कला म्हणजे काय? 140
बलामप्रमाणे या प्रेमशरण मुलीला शाप देण्यासाठी तो आला होत; परंतु कलादेवीने त्याला परावृत्त केले. त्याच्या तोंडातून शापवचन बाहेर न पडता आशीर्वादच बाहेर पडतो. चेकॉव्हची इच्छा नसताही अशा सुंदर व दिव्य पोषाखांत डार्लिंग सजवली गेली आहे की ती गोड मुलगी स्त्रीजातीचा सुंदर आदर्श म्हणून राहील. स्वत: कृतार्थ व सुखी व्हावे आणि ज्यांच्या ज्यांच्याजवळ दैवाने गाठी पडतील त्यानाही सुखवावे हे जे स्त्रीचे घोर ध्येय त्या ध्येयाची चारू, मधुर मूर्ति म्हणून डार्लिंग साहित्यात सदैव राहील.
ही गोष्ट फारच उत्कृष्ट आहे, कारण तिचा जो परिणाम होतो तो अहेतुक आहे, अनैच्छिक आहे. ग्रंथकाराची जणू मनापासून इच्छा नसताना तो पडून येत असतो म्हणून अधिकच मधुर वाटतो.
मॉस्कोला सायकलवर व घोडयावर बसाला शिकविणारी एक शाळा होती. त्या ठिकाणी लष्करी पलटणींच्या मुलाखती वगैरे होत असत. मी त्या शाळेच्या रंगणांत सायकलवर बसायला शिकत होतो. एके दिवशी मी सायकल चालवीत होतो व कांही अंतरावर एक स्त्रीही बसायला शिकत होती. दोघांच्या सायकली एकत्र येऊ नयेत म्हणून मी जपत होतो. मनात विचार होता की सायकली एकमेकांवर आदळल्या तर आपण पडू, विशेषत: त्या स्त्रीलाही त्रास होईल. परंतु डोळे तर तिच्याकडे होते! मनांत होते एक व डोळयांची दुसरीच इच्छा होती. तिच्या सायकलपासून दूर राहण्याची इच्छा करणारा मी नकळत तिच्याजवळ जात चाललो! शेवटी तिच्या इतका जवळ गेलो की ती घाबरली. सायकलला सायकल लागू नये, एकमेकांचा धक्का लागू नये म्हणून ती धडपड करू लागली. परंतु शेवटी माझा धक्का तिला लागलाच व ती खाली पडली! म्हणजे जे करण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, तेच झाले. माझ्या इच्छेच्या अगदी विरुध्द गोष्ट मला नकळत माझ्या हातून घडली. कारण माझे सारे लक्ष जणू तिच्यावरच खिळले होते.
चेकॉव्हच्या बाबतीत असेच झाले आहे. परंतु जरा निराळया त-हेने. मी पाडण्याची इच्छा नसताना त्या स्त्रीला पाडले. चेकोव्हची पाडण्याची इच्छा असून त्याने चढविले. बुध्दीच्या डोळयांनी तो आरंभ करतो. परंतु कवीच्या डोळयांनी शेवटी पाहू लागलो. जिला पाडण्यासाठी त्याचे हात उभारले गेले होते, तिला त्याचे हात वर चढवितात!
३
कलेतील सत्य
(मुलांची फुलबाग या गोष्टीच्या संग्रहाचीप्रस्तावना)
''अरे सापाच्या पिलांनो! तुम्ही दुष्ट आहात, क्रूर आहात... चांगल्या गोष्टी तुम्हाला कशा बोलता येतील? जे तुमच्या पोटात आहे, तेच तुमच्या ओठांतून बाहेर पडणार. सज्जन आपल्या हृदयांतून चांगल्या वस्तू बाहेर काढतो, दुष्ट वाईट वस्तू बाहेर काढतो. मी तुम्हाला स्पष्ट बजावून ठेवितो, साफ साफ सांगून ठेवितो की जे कांही तुम्हाला बोलाल, त्याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल; त्या निकालाच्या दिवशी जे जे वायफळ, वाईट व निरूपयोगी तुम्ही बोलला असाल त्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल; तुमच्या बोलण्यावरून तुमची परीक्षा केली जाईल. तुमच्या शब्दांनी तुम्ही तराल, तुमच्या शब्दांनीच तुम्ही मराल.'' मॅथ्यू- १२ (३४-७)
या मुलांच्या फुलबागेत काही गोष्टी अशा आहेत की ज्यांतील हकीगती खरोखर घडलेल्या आहेत; परंतु अशा गोष्टींशिवाय दुस-या पुष्कळ आहेत की ज्यांना दंतकथा, आख्यायिका, काल्पनिक गोष्टी असे स्वरूप आहे. या सर्वांची रचना मनुष्याच्या कल्याणासाठी व हितासाठीच आहे.
ख्रिस्ताच्या शिकवणीला अनुकूल अशाच गोष्टी निवडून काढिल्या आहेत. म्हणून त्या चांगल्या व सत्य आहेत.
पुष्कळ लोक, विशेषत: मुले जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट ऐकतात किंवा वाचतात, तेव्हा प्रथम विचारतात, ''हे खरे आहे का? खरोखरीच आहे का ही गोष्ट? असे खरेच घडले होते का?'' वर्णन केलेले खरोखर घडणे शक्य नाही असे जेव्हा त्यांना दिसते, तेव्हा ती पुष्कळदा मग म्हणतात ''हे तर मग सारे खोटे एकूण, खरे नाही काही?''