कला म्हणजे काय? 131
ही कादंबरी कृत्रिम नाही, दुर्बोध नाही, ठराविक पध्दतीची नाही, ही एक खरी जिवंत कलाकृति आहे. ग्रंथकाराला हृदयांत जे वाटते, तेच ती बोलत आहे. जे तो बोलत आहे त्याच्यांत त्याचे हृदय आहे. स्वत:च्या लिहिण्यावर त्याचे प्रेम आहे. मनांतील गोष्टी सांगून टाकावयास तो अधीर आहे. कांहीतरी सांगण्यासारखे आहे व ते सांगितल्यावाचून राहावत नाही म्हणूनच तो सांगत आहे. जे त्याने सांगितले आहे त्यांत वायफळ चर्चा नाहीत, अद्भुत व काल्पनिक प्रसंग नाहीत, उगीच नाना प्रकारचे दूरचे संदर्भ नाहीत, गूड कोडी नाहीत. ख-या भावना वाचकाला देण्याची जी रीत असते, तीच येथे अवलंबिली आहे. साधी सरळ माणसे, साध्याच रोजच्या गोष्टी... हेच येथे रसाळपणे व साध्या रीतीने वर्णिलेले आहे. या कादंबरीतील सर्व प्रसंगांत आंतरिक कलात्मक ऐक्य आहे. सर्वत्र जिव्हाळा भरून राहिलेला आहे. उगीच असंबद्ध काव्यमय कल्पना येथे योजलेल्या नाहीत.
ख-या कलाकृतीची तीन मुख्य लखणे या कादंबरीत दिसून येतात.
१) या कादंबरीतील विषय महत्त्वाचा आहे. खेडयातील श्रमजीवी लोक, त्यांचे ते कष्टाळू जीवन हा विषय आहे. सर्वसमाजाच्या इमारतीचा पाया म्हणजे हे खेडयांतील लोक; त्यांच्या जीवनाचे वर्णन या कादंबरीत आहे. जर्मनीतच नव्हे तर सर्वच युरोपियन देशांतील खेडयांपाडयांतील लोकांच्या पूर्वापार राहणीत व परिस्थितीत भयंकर फरक होत आहे. या खेडयांतील जनतेची कसोटीच घेतली जात आहे.
२) ही कादंबरी उत्कृष्ट व परिणामकारक भाषेत लिहिलेली आहे. खेडयांतील लोकांचीच भाषा वापरलेली आहे व ती फार जोरदार, सरळ व सुटसुटीत वाटते.
३) या कादंबरीत कळवळा आहे. ज्या लोकांचे वर्णन ग्रंथकार करीत आहे, त्या लोकांवर प्रियकाराचे फार प्रेम आहे. हे प्रेम या कादंबरीत सर्वत्र भरलेले आहे. पानापानांवर ते दिसून येते.
एका प्रकरणांत पुढील वर्णन आहे. नवरा आपल्या सोबत्यांबरोबर बाहेरच खानापानांत रात्र घालवतो. निशा करून तर्र होऊन तो घरी येतो. तो घरी येतो तो पहाट व्हायची वेळ झालेली असते. कोंबडा नुकताच आरवलेला असतो व तो दारावर थाप मारतो. तो जोराने धक्का देतो. दार न उघडताच खिडकीतून बायको बाहेर बघते व ती नव-याला ओळखते. ती त्याला शिव्या देते, त्याची खरडपट्टी काढते. ती पटकन आधी दार उघडीत नाही. ''शेण खायला गेले होतेत. गटारांत लोळणं पुरं झालं वाटतं. लाज नाही मेली इवलीदेखील...'' वगैरे ती बोलते. शेवटी ती दार उघडते. तो दारूडा नवरा झोकांडया खात कसा तरी आंत शिरतो. जिकडे मुले झोपलेली असतात तिकडे तो जाऊ पाहतो. कांही मुले जागी होतात. बायको नव-याला तिकडे जाऊ देत नाही. दारू पिऊन आलेल्या आपल्या बापाला मुलांनी पाहू नये असे तिला वाटते. ती मुलांच्या खोलीपासून नव-याला दूर लोटते. तो दाराची कडी पकडतो व आंत जाण्यासाठी तिच्याजवळ दंगामस्ती करतो. नेहमी शांत व सौम्य असणारा तो गृहस्थ आज हातघाईवर येतो. त्याला खोलीत जावयाचे असते. आज तो एवढा हातघाईवर येतो व ऐकत नाही. याचे कारण आदल्या दिवशी बायकोने त्याच्या खिशांतून कांही पैसे त्याच्या नकळत काढून घेतलेले असतात. ते पैसे धन्याने त्याला दिलेले होते व त्यातील तिने काढून घेतले, लपवून ठेवले. हा राग त्याच्या मनांत असतो. शेवटी हातघाईवर तो येतो. तो संतापतो. तो तिचे केस धरून ओढतो व विचारतो. ''कोठे आहेत माझे पैसे? सटवे, टाक माझे पैसे. टाक, नाहीतर ठार करीन.''
''काही केलेत तरी पैसे मी देणार नाही. ठार मारा वाटले तर. नाहीच देणार मी...'' असे ती म्हणजे व त्याच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करते. नवरा रागाने बेभान होतो. सर्व सारासारा तो विसरतो, तो अंध होतो, पशु होतो. तिला वाटेल तेथे तो मारीत सुटतो, जेथे मारता येईल तेथे तडातड मारतो.
''माझा मुडदा पाडा व मग पैसे घ्या. माझ्या जिवांत जीव आहे तोपर्यंत पैसे नाहीच देणार...'' असे ती पुन्हा संतापाने गुदमरत, स्फुंदत म्हणते.