कला म्हणजे काय? 62
हूशमन्, किप्लिंग किंवा दुस-या कोणाच्याही लघुकथा वाचा. त्यांची बाह्यरचना समजत नाही, अर्थ कळत नाही, भाषाशैली मोठी उठावदार वाटते. उदात्त भावना येथे असाव्यात असा भास होतो. परंतु एकंदरीत, गोष्टींत काय आहे ते समजत नाही. कोठे काय घडत आहे, कोणाला काय होत आहे. काही लक्षात येत नाही. आजच्या काळांतील उदयोन्मुख कला ती सुध्दा अशा स्वरूपाची आहे.
या शतकाच्या पूर्वार्धात जे वढले, गटे, मसेट, शिलर, ह्यूगो, डिफन्स, पीयोव्हेन, चॉपिन, रॅफेल, डीव्हिन्सी, मायकेल एंजेलो, डेलरॉची वगैरेंची स्तुतिस्तोत्रे गात व ऐकत जे वाढले, ते ह्या नवीन कलेकडे दुर्लक्ष करतात. या नवीन कलेतील अर्थ त्यांना समजत नाही. काहीतरी रूचिहीन, बावळटपणाचा व मूर्खपणाचा हा सारा प्रकार आहे असे त्यांना वाटते व ते ह्या प्रकारांची उपेक्षा करतात. परंतु असे केवळ हातपाय जोडून बसून चालणार नाही. केवळ उपेक्षा करण्याने भागणार नाही. कारण दिवसेंदिवस ही अशी दुर्बोध कला वाढत आहे व पसरत आहे. ही प्रवृत्ती क्षणिक, जाण्यासाठी आलेली नसून, तिचा फैलावा होत आहे. समाजांत ही प्रवृत्ती दृढमूल होऊ पहात आहे. असे असून या वृत्तीचा निषेध हे जुने लोक का करीत नाहीत? त्याचे कारण असे की या नवीन कलावानांच्या कृतींचा अर्थ आपणांस समजत नाही म्हणून जर त्या टाकाऊ व नालायक आपण ठरवल्या तर त्याच न्यायाने, गठे, शिलर, ह्यूगो, डिकन्स यांच्या कादंब-या व नाटके; बीथोव्हेन, चॉपिन् यांची संगीते; रॅफेल, एंजेलो, डीव्हिन्सी यांची चित्रे-ज्या ह्या कलावानांची आपण स्तुति करतो, परंतु ज्यांच्या कलांचा अर्थ लाखो मजुरांना व शेतक-यांना समजत नाही, ते ह्या आपल्या देवांना, आपल्या आदर्शांना-नालायक ठरवतील. ह्या कलावानांच्या कृती समजत नाहीत ह्या तत्त्वावर त्याज्य ठरवतील, अशी भीत ह्या जुन्या रसिकांस वाटत असते!
बहुजनसमाजाला आमच्या कलाकृती समजत नाहीत, रुचत नाहीत, कारण ते आमच्याइतके प्रगल्भमति नाहीत, आमच्याइतके सुसंस्कृत नाहीत, आमच्या इतका त्यांचा विकास झालेला नाही, असे म्हणण्याचा जर ह्या कलावानांस अधिकार असेल, तर मग आमची दुर्बोध कला, आजच्या ह्या दुर्बोध कृती मला समजत नाहीत म्हणून जर कोणी कलावान् ''तुम्ही आमच्याइतके सुसंस्कृत नाहीत, आमच्या इतका तुमच्या बुध्दीचा व हृदयाचा विकास झालेला नाही.'' असे मला म्हणल, तर ते मला नाकारता येणार नाही. ह्या नव्या कलाकृती समजण्याइतपत माझी मति प्रगल्भ व परिपक्व झालेली नाही असेच मला समजले पाहिजे व मला असे म्हटलेले मुकाटयाने कबूल केले पाहिजे. मला व माझ्याशी सहमत असलेल्या इतरांना ''ह्या नवीन कलाकृती आम्हाला समजत नाहीत, कारण त्यांच्यांत समजण्यासारखे काही नाही; ही खरी सत्कलाच नव्हे'' असे म्हणण्याचा जर हक्क असेल तर तो जो मोठा बहुजनसमाज त्याला तर जास्तच यथार्थतेने व हक्काने म्हणता येईल की, ''अहो कलावानांनो! चांगली चांगली असे समजून ज्या कलेची मारे सारे तुम्ही स्तुती करता, ज्या कलेचे एवढे कौतुक करिता, ती कला वास्तविक टाकाऊ व वाईट आहे, कारण त्यात समजून घेण्यासारखेच काही नाही!''
परंतु या नवीन कलेच्या बाबतीत दुसरेच एक गंमत आहे. एकदा एक दुर्बोध कविता रचणारा कवी दुर्बोध संगीत रचणा-याची माझ्यासमोर टर उडवीत होता; आणि नंतर. एक दुर्बोध संगीत रचणारा माझ्याकडे आला व दुर्बोध काव्ये रचणा-यांची त्यानेही तितकीच निंदा केली!