कला म्हणजे काय? 137
दे दोघे दुस-या ठिकाणी जातात. परंतु तेथेही शापाच्या ऐवजी तोंडातून आशीर्वादच बाहेर पडतो! तिस-या ठिकाणी जातात, तेथेही पूर्वीप्रमाणेच! शेवटी बलाक बलामवर संतापतो. तो संतापाने हात चोळतो, दातओठ खातो, चिडतो. तो बलामला म्हणतो, ''माझ्या सरहद्दीजवळ येणा-या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला बोलाविले, परंतु तू तीन वेळा त्यांना आशीर्वादच दिलेस, चालता हो येथून. तुला मोठया पदवीस चढवावे असे मी योजिले होते, परंतु तुला तो मान मिळावा अशी देवाची इच्छा नाही. दैव देते कर्म नेते. नीघ माझ्यासमोरून, जा, काळे कर...''
बिचारा बलाम रिक्तहस्ते निघून गेला. कारण शापाऐवजी त्याने आशीर्वादच दिले!
जे बलामच्या बाबतीत घडले, अगदी हुबेहूब तसेच पुष्कळ वेळा खरे कवि, खरे कलावान, यांच्याही बाबतीत घडून येत असते. सत्ता व संपत्तीची बलाक त्यांना भूल पाडू पहात असतो. लोकप्रियता, पैसा, मान, कीर्ति यांची आमिषे त्यांच्यासमोर उभी असतात. समोरचे देवदूत त्यांना दिसत नाहीत, जे गाढवासही दिसतात. ते कवी कोणाला शाप देण्यासाठी सरसावतात. परंतु त्यांच्या तोंडातून आशीर्वादच बाहेर पडतो.
चेकोव्ह हा खरा कवी आहे. तो सत्कलावान आहे. डार्लिंग ही मनोहर कथा त्याने लिहिली. या कथेच्या बाबतीत वरच्या गोष्टीतल्याप्रमाणे जणू घडले असे वाटते.
डार्लिंग ही एक मुलगी आहे. प्रथम ग्रंथकार तिच्याकडे बुध्दीच्या डोळयांनीच बघतो. त्या गरीब मुलीची टर उडवावी असे आरंभी चेकॉव्हच्या मनांत असावे असे दिसते. सहानुभूतीने, प्रेमाने, अंतदृष्टीने डार्लिंगकडे त्याने पाहिलेले नसते. कुकिन म्हणून एक नाटकगृहाचा मालक आहे. या कुकिनवर डार्लिंग प्रथम प्रेम करते. कुकिनबरोबर सारी दगदग व त्रास ती आनंदाने सहन करते. ती कधी कुरकुर करीत नाही. ते सारे कष्ट प्रेमामुळे तिला आनंदरूपच वाटत असतात. परंतु पुढे तिचे मन एका लाकडाच्या वखारवाल्यावर जडते. त्याच्या सुखदु:खाशी ती एकरूप होते. नंतर एका गुरांच्या डॉक्टरांवर ती प्रेम करते. जणू हाच जगातील महत्त्वाचा प्रश्न असे तिला वाटते. आणि शेवटी एक मोठी टोपी घालून शाळेत जाणारा मुलगा त्याच्यासाठी ती जगते, त्याच्यासाठी ती व्याकरण शिकू लागते व त्याला शिकविते. त्याच्या हितात ती रंगून जाते. तो नाटकगृहाचा मालक, तो लाकडाचा व्यापार करणारा दोघे जरी जरा गंभीर तरी विचित्र व हास्यास्पद असेच आहेत. तो गुरांचा डॉक्टर तो तसाच. त्याचे सारखे हसूच येते. आणि तो बावळट मोठी टोपी घालणारा मुलगा, त्याला पाहून कोण हसणार नाही? विदूषकच तो. बावळट व अडाणी. परंतु डार्लिंगचे हृदय शुध्द आहे. ज्याच्यावर ती प्रेम करते, त्याच्या जीवनांत ती रंगून जाते. तिचे त्या त्या व्यक्तीवर निरतिशय प्रेम असते. सर्व जिवाभावाने ती प्रेम करते, त्यांच्या सेवेत संपूर्णपणे रमते. तिच्या प्रेमाच्या विषयभूत व्यक्तींबद्दल हंसाल, परंतु तिचा त्याग, तिची सेवा, तिची एकरूपता, तिचे प्रेम ह्यांना कोण हसेल? ती थोर व पवित्रच आहेत.