कला म्हणजे काय? 51
बोर्केशियोपासून तो मार्सेल प्रेव्हॉस्टपर्यंत, कादंब-या, नाटके, कविता या सर्वांत जिकडेतिकडे वैषयिक प्रेमच निरनिराळया रंगांत व रूपांत वर्णिलेले आढळून येईल. व्याभिचार हाच सर्व कादंब-या आवडता विषय-एकमेव विषय. नाटकांतील कोणत्याही प्रयोगांत कोणत्यातरी सबबीखाली स्कंद, स्तन व इतरही भाग उघडे करून जर स्त्रिया रंगभूमीवर आल्या नाहीत तर तो प्रयोग पूर्ण झाला असे समजण्यात येत नाही. काव्ये घ्या वा नाटके घ्या, काहीही घ्या, सर्वत्र विलासांचे, विषयेच्छेचे विशदीकरण केलेले आढळून येईल. सर्वत्र अनंगाचा नंगा नाच चाललेला दिसेल. नानाप्रकारांनी या एकाच भावनेची पूजा केलेली दिसून येईल.
फ्रेंच चित्रकारांची पुष्कळशी चित्रे नाना स्वरूपांत स्त्रियांची दिगंबरता दाखविण्यासाठीच जणू काढलेली असतात, अलीकडच्या फ्रेंच वाङ्मयात असे क्वचितच एखादे पान असेल, असे क्वचितच एखादे गान असेल की जेथे नग्नतेचे वर्णन नाही; जेथे सुसंबध्द या असंबध्द रीतीने नग्नतेचा जो आवडता विचार, नग्न हा जो आवडता शब्द तो दोन-चार वेळा तरी उच्चारला गेला नाही. रेमी डी गौर्मेट म्हणून कोणी एक फ्रेंच लेखक आहे. तो आपले लिखाण वरचेवर छापून काढीत असतो व तो मोठा हुशार आहे असे म्हणतात व मानतात. याची एक कादंबरी मी वाचली. वरच्या वर्गातील एका सभ्य (?) गृहस्थाचे अनेक स्त्रियांशी कसे अनैतिक संबंध होते, त्यांचे सविस्तर व सांगोपांग वर्णन त्या कादंबरीत दिलेले आहे. प्रत्येक पानावर विषयवासनांना चेतविणारी वर्णने आहेत. तसेच पिअरी लोईचे एक फार लोकप्रिय असलेले पुस्तक मी वाचले. त्यातही असेच सारे तमाशेवजा वर्णन. तिसरे एक हुइसमनचे पुस्तक सहज हाती आले-ते तसेच. थोडयाफार फरकाने सर्व फ्रेंच कादंब-यांत हाच प्रकार आहे म्हणाना. विषयरोगाने पीडिलेल्या, विषयवेडाने वेडावलेल्या, विषयसेवनार्थ हपापलेल्या, विषयप्राप्ति न झाल्यामुळे दु:खी झालेल्या-अशा विषवैकरतच लोकांचीच वर्णने या सर्व कलाकृतींतून आहेत. अशा प्रकारे ज्यांचे जीवन विषयरोगाने ग्रस्त झाले आहे, नाना प्रकारची वैषयिक सुखे धुंडून काढण्यांतच ज्यांचे सारे जीवन व्यर्थ जात आहे, एतदर्थच ज्यांची सारी धडपड, याच ध्येयावर ज्यांची दृष्टी सदैव खिळलेली, अशा लोकांना मग साहजिकच असे वाटते की, सारे जग आमच्यासारखेच असणार. कावीळ झालेल्याला सारे जग पिवळेच दिसणार! आज सा-या युरोपभर व तिकडे अमेरिकेतही या विषयपिपासेने पीडिलेल्यांचेच सर्वत्र अनुकरण होत आहे!
ज्या जीवनांत श्रध्दा नाही, ज्या जीवनांत श्रम नाही, ज्या जीवनांत केवळ सुखोपभोग खच्चून भरून राहिला आहे, असे मानवांस न शोभणारे व सर्व मानवांस न मिळणारे अपवादात्मक जीवन या श्रीमंत लोकांचे असल्यामुळे त्यांच्या कलेलाही वर ज्या तीन भावना सांगितल्या, तेवढयांचाच विषय मिळाला; आणि त्यांतील भावनांतही पुन्हा रतिभावना हीच प्रमुख होऊन बसली. अहंकार, जीवनाचा कंटाळा व सर्वात अधिक म्हणजे विषयवासनाच्या तीन भावना देणे, या जागृत करणे, हेच वरच्या वर्गातील लोकांच्या कलेचे काम राहिले.