कला म्हणजे काय? 4
मी जें वर वर्णन केलेले दृश्य पाहिलें त्याहून किळसवाणा प्रकार दुसरा क्वचितच असेल. गाडीतून मजूर माल काढीत असतात त्यावेळेस एका मजुराच्या अंगावर जर जास्त भार पडला, तर तो दुस-या मजुरावर रागावतो व त्याला शिव्या देतो. गवत नीट रचलें गेलें नाहीं म्हणून तें रचणा-यावर खेडयांतील पाटील रागावतो व तो मजुर तें मुकाटयानें सहन करितो. मजुराला शिव्या दिलेल्या ऐकतांना जरी मनाला बरें वाटलें नाहीं, तरी त्यावेळेस तें ओझें नीट सावरणें, ती गंजी नीट रचणें- हीं जीं कामें होत होतीं- तीं महत्वाचीं, आवश्यक व जीवनोपयोगी अशीं होतीं- या विचारानें मनाला तेवढा धक्का बसत नाहीं.
परंतु या नाटकगृहांत जे प्रकार व जे खेळ चालले होते, त्यांचा उद्देश काय ? हें सारें कोणासाठी चाललें होतें ? त्या रंगभूमीच्या पाठीमागें जो एक अत्यंत थकलेला मजूर मी पाहिला होता, त्याच्याइतकाच छडया वाजवून व ओरडून व्यवस्थापकहि थकून गेला होता, परंतु हया व्यवस्थापकाला इतकें थकून जावयास कोणी सांगितलें होतें, इतकें घामाघूम होण्यास कोणी भाग पाडलें होते. ’ हे सारे श्रम तो कां घेत होता ?
जें संगीत नाटक तेथें करण्यांत येत होतें, तें अत्यंत सामान्य असें होतें. ज्यांना थोडी फार संवय व थोडा फार अभ्यास आहे, अशांना तें करुन दाखविणें कठीण नव्हतें. तें नाटक म्हणजे कल्पनातील बाष्कळपणा होता. ना त्यांत अर्थ, ना रस. एका इंडियन राजाला लग्न करावयाचें असतें. लोक त्याला एक वधू आणून देतात. राजा भाटाचा वेष घेतो. वधू त्या भाटावर भाळते व निराश होते. शेवटीं तिला कळून येतें कीं राजा व भाट हे एकच- आणि आनंदी आनंद मग होतो.
असे इंडियन असणें शक्य नाहीं व असे नव्हतेहि. परंतु रंगभूमीवरचे लोक इंडियन लोकांसारखे नव्हते इतकेंच नाही तर जें जें कांही करुन दाखवीत होते, तसे या जगांत त्या नाटकगृहाव्यतिरिक्त अन्यत्र कुठेंही दिसून आलें नसतें. लोक बोलतात, ते का संगीतांत बोलतात ? लोक चालतात, तेव्हां का अंतर मोजून मापून घेऊन चालतात ? स्वत:च्या भावना दाखवण्यासाठी असे का कोणी नाचतात व हातपाय वर खालीं करितात ? नाटकगृहाशिवाय कुठेंहि जगांत या प्रकारें चालत नाहींत, बोलत नाहींत. खांद्यावर कु-हाडी टाकून, पिंवळे बूट पायांत घालून जोडीजोडीनें कोणी जात नाहीं, हिंडत नाहीं. नाटकांत दाखवतात त्या पध्दतीनें कोणी रागावत नाहीं, त्यापध्दतींने कोणी दु:खी दिसत नाहीं; तसें कोणी रडत नाहीं, तसें कोणी हंसत नाहीं. असले हे खेळ पाहून कोणाचेंहि हृदय हेलावणार नाहीं, उचंबळून येणार नाहीं-ही गोष्टहि तितकीच खरी.
म्हणून प्रश्न असा उभा राहतो-हें सारें कशासाठी व कोणासाठीं ? हें नाटक पाहून कुणाचें मन रिझेल, कुणाचें मन सुखावेल ? संगीतांत जर मधून मधून आलाप असतील, तर ते हया इतर बाष्कळपणाला वगळून नाहीं का गाऊन दाखवितां येणार ? त्यासाठीं हे विचित्र पोषाख, हया मिरवणुकी, हे पडदे, ही सोंगें, हें हातपाय हलविणें-हयांची काय आवश्यकता ?
असल्या या संगीत नाटकांत अर्धवट नग्न अशा स्त्रिया कामोद्दीपक हावभाव करीत असतात; शरीराला नानाप्रकारचे आळेपिळे देऊन नाना अवयव दाखवीत असतात व भावना उद्दीपित करितात; प्रेक्षकांच्या मनांत भोगेच्छा व विषयवासना बेफाम जागृत करणें अशासाठीं हें नाटक असतें. असलें हें नाटक म्हणजे प्रत्यक्ष नरकदर्शन होय. हें नाटक म्हणजे विषयविलासांचें प्रदर्शन होय, कामुकतेचा नंगा नाच होय !
हें सारें कोणासाठी करण्यांत येतें तें समजतच नाहीं. सुसंस्कृत मनुष्याला तर मनापासून याची किळस येते; आणि जो खराखुरा हाडाचा मजूर आहे, त्याच्याहि समजण्याच्या शक्तीच्या पलीकडचें हे सारें असतें. जर कधीं कुणाला हें पाहून आनंद वाटतच असेल (तें असंभवनीयच आहे) तर तो एखाद्या श्रीमंत सरदाराच्या शिपायाला, किंवा एखादया भ्रष्ट कारागिराला वाटणे कदाचित् शक्य असेल. त्या शिपायाला व त्या कारागिराला वरच्या उच्च समजल्या जाणा-या वर्गाचें वारें लागलेंलें असतें, परंतु त्या श्रीमंत लोकांच्या सुखसमाधानाशीं, करमणुकीच्या साधनाशीं त्यांची गांठ पडत नाहीं. आपण उच्च वर्गाचे आहोंत हें दाखविण्याची तर त्यांना अतोनात इच्छा असते; आणि म्हणून ते असल्या बीभत्स व ओंगळ तमाशेवजा नाटकादिकांस जाऊन आपली कलाभिज्ञता प्रकट करीत असतात; तीं नाटकें पाहतांना तोंडावर हास्य वगैरे आणून आपण किती रसज्ञ आहोंत हें ते दाखवीत असतात.