कला म्हणजे काय? 149
जंगलांत लांडगे असतात हे त्याला माहीत होते. म्हणूनच तो तिकडे जाण्याला अधीर व उत्सुक होता. सर्वांचे ठरले की जावयाचे. आम्ही चौघेजण होतो. जंगलाकडे आम्ही वळलो. सेमका म्हणून एक बारा वर्षांचा मुलगा होता. त्याचे हाडपेर बळकट होते. जसा शरीराने तसाच मनाने तो निर्मळ, निरोपी व धडधाकट होता. तो सर्वांच्या पुढे होता. हूहू हाँ हाँ असे ओरडत होता. दूर कोणी तरी दिसत होते, त्याला जणू तो आपल्या ''हाँ हाँ..'' ने हाका मारीत होता, प्रश्न विचारीत होता. तिसरा मुलगा प्रोंका हा जरा अशक्त होता. त्याची वृत्ति सौम्य होती. ईश्वरी देणगीचा तो मुलगा होता. गरीब आईबापांच्या पोटी तो जन्मला होता. पोटभर खावयास मिळत नसल्यामुळे तो आजारी व फिकट दिसत असे. तो अगदी माझ्या बाजूने चालला होता. सेमका सर्वांच्या पुढे होता. माझ्या व सेमकाच्यामध्ये फेडका चालला होता. फेडका सारखा बोलत होता; परंतु अगदी हळूवार व मृदु आवाजांत बोलत होता. उन्हाळयांत तो घेडे चारावयास नेई; त्या वेळची हकीगत मध्येच सांगे तर मध्येच, ''आपल्याला कांही भीति नको वाटायला'' असे म्हणे. पुन्हा मध्येच विचारी ''जंगलांतून खरोखरच एखादा आला तर?'' मी कांहीतरी उत्तर द्यावे, मी कांही तरी बोलावे म्हणून तो पुन:पुन्हा विचारीत होता आम्ही जंगलामध्ये काही गेलो नाही. कारण ते फारच धोक्याचे झाले असते; परंतु जंगलाच्या अगदी जवळ होतो. अंधार इतका होता की पायाखांलचा रस्ताही धड दिसत नव्हता. गावही जरा दूर राहिला होता. गावांतील दिवे आता दिसत नव्हते. मोठया मुष्किलीने आम्ही पावले टाकीत चाललो होतो. आघाडीला असलेला सेमका एकाएकी थांबला. तो एकदम म्हणाला,
''थांबा, थांबा, हे काय आहे बरे?''
आम्ही सारे मूक होतो. कसलाही आवाज, कसलीही चाहूल ऐकू आली नाही. परंतु एकंदर सारे धोक्याचे व भयंकर असे वाटू लागले.
''जर उडी मारून तो आला, तर आपण काय बरे करणार? आपल्याकडे, आपल्या अंगावर जर आला तर?'' फेडकाने विचारले.
कॉकेशियस दरवडेखोरांच्या गोष्टी निघाल्या. पुष्कळ दिवसांपूर्वी कॉकेशियस चोरांची एक गोष्ट मी त्यांना सांगितली होती. ती त्यांना आठवली. शूर असा कॉकेशियस लोकांच्या मी पुन्हा त्यांना गोष्टी सांगितल्या. डोंगरात राहणा-या रानटी शूर जातींचा नायक जो हडजी मुराद त्याची गोष्ट त्यांना सांगितली. माग काढीत सेमका पुढे चालला होता. त्याच्या पायात खूप मोठे बूट होते. धैर्याने पावले टाकीत तो चालला होता. त्याची ती रुंद पाठ हलत होती; सारखी हलत होती. प्रोंका माझ्या अगदी बाजूने चालण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु फेडकाने त्याला ढकलले व आपण माझ्या बाजूने चालू लागला. गरीब प्रोंका, तो मुकाटयाने दुरून चालू लागला. गरिबीत वाढल्यामुळे सारे मुकाटयाने सहन करण्याची त्याला जणू सवयच झाली होती. परिस्थितीने त्याला नमावयास शिकविले होते. मधूनमधून तो एकदम आमच्याजवळ येईल, मध्येच मागे राही. ढोपर ढोपर बर्फातून तो चालला होता.
रशियातील शेतक-यांच्या मुलांना त्यांचे मुके घेणे, त्यांना कुरवाळणे, त्यांना पोटाशी धरणे, हातांत हात घेऊन दावणे वगैरे गोष्टी सहन होत नाहीत. गोडगोड बोलणे त्यांना आवडत नाही. एकदा शेतक-यांच्या मुलांच्या शाळेत वरच्या वर्गातील कोणा सरदाराची बायको आली होती. शाळेला भेट देण्यासाठी ती आली होती. ती एका मुलाला म्हणाली, ''इकडे येरे बाळ, मला एक पापा दे बरे. तुझा एक गोड मुका घेऊ दे.'' तिने त्या मुलाचा खरोखरच मुका घेतला! परंतु तो मुलगा शरमला, संतापला. आपल्याजवळ ती बाई अशी काय वागली ते त्याला समजेना. मुलगा पाच सहा वर्षांचा झाला की ह्या मुक्यांच्या व पाप्यांच्या वर तो जातो. आम्ही आता छबुकली नाही, आम्ही मोठी मुले आहोत असे त्यांना वाटते. शेतक-यांच्या मुलांची ही विशेष प्रवृत्ति मला माहीत होती. आणि म्हणूनच जेव्हा फेडका माझ्या अगदी जवळून चालू लागला आणि मी जी गोष्ट सांगत होतो, त्यातील एक फार भयंकर प्रसंग आला तेव्हा त्याने मला जरा स्पर्श केला. त्याची बाही माझ्या अंगाला लागली, आणि माझी दोन बोटे त्याने घट्ट पकडली व धरून ठेवली याचे मला आश्चर्य वाटले. माझे बोलणे थांबताच फेडका म्हणाला, ''सांगा ना; थांबलेत का? पुढे काय झाले? गोष्ट चालू द्या.'' त्याने इतक्या काकुळतीने व जरा कंपित अशा स्वरांत सांगितले की त्याला नाही म्हणणे शक्य नव्हते.