कला म्हणजे काय? 8
यांतील पहिल्या प्रकाराबद्दल तो असें म्हणतो “स्वादासंबंधीची कला ....... ; दोन किंवा फार तर तीनच इंद्रियें कलेला साहित्य पुरवितात अशीं सर्वसाधारण समजूत आहे. परंतु हें मत सर्वस्वीं बरोबर नाहीं, असें मला वाटतें. आपण बोलतांना किती तरी इतर कला मानीत असतों. उदाहरणार्थ, पाककलाच घ्याना परंतु हयावर मी फार जोर देत नाहीं. रोजचा स्वयंपाक जाऊं द्या. परंतु पशूच्या प्रेतापासून जर अत्यंत स्वादिष्ट असा पदार्थ कोणी तयार केला तर तेथें कला नाहीं असें काणे म्हणेल ? ती कलासिध्दीच होय. स्वादकलेंतील रहस्य हें कीं जें जें खाद्य आहे, तें कोणत्या तरी कल्पनेचें प्रतीक मानावयाचें व जी कल्पना प्रकट करावयाची आहे, तिच्याशीं त्या खाद्याचा मेळ राखावयाचा.” फ्रेंच लेखक गायो याचेंहि मत असेच आहे. आजचे पुष्कळ विद्वान् ग्रंथकार गायोला फार मान देतात. स्पर्श, स्वाद, गंध-यांच्या द्वारा आपणांस सौंदर्यविषयक संवेदना मिळतात असें गंभीरपणें आपल्या ग्रंथांत तो प्रतिपादितो, “पर्वतावर एक पेलाभर दूध प्यायल्यानें मला किती सौंदर्यपूर्ण आनंद झाला, त्याचें वर्णन करतां येणार नाहीं ” असें तो म्हणतो.
रेननप्रमाणें फ्रॅलिक नेपथ्यकलाहि मानतो. स्पर्शकला म्हणजे स्पर्शानें होणारा आनंद. स्पर्शकलेंत रंग ज्या संवेदना देतो, त्याच्याहून निराळया संवेदना होत असतात. डोळा ज्या सुखसंवेदना देऊं शकणार नाहीं, त्या स्पर्श देत असतो. मृदुत्वाच्या संवेदना दृष्टीमुळें मिळतील, त्यापेक्षां स्पर्शानें शतपट अधिक मिळतील. मृदुत्व, सुकुमारता, गुळगुळीतपणा हया संवेदना स्पर्शच देऊं शकतो. मखमलींतील कला तिच्यांतील रंग पाहून पूर्णपणें समजणार नाहीं-तर तिच्या मृदु स्पर्शानें ती अधिक समजेल. स्त्रियांच्या सौंदर्याबद्दलच्या आपल्या ज्या कल्पना असतात, त्या कल्पनांत कोमलता, सुकुमारता, लुसलुशीतपणा, नाजुकपणा हयाच कल्पना प्रमुख असतात व हया कल्पना दृष्टीपेक्षां स्पर्शानेंच अधिक पूर्णपणें अनुभवतां येतील.
यावरुन आपणांस असें दिसून येईल की सौंदर्य प्रकट करणारी, सौंदर्य निर्माण करणारी, ती कला हें म्हणणें आपणांस वाटतें तेवढें साधें व सरळ नाहीं; वाटतें तेवढें स्पष्टार्थ बोधक व असंदिग्ध असें नाहीं. कारण अगदीं अलीकडचे असे लेखकहि त्यांत स्पर्श, स्वाद व गंध यांच्याहि संवेदना मिसळून देत आहेत.
परंतु सामान्य मनुष्याला हया गोष्टी माहीत नसतात, किंवा तो इतक्या खोल पाण्यांत जाऊं इच्छितहि नसतो. कलेसंबंधींचे सारे प्रश्न सहज सोडवितां येतील अशी त्याची प्रांजळ समजूत असते. कला म्हणजे काय तर सौंदर्य, कलेंत काय असतें तर सौंदर्य-बस्स. सारे प्रश्न मिटले, सारीं उत्तरें मिळालीं, असें त्याला वाटतें. सौंदर्य निर्माण करण्यांत कला आहे हें त्याला निर्विवाद वाटत असतें व कलेची ही कल्पना व्यापक व समावेशक आहे असेंहि त्याला वाटतें. कलेचा विचार करणें म्हणजे सौंदर्याचा विचार करणें. सौंदर्यमीमांसा केल्यानें सर्व कलाविषयक प्रश्नांचा उलगडा होईल असें तो समजतो.
कलेंत काय तर सौंदर्य. परंतु हें सौंदर्य म्हणजे तरी काय ? सौंदर्याची व्याख्या काय ? सौंदर्य कशाला म्हणावें ?
ज्या शब्दांतील अर्थ अधिक अस्पष्ट व अधिक संदिग्ध, तो शब्द अधिकच अधिकारानें वापरण्यांत येत असतो. ज्या शब्दांतील अर्थ अनिश्चित तो शब्द खुशाल पुन: पुन्हां योजीत असतात. त्या शब्दांतील अर्थ जणुं सूर्यप्रकाशाप्रमाणें स्पष्ट आहे असें ते भासवीत असतात. त्या शब्दाचा अर्थ इतका सरळ व साधा आहे की त्याची चर्चा करणें म्हणजे कालापव्यय व मूर्खपणा आहे असें ते दर्शवीत असतात.