संहार करणारी जी युध्दे त्या युध्दाची शस्त्रेही तयार करितात! ज्या हाताने बिस्किट बनवायचे त्याच हाताने बाँब बनवायचा! जी युध्दे बंद व्हावीत, ज्या युध्दापासून आपण परावृत्त व्हावे, ज्यात आपण भाग घेता कामा नये अशा युध्दार्थ हे भांडवालवाले तोफा ओतीत असतात, दारूगोळा बनवीत असतात! युध्दे बंद व्हावीत असे त्यांना वाटतच नसते. युध्दांचे सदैव सिध्द राहणे हेच अपरिहार्य आहे असे मानण्यात येत असते. पर्वतातून ज्या डायनामाइटने बोगदे खणल्याबद्दल यांना अभिमान वाटतो, त्याच डायनामाइटने युध्दात हजारो मारले जातात याचाही त्यांना अभिमान वाटत असतो! असे जे हे सत्तावाले व संपत्तिवाले वर्ग त्यांनाच ह्या शोधाचा उपयोग. आधीच श्रीमंत असलेला अधिक श्रीमंत होतो, आधीच बलवान असलेला अधिक बलवान होतो.
आपणास आज प्लेगची किंवा देवीची लस टोचून रोगप्रतिबंध करता येतो; क्ष-किरणामुळे पोटात गेलेली टाचणी किंवा सुई किंवा शरीराच्या आतील घडामोडी, मोडतोड हे पाहता येणे शक्य झाले आहे. विजेच्या उपचाराने फोंक आलेल्या माणसाला सरळ करता येत असेल; महारोग किंवा उपदेशादी रोग कदाचित् बरे करता येऊ लागले असतील; आश्चर्यकारक अशा शस्त्रक्रिया करता येऊ लागल्या असतील; या सर्वांचा अर्वाचीनास अभिमान वाटतो. मनुष्याचे जीवन सुखमय करण्याची किती साधने संशोधिली गेली असे वाटते, परंतु आपण जर क्षणभर ख-या शास्त्राचा हेतू ध्यानात घेऊ तर या सर्व सुधारणांचा फारसा अभिमान आपणास वाटणार नाही. आज केवल कुतूहलाच्या, जिज्ञासेच्या किंवा यांत्रिक सुधारणांच्या गोष्टींच्या बाबतीत जेवढे श्रम केले जातात, जो उत्साह दाखविला जातो, जेवढा अभ्यास केला जातो, त्याचा दशांशही मानवी जीवनाची नीट पुनर्रचना करण्याचे जे खरे शास्त्र त्यात खर्च केला असता, तर आज जेवढे आजारी पडतात त्यांच्यापैकी निम्याहून अधिक आजारीच पडते ना. आज आजारी पडणा-यांपैकी फारच थोडयांना औषधांचा उपयोग होतो, फारच थोडयांना ते क्ष-किरण मिळतात; आणि ज्या फार थोडयांना यांचा फायदा मिळतो, त्यांतीलही फारच थोडे चांगले बरे होतात, फारच थोडे जगतात. दवा मिळूनही दगावणारेच पुष्कळ. जीवनाचे शास्त्र सुधारले असते तर आजारीच कोणी ना पडते. लोक आजारी का पडतात? मजूर व शेतकरी यांना अपरंपार काम करावे लागते, परंतु पोटभर खावयास मिळत नाही; थंडीत पांघरावयास मिळत नाही म्हणून मरतात. ह्यांच्या पोटातील जठराग्नि त्याला पुरेशी आहुति न मिळाल्यामुळे त्या मजुरांची शरीरेच जाळू लागतो. आणि ते श्रीमंत-त्यांचा जठराग्नि प्रदीप्तच होत नाही, म्हणून ते आजारी पडतात. श्रीमंत फार खायला असल्यामुळे व काम करावयास नसल्यामुळे आजारी पडतात, आणि गरीब शक्तीबाहेर काम करावे लागल्यामुळे व खायला पोटभर नसल्यामुळे आजारी पडतात. नैसर्गिक जीवनाचा अभाव हे आजारीपणाचे कारण आहे. मुळीच काम नसणे किंवा अति काम असणे-दोन्ही गोष्टी सृष्टिनियमाविरुध्द आहेत. असले हे सामाजिक जीवन बदलणे हे पहिले काम आहे. शास्त्राने या गोष्टींचा आधीं निकाल लावला पाहिजे. जीवनाचे शास्त्र, सामाजिक रचनेचे शास्त्र जर नवीन रचले जाईल तर फिकट व कलाहीन मुले दिसणार नाहीत, मृत्यु मुलांचे लक्षावधी बळी लहानपणीच घेणार नाही; पिढयानपिढया होत चालणारा शारीरिक -हास बंद होईल. वेश्याव्यवसाय बंद होऊन घाणेरडे व भयंकर रोग-जे पुढच्या पिडीलाही भोगावे लागतात, आपल्या निष्पाप मुलाबाळांना भोगावे लागतात-असले रोग अदृश्य होतील, नाहीसे होतील. युध्दात कोटयावधी लोकांचे उगीचच्या उगीच खून होणार नाहीत; युध्दापासून ह्या मूर्खपणाच्या व आततायी युध्दापासून उत्पन्न होणारे दुसरे शेकडो दुष्परिणाम तेही मग नाहीसे होतील. या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. हे सारे होणे आवश्यक आहे. समाजाची नीट रचना झाली तर हे सारे घडून येईल. समाज सुंदर होईल, परंतु ह्या गोष्टी म्हणजे शास्त्र असे कोणाला वाटतच नाही. उलट काही विद्वान शास्त्रज्ञ म्हणतात की, ''ह्या सर्व आपत्ति मानवी जीवनास आवश्यकच आहेत, युध्दे नसतील तर शौर्य, धैर्य, त्याग प्रकट होणार नाहीत; रोग नसतील तर रोगांजवळ झगडण्याचे धैर्य दाखविता येणार नाही. दुर्गुण नसतील तर सद्गुणांचे खरे तेज दिसणार नाही, जगात प्रकाशाइतकीच अंध:काराची पण जरूरच आहे!'' आजचे शास्त्र बेशरमपणे असे सिध्दांत मांडीत असते.