कला म्हणजे काय? 75
प्रकरण बारावे
(नकली कला का निर्माण होते-कारणे; धंदेवाईकपणा; टीका; कलागृहे; खरी कला-तिचे मुख्य लक्षण म्हणजे भावनास्पर्शत्व; हा परिणाम व्हावा म्हणून कलेचा आकार, कलेचा बाह्यरूपही निर्दोष व अव्यंग असे हवे.)
आपल्या समाजात नकली कला तीन कारणांनी उत्पन्न होते. पहिले कारण म्हणजे कलावानांना कृतीबद्दल मिळणारा भरपूर मोबदला व यामुळे कलावानांमध्ये उत्पन्न झालेले धंदेवाईकत्व. दुसरे कारण म्हणजे कलेवरची टीका आणि तिसरे कारण म्हणजे कला शिकवणारी कलागृहे.
जोपर्यंत वरच्या वर्गाची व खालच्या वर्गाची असे कलेचे दोन अलग प्रवाह झाले नव्हते, तोपर्यंत धार्मिक कलाच महत्त्वाची मानली जात होती. त्याच कलेला उत्तेजन देण्यात येत असे, बक्षीसे देण्यात येत असत; आणि हीच कला तुच्छ मानली जात असे. त्यावेळेस या नकली कला नव्हत्या. कोणी निर्माण केलीच तर लगेच तिच्यावर सारे तुटून पडत व ती नष्ट होई. परंतु कलेमध्ये वरच्या वर्गाची व बहुजनसमाजाची असे भेद पडताच, सुख देणारी ती चांगली कला असे हा वरचा वर्ग म्हणू लागताच, या कलेलाच भरपूर मोबदला वगैरे ते देऊ लागताच, या धनार्जक कलाव्यापाराकडे आपले लक्ष देऊ लागले. अशाप्रकारे कलेचे कलात्व जाऊन तिला धंद्याचे रूप आले.
आणि अशी परिस्थिती येताच, कलेचा सर्वात मोठा व बहुमोल गुण म्हणजे आंतरिकता, कळकळ, तो गुण लोपला. हा गुण अजिबात नाहीसाच झाला.
धंदेवाईक कलावान कला हे उपजीविकेचे साधन करतो. तो कलेवर जगतो. कला निर्माण करण्यासाठी, हा आपला धंदा चालविण्यासाठी, त्याला सदैव विषय धुंडाळीत बसावे लागते व हा पठ्ठया विषय शोधून काढतोही. ज्यूलोकांतील धर्मोपदेशक, ते त्यांचे स्तोत्रकार, प्रार्थनाकार, फ्रॅन्सिस ऑफ अॅसिसी, इवियड व ओडेसी यांचे कर्ते, लोककथा, दंतकथा, लोकगीते यांचे कर्ते, ज्यांच्यातील पुष्कळांना मोबदला तर नाहीच मिळाला. परंतु ज्यांनी स्वत:ची नावेही स्वत:च्या कृतींवर लिहून ठेवली नाहीत असे लोक व अशांच्या कृती, आणि दुसरे हे राजदरबारी कवी, श्रीमंतांच्या घरी उठबस करणारे चित्रकार, नाटककार, संगीतकार-ज्यांना मान मिळत आहेत, पदव्या प्राप्त होत आहेत, मोबदले लाभत आहेत, आणि पुढे पुढे राजदरबार जरी नाहीसे झाले तरी धंदेवाईक झालेले असल्यामुळे जे कलेवर जगत आहेत, ज्यांनी कलेला बाजारी वस्तूचे रूप दिले आहे, कलावान् व कलेचे गि-हाईक यांतील दुवे जे वर्तमानपत्रांचे संपादक, छापखानेवाले, इत्यादी दलाल या दलालांकडून ज्यांना भरपूर मोबदला व अपरंपार वेतन मिळत असते-असे हे भाडोत्री कलावान व ह्यांच्या कृती या दोहोंमध्ये किती मोठा फरक आहे-व तो असलाच पाहिजे-ते दिसून येईल.
नकली कलेचा प्रसार व्हावयास हा धंदेवाईकपणा मुख्य कारण आहे. दुसरे कारण म्हणजे कलेवर होणारी टीका. कलात्मक टीका म्हणजे कलेचे मूल्य-मापन. कलेचे हे गुणदोषविवेचन प्रत्येकाने करावयाचे नसते. सामान्य, सरळ व साध्या माणसांनी तर नाहीच नाही. ते काम पंडितांचे आहे. ज्यांच्या रूची विकृत झालेल्या, आपण कधीही न चुकणारे असे ज्यांना वाटत असते, फाजील आत्मविश्वास व फाजील अहंकार यांचे जे पुतळे असतात-अशांनी ही चर्चा करावयाची असते. कलेचा दर्जा ठरविण्याचे काम ह्या महाशयांचे असते.