कला म्हणजे काय? 151
''तिचा गळा त्याने कापला. तेथे रक्ताचे तळे साचले. परंतु तेथून तो निघून जाईना. ते क्रूर कृत्य करून तो तेथेच उभा राहिला. मी असतो तर पळून गेलो असतो.'' असे फेडका म्हणाला व माझी बोटे त्याने जास्तच घट्ट धरली.
आम्ही त्या लहानशा झुडपांजवळ उभे होतो. गावाची खळी आता जवळच होती. सेमकाने एक वाळलेली काठी उचलून घेतली व थंडीने गारठलेल्या एका झाडाला झोडपू लागला. झाडावरचे बर्फ आमच्या टोप्यांवर उडू लागले. त्या झाडावर मारलेल्या काठीचा आवाज त्या जंगलांतील शांतीत, त्या रानमाळी शांतीत घुमून राहिला.
''निकोलव्ह!'' एकदम मला फेडकाने हाक मारिली. पुन्हा आत्याच्या खुनासंबंधी विचारतो की काय असे मला वाटले. ''निकोलव्ह, मनुष्य गाणे का हो शिकतो? माझ्या मनात पुष्कळ वेळा आपले येते की लोक गाणे का शिकतात? खरेच, का बरे शिकतात?''
खुनाच्या भेसूर प्रसंगातून फेडका एकदम संगीतात कसा उतरला? देवाला माहीत. परंतु त्याने तो प्रश्न अशा काही आवाजात विचारला होता की त्याला उत्तर देणे भाग होते. दुसरी दाघे मुलेही सावधान चित्ताने ऐकत होती. ती मुकी होती. परंतु त्यांनासुध्दा त्या प्रश्नांत अर्थ व गंभीरता वाटत होती. त्यांच्यासमोर वृत्तीवरून मघाच्या त्या खुनाच्या वगैरे गोष्टी व संगीत यांत काहीतरी खराखुरा संबंध असावा असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही. गोष्ट सांगताना, केव्हातरी मी म्हटले होते की शिक्षणाचा अभाव म्हणून हे खून होतात. त्या माझ्या सांगण्यातून तर हा प्रश्न नसेल स्फुरला? का फेडका स्वत:चे अंतर्निरीक्षण, हृदयपरीक्षण करीत होता? त्या खुनी माणसाच्या मनोवृत्तीत तो स्वत:ला दवडीत होता का? त्या स्थितीत स्वत:ला घालून स्वत:ची आवडती जी गानप्रवृत्ति तिची स्मृति होऊन तर त्याने हा प्रश्न विचारला नसेल! फेडकाला आवाजाची देणगी होती. फारच सुधर व गोड त्याचा आवाज होता. का आत्ताच ख-या संभाषणाची वेळ आहे, सारे हृद्गत बोलण्याची वेळ आहे, ज्या ज्या प्रश्नांची उत्तरे पाहिजेत ते सर्व प्रश्न विचारण्याची, ते प्रश्न सोडविण्याची हीच गंभीर वेळ आहे असे त्याला वाटले? कांही असो. त्याच्या प्रश्नाचे फारसे कोणाला आश्चर्य वाटले नाही. जणू त्या वातावरणाला तो प्रश्न विसंगत नसून सुसंगतच होता.
''आणि कोणी चित्रकला का शिकतो? आणि कोणी लेखनाचा अभ्यास का करतो?'' कलेचा उपयोग काय हे त्याला समावून देता येत नसल्यामुळे मी हे आणखी दोन प्रश्न उच्चारिले.
खरेच, ''चित्रकला तरी कशासाठी?'' माझाच प्रश्न फेडकाने पुन्हा उच्चारिला. कलेचा उपयोग काय हेच तो दहा वर्षांचा मुलगा जणू इच्छीत होता. त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची माझ्यांत शक्ति नव्हती, धैर्य नव्हते, हिम्मत नव्हती.
''चित्रकला म्हणे कशासाठी? अरे तुम्ही काही तरी काढता व ते पाहून तुम्ही तसे करता.'' सेमका म्हणाला.
''अरे त्याला एखाद्या इमारतीचा नकाशा करणे वगैरे म्हणतात. ती चित्रकला नव्हे. निरनिराळया आकृती, देखावे, पशुपक्षी हे काढायचे म्हणजे चित्रकला. तिचा काय उपयोग!'' फेडका बोलला.
सेमका हा व्यवहारी होता. फेडकाच्या बोलण्याने तो डरला नाही, हरला नाही. त्या झाडावर काठीने जोराने हाणीत तो म्हणाला, जरा उपहासानं म्हणाला ''ही काटी कशासाठी, आणि हेझाड कशासाठी?''