कला म्हणजे काय? 128
कलेचे कार्य प्रचंड आहे, अनंत व अपार आहे. ज्या कलेला सच्छास्त्र साहाय्य करीत आहे, धर्म दिवा दाखवीत आहे, ती कला चमत्कार करील. आज कायदेकानून, पोलिस व इतर नाना संस्था यांच्यामुळे जे ऐक्य व सहकार्य दिसत आहे, ह्या बाह्यसाधनांनी जे मानव आज एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना दिसत आहेत, ते सारे, कला यांच्या साहाय्याशिवाय आंतरिक प्रेम व विश्वास यांनी करावयास लावील. अत्याचार दूर करावयास मग पोलीस लागणार नाहीत, सूर्य असल्यावर दिवे कशाला? कला असल्यावर कायदेकानून व पोलीस कशाला? कला मानवाला माणुसकी देईल; मोकळेपणाने व आनंदाने सहकार्य करावयाला लावील
.
हे काम एक कलाच करू शकेल.
शिक्षा, दंड किंवा इतर बाह्यभीति यामुळे जे सहकार्य आज होते, त्याच्याशिवाय समाजात सहकार्य नाहीच असे नाही. मानवी जीवनात इतर सहकार्य भरपूर आहे व हे कलेनेच आजपर्यंतच्या श्रमाने हळुहळु घडवून आणले आहे.
धार्मिक वस्तू व धार्मिक भावना पूज्य मानाव्या, आईबापांनी मुलांशी व मुलांनी आईबापांशी कसे वागावे, मनुष्याने शेजा-यांशी, अतिबीशी, आप्तेष्टांशी, देशबांधवांशी, परकीयांशी कसे वागावे हे सारे आजपर्यंत कलेनेच दाखविले आहे. आपल्याहून अनुभवाने व वयाने जे वडील त्यांच्याशी कसे वागावे, अधिकाराने जे श्रेष्ठ त्यांच्याशी कसे वागावे, जे दु:खी दीन आहेत त्यांच्याशी कसे वागावे, शत्रूंशी कसे वागावे, पशुपक्षी, गाईगुरे यांच्याजवळ कसे वागावे, फुले, फळे, तृणे यांच्याजवळ कसे वागावे, हे सारे कलेनेच शिकविले आहे. कलेने दिलेली ही शिकवण कोटयावधी लोक पिढयानपिढया पालन करीत आले आहेत. ह्या शिकवणीला सरदार किंवा फांस यांचा पाठिंबा नव्हता एव्हढेच नव्हे तर ह्या शिकवणीचा पाया हलविण्याचे किंवा उखडून टाकण्याचे जर सामर्थ्य कोणांत असेल तर तेही एका कलेतच आहे. कलाच बांधू शकते व कलाच पाडू शकते. कलेने जर आजपर्यंत इतके संपादिले आहे तर भविष्यकाळांत तिला याच्याहून अधिक संपादिता येईल. नवकाळाला अनुरूप ती नवीन सदाचार शिकवील, नवीन धर्मदृष्टीस अनुरूप असे मानवी वर्तनास नवीन वळण लावील.
मूर्ति पूज्य मानावी, राजाला निष्ठा दाखवावी, मित्राला फसवणे हे लाजिरवाणे आहे, निशाणाचा मान राखावा, अपमानाचा सूड घेणे योग्य आहे, मंदिर बांधण्यासाठी व ते सजविण्यासाठी स्वत:चा श्रम मोफत द्यावा, स्वत:चा मान स्वत: राखून घ्यावा, स्वत:च्या राष्ट्राची इभ्रत व कीर्तिही सांभाळावी. देशासाठी मरावे, देशाचे नांव मळवू नये ह्या सर्व भावना जर पूर्वीच्या कलेनेच हृदयांत बिंबविल्या आहेत, तर त्याच कलेला ''प्रत्येक मनुष्य पवित्र व स्वतंत्र आहे, कोणी कुणाला हिणवू नये, तुच्छ मानू नये, मनुष्याला गुलामगिरीत ठेवणे हे पाप आहे व राष्ट्रेच्या राष्ट्रे गुलाम करून ठेवणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. पशुपक्ष्यांनाही हौसेखातर मारू नये, त्यांना मारून खाऊही नये; त्यांना पिंज-यांत न कोंडता वृक्षावरच आनंदात असलेले त्यांना पहावे, ऐशआराम ही लज्जास्पद वस्तू आहे, अत्याचार, जुलूम, सूड या गोष्टी मनुष्याला शोभत नाहीत. ज्या वस्तूची या क्षणी दुस-याला जरूर आहे, ती आपल्या भावी सुखाच्या आशेने राखून ठेवणे याची माणसाला लाज वाटली पाहिजे. मनुष्याच्या सेवेत स्वत:ची आहुतीही द्यावी, दुस-यासाठी आनंदाने हृदय उचंबळून येऊन प्राणार्पण करावे ह्या गोष्टी मनुष्याच्या मनावर, आजच्या व उद्याच्या मानवांच्या मनावर नाही का ठसविता येणार?