कला म्हणजे काय? 94
जर मानवजात पुढे जात असेल, तर तिच्या प्रगतीला दिशा ही असलीच पाहिजे. ही दिशा दाखविणारा त्या त्या काळांत मार्गदर्शकही असला पाहिजे. आजपर्यंत हे दिग्दर्शनांचे काम धर्मानेच केले आहे. मानवी समाजाची प्रगती धर्माच्या देखरेखीखाली व गुरुत्वाखालीच होत आली आहे. धर्म हाच सदैव प्रगतिपथाचा वाटाडया होता, ही गोष्ट इतिहास सिध्द करीत आहे. मानवजात जर सारखी पुढे जात असेल तर आजच्याही काळात ती पुढे जात असली पाहिजे. आणि धर्माचे मार्गदर्शकत्व असल्याशिवाय जर ती पुढे जात नसेल, तर आजच्याही काळांत आजच्या काळाला अनुरूप असा मार्गदर्शक धर्म असलाच पाहिजे; मग अशा धर्माने सभ्य व शिष्ट लोकांच्या कपाळास आंठया पडोत किंवा न पडोत, ह्या धर्माचे अस्तित्व त्यांना मान्य केलेच पाहिजे. धर्म म्हणजे बाह्यतंत्र नव्हे, निरनिराळे पंथ नव्हेत. धर्म म्हणजे धर्ममय दृष्टी, मानवजातीच्या कल्याणाची दृष्टी. ही दृष्टी आजही आपणांजवळ आहे. ज्या विचाराच्या अनुरोधाने आपण सारे जात आहोत, ज्या विचारानुसार जाण्यासाठी आपण धडपडत आहोत, तो धर्ममय विचार आजही आपणा सर्वांजवळ असलाच पाहिजे. जेथे जेथे आज खरी प्रगती आहे, तेथे तेथे ही धर्मता आहेच आहे. ही हार्दिक व बौध्दिक धर्मता-रूढी व विधी यांची नव्हे-जर आपणाजवळ असेल, ज्याप्रमाणे सदासर्वदा होत आले त्याप्रमाणे आजही जी कला आजच्या धार्मिक ध्येयाला अनुकूल भावना देईल, तिला जी कला प्रतिकूल भावना देईल, तिच्यापासून अलग केली पाहिजे. जी कला धर्माच्या बाबतीत उदासीन आहे व केवळ सुखासीन आहे ती दूर केली पाहिजे; तिला त्याज्य ठरविले पाहिजे, तिचा तिरस्कार व धिक्कार करण्यात आला पाहिजे.
आजच्या काळांतील अत्यंत व्यापक; विशाल, थोर व व्यवहार्य अशी धर्मभावना म्हणजे आपले सर्वांचे ऐहिक व पारलौकिक कल्याण आपल्यांतील बंधुभावनेच्या वाढीवर अवलंबून आहे, हा विचार होय. सर्व मानवांनी स्नेहाने व प्रेमाने एकत्र गुण्यागोविंदाने नांदावे, एकमेकांस उन्नत होण्यास, पुढे जाण्यास साहाय्य करावे यांतच सर्वांचे हित व कल्याण आहे. ही दृष्टी म्हणजे आजचा धर्म होय. हा विचार ख्रिस्तानेच दिला असे नाही, तर भूतकाळातील सर्व थोर महात्म्यांनी हेच सांगितले व आचरून दाखविले. आजही आपल्याममध्ये जे थोर पुरुष आहेत ते हीच गोष्ट निरनिराळया रीतींनी दाखवीत आहेत. हेच तत्त्व जिकडेतिकडे पुन्हा पुन्हा प्रतिपादिलेले दिसून येईल. मानवजातीचा जो अनंत व अपार कार्यव्यापार चालला आहे, त्याच्याखाली हेच तत्त्व दिसून येईल. एका बाजूने मानवांच्या ऐक्याच्या आड येणारे नैसर्गिक विरोध दूर केले जात आहेत व दुस-या बाजूने सर्व मानवांना एकत्र जोडतील, ही जी आजची धर्मदृष्टी तिच्यावरून आजच्या कलेतील विषयांचे आजच्या कलेकडून दिल्या जाणा-या भावनांचे मूल्यमापन केले पाहिजे. केवळ कलाच नव्हे तर आपले सारे जीवन याच प्रकाशांत तपासले पाहिजे; आपण कलाप्रांतातील त्या कृतींना पसंत केले पाहिजे, उचलून धरले पाहिजे, नावाजले पाहिजे. ज्या कृती वर सांगितलेल्या धार्मिक दृष्टीच्या झ-यांतून बाहेर पडणा-या भावना देतील, त्या धार्मिक दृष्टीला विरोधी कला ती नाकारावयाची; तिला डोके वर काढू द्यावयाचे नाही आणि जी कला धर्मभावना देत नाही व तिला विरोधही करीत नाही अशी असेल, तिच्या बाबतीत काहीच करावयाचे नाही. तिला उत्तेजनही द्यावयाचे नाही किंवा तिला मारून टाकण्यासाठी चंगही बांधावयाचा नाही.
ज्याला नवयुग म्हणतात. त्याच्या आरंभी वरच्या वर्गातील लोकांनी जी फार मोठी चूक केली व जी आज आपणही करीत आहोत. ती चूक म्हणजे ते धर्ममय कलेस महत्त्वच देत नाहीसे झाले, एवढेच नव्हे, तर धर्ममय कलेच्या ऐवजी दुसरी एक केवळ दु:खभावना देणारी क्षुद्र कला ते पसंत करू लागले ही होय. त्यावेळेस धर्ममय कलाच नव्हती, व त्यांनी ती उत्पन्नही केली नाही. कारण त्यांना ती नकोच होती. धर्महीन, भावनाहीन, केवळ सुखसंवेदना देणारी जी कला, तिची त्यांनी उभारणी केली; तिला पाठिंबा देऊ लागले, उत्तेजन व महत्त्व देऊ लागले. धर्ममय कला तर उरलीच नव्हती; आणि ज्या कलेला उत्तेजन द्यावयास नको होते, तिलाच उत्तेजन दिले गेले; तिचीच सर्वत्र वरच्या वर्गात चहा होऊ लागली.