कला म्हणजे काय? 34
राष्ट्राचे कल्याण पाहणे यात जीवनाचे साफल्य आहे, असे रोमन लोकांना त्यांचा धर्म सांगत होता. यामुळे सार्वजनिक कल्याणासाठी स्वार्थाचा होम करण्यात परम आनंद आहे असे जी कला दाखवी ती कला रोमन लोक थोर मानीत. चिनी लोकांममध्ये पूर्वजांना पूज्य मानून त्यांची परंपरा चालू ठेवणे हा धर्म समजण्यात येत असल्यामुळे जी कला पूर्वजांचा मोठेपणा दाखवी, त्यांची परंपरा राखण्यातील आनंद व धन्यता प्रकट करी, ती कला थोर असे तेथे समजण्यात येई.
पशुत्वापासून मुक्त होण्यात जीवनाचे सार्थक आहे असे बुध्दधर्म सांगे. त्यामुळे जी कला आसक्ति कमी करून जीवाला उन्मत्त करील ती धेष्ठ व जी विकारांना आणि वासनांना उत्तेजित करील ती हीन असे बुध्दधर्मीयात मानले जाई.
प्रत्येक काळात त्या त्या समाजात सत् काय व असत् काय ह्याबद्दलच्या धार्मिक कल्पना असतातच. या धार्मिक कल्पना सर्व समाजात सामान्य अशा असतात सर्व समाजात त्या व्यापून असतात. या धार्मिक कसोटीवरून कलेने दिल्या जाणा-या भावनांचे मूल्यमापन केले जात असे. म्हणून बहुजनसमाजाच्या धार्मिक वृत्तीने चांगल्या मानलेल्या भावना जी कला प्रकट करीते, ती कला चांगली असे बहुतेक देशांत मानले जाते; धर्म ज्या भावनांना असत् समजतो, त्या भावना जागृत करणारी कला हीन असे सर्वत्र समजण्यात येई व तिचा धिक्कार व निषेध केला जाई. कलेचे बाकीचे जे विशाल व विस्तृत क्षेत्र ज्या क्षेत्रात आपण परस्परांशी हरघडी विचार व भावना यांची देवाण घेवाण करीत असतों त्या क्षेत्राची कोणी वास्तपुरत घेत बसत नसे, तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असे. ही कला धार्मिक कल्पनांच्या विरुध्द जात आहे असे जेव्हा दिसे, तेव्हाच फक्त तिच्याकडे लक्ष पुरविण्यात येई व तेहि तिचा उच्छेद करण्यासाठी म्हणूनच, ग्रीक, ज्यू, हिंदू, इंजिप्शियन, चिनी इत्यादी लोकांत अशी स्थिती होती. ख्रिश्चनधर्म उद्वभवला त्यावेळेस कलेसंबंधीची हीच दृष्टि सर्वत्र स्वीकारली जात होती.
ख्रिस्ती धर्मात प्रथम काही शतके तरी ख्रिस्ती धर्मातील नानाप्रकारच्या दंतकथा, संतांची जीवने, स्तोत्रे, प्रवचने, प्रार्थनासंगीत, ख्रिस्तभक्ती, ख्रिस्ताच्या जीवनाबद्दलची उत्कंठा, ख्रिस्ताचे अनुकरण करण्याची इच्छा, सांसरिक व आसक्तिमय जीवनाचा त्याग, नम्रवृत्ति बंधूप्रेम इत्यादी भावना प्रगट करणा-या कलेला सत्कला असे समजण्यात येई; आणि वैयक्तिक सुखभोगाच्या इच्छांना उत्तेजित करणारी कला हीन व तुच्छ मानण्यांत येई. ख्रिस्ती धर्मातील गोष्टी प्रतीक रूपाने मांडणारे जे शिल्प त्याला त्यांनी मान्यता दिली, परंतु इतर धर्मातील तशाच प्रकारचे शिल्प त्यांनी तुच्छ मानिले.
परंतु आरंभीच्या काही शतकापर्यंतच ही स्थिती राहिली. ख्रिस्ताच्या शिकवणुकीत अजून फार मिसळ झालेली नव्हती. त्या शिकवणुकीत दुस-या गोष्टी घुसडल्या गेल्या नव्हत्या. त्याची बरीचशी शिकवण अविकृत व सत्य स्वरूपांत अजून राहिली होती. दंभ व अवडंबर यांचा प्रवेश तेथे झाला नव्हता.
ही आरंभींची निर्मळ स्थिती पुढे बदलली. जेव्हा सरकारी हुकुमांवरून, राजेमहाराजांच्या फर्मानांवरून, कॉन्स्टन्टाईन, शार्लमन, व्हलाडियर वगैरेंच्या कारकीर्दीत राष्ट्रेंच्या राष्ट्रे व जमातीतच्या जमाती ख्रिस्तधर्मी करण्याचा सपाटा सुरू झाला तेव्हा नवीनच मंदिरी ख्रिश्चनधर्म, चार्चिक ख्रिस्तीधर्म उत्पन्न झाला. ख्रिस्त पूर्वकालीन इतर धर्माप्रमाणेच हा ख्रिस्तीधर्म होता. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा विसर पडला. धर्माला नांव ख्रिस्ताचे परंतु धर्मकल्पना मात्र ख्रिस्तपूर्वकालांतील अशा प्रकारचा हा ख्रिस्तीधर्म बनला. ह्या मंदिरी ख्रिस्तीधर्माने योग्ययोग्तेच्या, सत् काय असत् काय याबद्दलच्या नवीनच कल्पना उराशी धरिल्या व त्या कल्पनांवरून कलेचे सदसत्व ठरले जाऊ लागले, लोकांच्या भावनांचे मूल्यमापन होऊ लागले.
प्रत्येक माणसाचा पित्याशी असलेला निकट संबंध, या संबंधामुळे सर्व मानवजातीतील समानता व बंधुता, अत्याचाराच्या ऐवजी प्रेम, क्षमा व निरहंकारता ही जी ख्रिस्ती धर्मातील प्राणभूत शिकवण मूलभूत व महत्त्वाची शिकवण ती हा नवीन मंदिरी ख्रिश्चनधर्म मानीत नसे, एवढेच नव्हे तर या शिकवणुकीच्या उलट स्वर्गातही उच्च नीच अशा देवांच्या मालिका आहेत; ख्रिस्त, व्हर्जिन मेरी, देवदूत, प्रेषित, पैगंबर, संत, हुतात्मे इत्यादीकांची पूजा, या दैवी विभूतीचीच नव्हे तर त्यांच्या मूर्तीचीही पूजा वगैरे धर्म मान्य करण्यात आला; चर्चवर अंधश्रध्दा ठेवणे, चर्चने काढलेली शासन मुकाटयाने पाळणे यात धर्म आहे अशाही कल्पना रूढ करण्यात आल्या.