कला म्हणजे काय? 89
ज्या कृतीने आपले व कलावानाचे हृदय एक होते, ज्या कृतीमुळे इतरांशीही भावनैक्य अनुभवता येते, ती खरी कलाकृती होय. परंतु अशी संस्पर्शता जर नसेल, कलाकृतीचा निर्माता व तिच्यामुळे वेडे होणारे अन्य जन यांच्याशी जर हा एकरूप होण्याचा अनुभव आपणांस येत नसेल तर ती कलाकृती नव्हे असे समजावे. संस्पर्शता हे कलेचे मुख्य व प्रधान लक्षण आहे, इतकेच नव्हे तर ज्या मानाने ही संस्पर्शता कमी किंवा अधिक असेल त्या मानाने ती कलाकृती हीन किंवा श्रेष्ठ हे ठरत असते. संस्पर्शतेवर-संस्पर्शतेच्या प्रमाणावर-कलेचे श्रेष्ठत्व किंवा हीनत्व हे अवलंबून असते.
जितकी संस्पर्शता अधिक बलवन तितकी ती कलाकृती उत्कृष्ट, कला या दृष्टीने श्रेष्ठ, असे समजावे. कारण यावेळेस आपण कलेच्या विषयाकडे लक्ष देत नसून कलेच्या केवळ गुणांकडे पाहात आहोत. कलेतील विषय बाजूला ठेवून आपण सध्या तिच्याकडे पाहूया. कलेपासून ज्या भावना उत्पन्न होतील, त्या भावनांचे मूल्यमापन, त्या भावना सत आहेत का असत् आहेत, वगैरे विचार सध्या आपण एकीकडे ठेवू. निदान भरपूर भावना तरी उत्पन्न होतात की नाही हे पाहूया. ही भावना संस्पर्शता साधुत्वाची आहे का असाधुत्वाची आहे ते आणखी मग पुढे पाहू. भावनास्पर्श जितका बलवान तितकी ती कलाकृती अधिक सत्य कला होय, अधिक श्रेष्ठ कला होय.
कलेमधील ही स्पर्शता पुढील तीन गुणांवर अवलंबून असते. पुढे दिलेले तीन गुण ज्या मानाने कमी किंवा अधिक त्या मानाने ही स्पर्शता कमी किंवा अधिक होत असते. (१) जी भावना दिली जाते, ती कलावानाची किती आहे, ती स्वतंत्र किती आहे, तिच्यात वैशिष्टय किती आहे. (२) जी भावना दिली जाते ती स्पष्ट व निश्चित किती आहे. (३) जी भावना दिली जात आहे तिच्या पाठीमागे कळकळ किती आहे; त्या भावनेने स्वत: कलावान किती संस्पृष्ट झाला आहे, वेडा झाला आहे.
भावना जितकी स्वतंत्र व वैशिष्टयपूर्ण तितका तिचा परिणाम अधिक होतो. ती कलाकृती वाचून ज्या अंत:करणाच्या विशिष्ट स्थितीत आपण जातो, ती स्थिती जितकी नवीन व अननुभूत, तितका त्या स्थितीत जाताना, त्या भावनेशी अनुरूप होताना होणारा आनंद अधिक; आणि त्या स्थितीत म्हणूनच स्वखुषीने व फारसे आयास न पडता वेगाने आपण शिरू.
भावनेच्या प्रकटीकरणांत जितकी स्वच्छता व स्पष्टता असेल, तितकी संस्पर्शास मदत होते. तेथे बुध्दीची जरूर पडू नये. कलावानाजवळ एकरूप होताना या भावनेच्या विशदत्वामुळे सुलभ व सोपे जाते. या सुलभत्वामुळे त्यात समाधान अधिक असते. जितकी भावना स्वच्छ व उघड तितका ऐक्याचा व तन्मयतेचा आनंद अधिक. ही भावना आपलीच आहे, आपल्याच हृदयातील आहे असे त्यामुळे अधिक वाटते.
परंतु संस्पर्शता सर्वांत अधिक जर कशाने उत्पन्न होत असेल तर ती तळमळीने होय. त्या त्या भावनांनी कलावानाचे हृदय ज्या प्रमाणात खालीवर हेलावत असेल, त्या प्रमाणांत तो दुस-यांच्या हृदयाला नाचवील, हलवील. लेखक, गायक, वादक, वर्तक, संगीतज्ञ, कवी, चित्रकार-ती ती कलाकृती निर्माण होणारा कलावान स्वत:च्या भावनेने स्वत:च किती मस्त झाला आहे, स्वत:लाच कसा विसरला आहे, दुस-यावर परिणाम व्हावा म्हणून मी ही कृती निर्मित आहे, इत्यादी बाह्य हेतूंचा त्याला किती विसर पडला आहे, स्वत:ला राहावत नाही म्हणूनच जणू तो ती कृती कशी निर्मित आहे-ह्या गोष्टींचा अनुभव ज्या मानाने द्रष्टा, श्रोता, वाचक यांना येईल, ज्या प्रमाणांत त्यांना कलावानाची ही दिव्य दशा दिसून येईल, त्या मानाने संस्पर्शता अधिक होईल; त्या मानाने कलावानाचे व त्यांचे ऐक्य अधिक संपूर्ण होईल. परंतु ज्यावेळेस अमुक एक कलावान स्वत:च्या आनंदासाठी म्हणून नव्हे तर दुस-याला दु:ख द्यावे म्हणून कलाकृती निर्मित आहे असे लोकांना वाटते, त्यावेळेस हा हृदयैक्याचा अनुभव येत नाही. वक्ता, कवी, चित्रकार, गाणारा जे काही प्रकट करीत आहेत ते दुस-यासाठी फक्त आहे, त्यांच्या आंतरिक तृप्तीसाठी नाही, ही कल्पना लोकांच्या मनांत येतांच, ते शब्द, ते रंग, ते सूर अंत:करणाचे नाहीत, असे मनात येताच, ते वक्तृत्व कितीही उत्कृष्ट असो, ते कवित्व कितीही उत्कृष्ट असो, ते चित्र कितीही सुंदर असतो, ते गाणे कितीही ढंगबाज असो, त्याचा काहीही परिणाम लोकांवर होणार नाही. बाह्यतंत्र कितीही कुशलतेने व भपकेबाजपणाने तयार केलेले असो, बाह्य सजावट वाटेल तितकी सुंदर असो, त्याचा संस्पर्शतेला उपयोग न होता अडथळाच होईल. भावनेला केवळ या सोंगाचा वीटच नाही तर तिटकारा येतो. ती अशा सोंगापासून पळून जाते.