कला म्हणजे काय? 120
प्रकरण एकोणिसावे
(शास्त्रे व कला यातील संबंध; असत्य व खोटी शास्त्रे, क्षुद्र शास्त्रे; मानवी जीवनाचे जे महान् प्रश्न त्यांचा शास्त्राने उहापोह करावा व कलेला पायाभूत व्हावे.)
कला हा माझ्या अंतरंगाचा विषय, हा माझा जिव्हाळयाचा विषय, गेली पंधरा वर्षे या एकाच विषयाला मी दिली आहेत व माझ्यात होती नव्हती ती सारी शक्ती खर्च करून हा ग्रंथ मी लिहिला आहे. जितक्या उत्कृष्टपणे लिहिता येणे मला शक्य होते, तितक्या उत्कृष्टपणे तो मी लिहिला आहे. पंधरा वर्षे मी ह्या कामात गढून गेलो होतो, याचा अर्थ हा नव्हे की सारखा पंधरा वर्षे लिहीत होतो. एकदा हे काम मी अंगावर घेतले म्हणजे खंड न पडता ते पुरे करण्यास मी समर्थ होईन असे वाटून मी कलेवर लिहावयास आरंभ केला; परंतु पंधरा वर्षांपूर्वी या विषया संबंधीचे विचार माझे मलाच स्पष्ट नव्हते व स्वत:स संतोष होईल अशा रीतीने त्यांची जुळणी व मांडणी मला करता येईना, त्यावेळेपासून या विषयाचा मी सदैव विचार करीत होतो, पुन्हा पुन्हा मी लिहावयास आरंभ करी; परंतु पुन्हा पुन्हा तो आरंभ बंद करावा लागे. काही भाग लिहून काढावा व समाधानकारक त-हेने त्याचा शेवट करता न आल्यामुळे पुन्हा ते काम बाजूस पडावे असे चालले होते. परंतु आज मी हे काम हातावेगळे करीत आहे. हे काम कितीही अपूर्ण असले, सदोष असले, असमाधानकारक असले, मनासारखे उतरले नसले, तरी आपल्या सामाजिक कलेने जी चुकीची दिशा घेतली आहे व ज्या चुकीच्या दिशेने ती चालली आहे, त्यासंबंधीचे व कलेचे ध्येय काय यासंबंधीचे माझे महत्त्वाचे विचार बरोबर आहेत अशी मला अशा वाटते. आणि म्हणून माझा हा ग्रंथ अगदीच निरुपयोगी होणार नाही; त्याचा काहीतरी समाजाला उपयोग होईल असे मला वाटते. परंतु हे असे व्हावे व कलेने घेतलेला असन्मार्ग सोडावा आणि नवपंथ घ्यावा यासाठी आणखीही एका गोष्टीची आवश्यकता आहे. कलेइतकाच महत्त्वाचा दुसराही एक दैवी मानवी व्यापार आहे, त्याला शास्त्र म्हणतात. कला शास्त्रावर अवलंबून असते. अतिशय अवलंबून असते. कलेचा शास्त्राशी फार निकट संबंध आहे. आजच्या शास्त्रानेही चुकीचा मार्ग घेतलेला आहे. कलेने चुकीचा मार्ग सोडावा म्हणून शास्त्रालाही सोडावा लागेल. कारण कला शास्त्रानुसारिणीच असणार व असते. कलेप्रमाणे आजच्या शास्त्रानेही स्वीकृत असन्मार्गाचा त्याग करावयास तयार झाले पाहिजे.
फुप्फुसे व हृदय यांचा जितका निकट संबंध आहे, एकात बिघाड होताच दुस-यातही बिघाड होतो हे असे व जितके खरे, तसेच कला व शास्त्र यांच्या संबंधाच्या बाबतीत आहे. एक बिघडले तर दुस-याचेही कार्य बिघडल्याशिवाय राहणार नाही.
त्या त्या काळात समाजाला जे जे ज्ञान महत्त्वाचे वाटत असते त्या त्या ज्ञानाचे संशोधन करून ते ज्ञान मनुष्याच्या बुध्दीला स्पष्ट व स्वच्छ करून द्यावयाचे हे शास्त्राचे काम असते. ही शास्त्रानिर्णित व शास्त्रसिध्द सत्ये कला हृदयगम्य करिते. बुध्दीच्या प्रांतातील ह्या वस्तू कला हृदयाच्या प्रांतात आणून सोडते म्हणून शास्त्राने निवडलेला मार्ग जर चुकला तर कलेचेही पाऊल चुकीचेच पडणार हे उघड आहे. शास्त्र म्हणजे कलेच्या नौकेचे सुकाणू होय.
खरे पाहिले तर कोणत्याही प्रकारची भावना देणे म्हणजे तो कलाव्यापारच होतो. परंतु आपण कलेचा अर्थ मर्यादित केला आहे. महत्त्वाच्या भावना देणारी ती कला-असे आपण निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे शास्त्राचेही, कोणतेही ज्ञान देणारे ते वास्तविक पाहिले तर शास्त्रच समजले पाहिजे. परंतु शास्त्रालाही मर्यादा घातली आहे. महत्त्वाचे ज्ञान देणारे ते शास्त्र असे आपण समजतो.