कला म्हणजे काय? 33
प्रकरण सहावे
(सुखासाठी कला हे तत्त्व कसे मान्य केले गेले; सत् काय व असत् काय हे धर्म दर्शवितो; चर्च-ख्रिश्चन धर्म; नवयुग; वरच्या वर्गातील लोकांचा अंधश्रध्दावाद; सौंदर्य व साधुता यांचा त्यांनी केलेला घोटाळा.)
प्राचीनकाळी ज्या कलेला फारसे महत्त्व नव्हते, फारसा मान नव्हता, परंतु जिचे अस्तित्व राहू दिले जात होते अशा कलेलाच ती जर सुख देईल तर आम्ही चांगली मानू असे मानण्यापर्यंत जी मजल आली, ती कशी आली ?
असे होण्याला पुढील कारणे आहेत; आपण जीवनाला जो अर्थ देऊ त्यावर कलेने प्राप्त होणा-या भावनांचे मोल अवलंबून असते. जीवनात सत् व असत् यांच्या ज्या कल्पना मनुष्य करितो, त्यांच्यावर कलेचे मोल अवलंबून असते, चांगले काय व वाईट काय हे धर्म शिकवितो.
मानवजात आंधळेपणाच्या जीवनातून डोळस जीवनाकडे सारखी जात आहे; अर्धवट, अस्पष्ट व संकुचित अशा जीवनाच्या कल्पनांतून स्पष्ट, व्यापक व विशाल अशा जीवनाकडे ती जात आहे. मानवजातीत जेव्हा जेव्हा चळवळी होतात, त्यावेळेस ती ती चळवळ सुरू करणारे पुढारी असतात. नेते कोणास म्हणावयाचे ? जीवनाचा अर्थ अधिक स्पष्टपणे ज्यांना कळतो ते नेते. या नेत्यांममध्ये पुन्हा असा एखादा पुरुष असतो की जो आपल्या स्वतःच्या जीवनात व स्वतःच्या वाणीत हा जीवनाचा अर्थ इतर सर्वांपेक्षा अधिक स्पष्टपणे, निश्चितपणे प्रकट करीतो. जीवनाच्या बुध्दीला समजलेला अर्थ कृतीत विचार, उच्चार व आचार या तिहीत तो प्रकट करतो इतरांपेक्षा अधिक स्वच्छ रीतीने प्रकट करीतो. असा हा महापुरुष जीवनाला जो अर्थ देतो, जीवनाला जे स्वरूप देतो ते धर्माचे मुख्य रूप होय. ही वस्तु म्हणजे धर्माचा प्राण होय. त्या महापुरुषासंबंधींच्या नाना स्मृति, आख्यायिका, दंतकथा, तसेच नानाप्रकारचे उत्सव, विधि व समारंभ यांचाही मेळावा त्या प्राणभूत कल्पनेभोवती जमतो. आणि ह्या सर्व गोष्टी मिळून धर्म ही वस्तु तयार होत असते. त्या त्या काळी त्या त्या लोकसमुदायांत जे अत्यंत थोर महान पुरुष होतात, त्यांना जीवनाचा जो परमोच्च अर्थ प्रतीत होतो, त्या अर्थाचे बाह्य प्रकटीकरण, बाह्य स्पष्टीकरण म्हणजे त्या त्या काळातील धर्म होत. ज्याच्याकडे सारा समाज निश्चितपणे सारखा जात असतो, ज्याच्याकडे गेल्याशिवाय मानवी समाजाला राहावतच नाही, असे जे जीवनाचे स्वरूप, अशी जी जीवनाची कल्पना किंवा ध्येय त्याला धर्म म्हणतात. मनुष्याच्या विचारांची, भावनांची व कल्पनांची किंमत आजपर्यंत धर्मच ठरवीत आले आहेत, आणि आजही या कामी धर्म मदत करीत आहेत. धर्माने दिग्दर्शित केलेल्या ध्येयाकडे जर भावना आपणास नेत असतील, भावना धर्मविरोधी नसून जर धर्मानुकूल असतील तर त्या भावना चांगल्या; आणि धर्मानें दाखविलेल्या ध्येयापासून भावना जर आपणास दूर नेत असतील, त्या जर धर्माला प्रतिकूल असतील तर त्या भावना वाईट.
ज्यू लोकांममध्ये ''ईश्वर एक आहे. त्याची पूजा करावी, ईश्वराची म्हणून जी इच्छा असू शकेल ती पूर्ण करावी'' असे जर धर्म सांगत असेल, जीवनाचा हा अर्थ असे जर धर्म शिकवीत असेल तर ज्या थोर ग्रंथांतून त्या एका ईश्वराचे प्रेम व त्याच्या इच्छेबद्दलचे प्रेम यासंबंधीच्या भावना ओतप्रोत भरलेल्या दिसून येतील त्या ग्रंथांत उच्च कला आहे असे ज्यू लेक मानतील. आणि ईश्वर एक आहे, त्याच्या इच्छेला आपण शरण जावे ह्याविरुध्द जे असेल, उदाहरणार्थ नाना प्रकारचे देव मानून त्यांची पूजा करणे वगैरे गोष्टी जेथे असतील, ज्यामध्ये प्रकट केलेल्या असतील तेथे असत् कला आहे असे ज्यू लोक समजतील.
ऐहिक सुख, सौंदर्य व शारीरिक बळ या तीन गोष्टीत मानवीजीवनाची परिपूर्णता आहे असे ग्रीक धर्म सांगत असे. म्हणून साहजिकच उत्साह, आनंद व बळ यांना उत्तेजन देणारी ती सर्वोत्कृष्ट कला आणि निराशा व दौर्बल्य प्रकट करणारी उत्तेजन देणारी ती सर्वोत्कृष्ट कला आणि निराशा व दौर्बल्य प्रकट करणारी ती हीन कला, असे ग्रीक लोक मानीत असत.