कला म्हणजे काय? 27
हे असे त्याचप्रमाणे जे सुखवितें ते सौंदर्य असे ठरवून त्यावर कलेची व्याख्या उभारणे हे चुकीचे होणार आहे. आपणास जे नाना पदार्थ किंवा ज्या नाना कृति सुखवितात - ते सारे कलेचे आदर्श आहेत - असेही आपणास म्हणता यावयाचे नाही. कलेपासून जे सुख मिळते, तोच कलेचा हेतु, तेच कलेचे मध्येय असे म्हणणे म्हणजे खाताना जो आनंद होतो तो अन्नाचा हेतु होय असे म्हणण्याप्रमाणेच आहे. (अत्यंत असंस्कृत असे रानटी लोक असे मानतात)
अन्नाचा हेतु म्हणजे खाताना होणारे सुख - असे समजणा-यांना ज्याप्रमाणे खाण्यातील खरा अर्थ, अन्नाचा खरा हेतु व अर्थ समजणे अशक्यच असते. जीवनाच्या इतर अनेक अंगांशी ज्या व्यापाराचा संबंध आहे, त्या व्यापाराचा फक्त सुखाच्या अर्थ सुख नव्हे हे जेव्हा कळते तेव्हाच शरीर पोसणे हा जो त्यातील अर्थ तो समजू लागतो. कलेसंबंधीही तसेच. सुख हा कलेचा हेतु नाही हे जेव्हा माणसे ओळखतील, तेव्हाच कलेचा खरा अर्थ ते समजू शकतील. सौदर्य (म्हणजेच कलेपासून मिळणारी विशिष्ट सुखसंवेदना.) म्हणजे कलेचे मध्येय असे मानिल्याचे कलेची योग व्याख्या करण्यास मदत तर नाहीच होत, उलट कलेला कलेतर प्रांतात - तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, शरीरशास्त्र, इतिहास- इत्यादी प्रांतांत - हिंडत फिरावे लागते; अमुक एक कृति एकाला का सुखविते व दुस-याला का संतापविते याची शहानिशा करीत बसावे लागते. अशाप्रकारे प्रश्न सुटत जाण्याऐवजी अधिकच गुंतत जातो - व व्याख्या करणे अशक्य होते. एका माणसाला फलाहार कां प्रिय व दुस-याला मांसाहार का प्रिय याची चर्चा केल्याने शरीरास पोषक असणा-या अन्नाच्या व्याख्येस जशी मदत होत नाही, त्याचप्रमाणे कलाप्रांतांत रुचिचर्चा आणल्याने कलेचें स्वरूप समजण्यास, कलेची व्याख्या करण्यास काडीचीही मदत होत नाही. ज्या मानवी व्यापारास आपण कला ही संज्ञा देतो, त्या व्यापाराचे स्वरूप समजून येण्यास या रुचिचर्चेने साहाय्य होत नाही. उलगडा न होता गुंताच अधिक होत जातो असें अनुभवास येते. कलेच्या प्रत्येक प्रकाराचे समर्थन करण्याच्या या प्रयत्नामुळे साराच गोंधळ माजतो व या प्रयत्नास रामराम करणे हेच शेवटी कर्तव्य होते.
ज्या कलेसाठी लाखो लोकांना श्रमावे लागते, जिच्यासाठी मोलाची जीवने मातीत मिळतात, जीवनाहून थोर अशी नीति जिच्या पायी धुळीत मिळविली जाते - अशी कला म्हणजे तरी काय - या प्रश्नाला सौंदर्य-मीमांसेच्या अनेक ग्रंथांतून जी उत्तरे दिलेली आहेत ती मी सांगितली. त्या सर्वाचे सार इतकेच कीं सौंदर्य हा कलेचा उद्देश, आणि जे सुखविते ते सौंदर्य. कलात्मक सुखोपभोग हा मोलवान व महत्त्वाचा आहे कारण तो सुखोपभोग आहे ! विलास चांगला कारण तो विलास आहे असे एका शब्दात सांगून टाका. एवं कलेची जी व्याख्या दिली जाते ते व्याख्याच नाही. अस्ति तत् समर्थमितव्यम्-या पलीकडे या व्याख्येचा उपयोग नाही, उद्देश नाही. ही सारी डोळयात धूळफेक आहे, हा लपंडाव आहे, ही फसवणूक आहे. भाराभर ग्रंथ लिहिण्यात आले तरी कलेची योग्य व कांटेतील व्याख्या अद्याप करण्यात आलेली नाही. हे म्हणणे कोणाला चमत्कारिक व धाष्टर्याचे वाटेल परंतु नाईलाज आहे. या ग्रंथराशीच्या पलीकडेच अजून कलादेवी उभी आहे, तिचे दर्शन अजून नीट झाले नाही. आणि ह्याचे कारण हेच की सौंदर्याच्या कल्पनेवर कलेची कल्पना उभारण्याचे प्रयत्न झाले.