कला म्हणजे काय? 18
शौपेनहार (१७८८-१८६०). हा हेलेगचा दुसरा मातब्बर प्रतिस्पर्धी व विरोधी सौंदर्यमीमांसक. याने हेगेलच्या केवळ सौंदर्यमीमांसेलाच विरोध केला असे नाही तर त्याच्या सर्व दर्शनालाच त्याने कसून विरोध केला आहे. शौपेनहार म्हणतो-''हेतु ह्या जगात अनेक भूमिकांवर अवतीर्ण होत असतो, प्रकट होत असतो. जितक्या अधिक उच्चभूमिकेवर तो प्रकट होतो, तितका तो अधिक सुंदर दिसतो. हे जरी खरे असले तरी प्रत्येक भूमिकेचे काही विशिष्ट असे सौंदर्य असतेच; मग ती भूमिका वरची असो वा खालची असो. हेतु ज्या अनेक भूमिकांवर प्रगट होतो-त्यातील एखाद्या भूमिकेचे स्वत्व विसरून चिंतर करणे म्हणजे सौंदर्याचीच अनुभूति घेणे होय. हेतूला नाना भूमिकांवर मूर्त करण्याची शक्ती सर्व मानवांत आहे. कलावानात ही शक्ती अधिक प्रमाणात असते व म्हणून अधिक श्रेष्ठ प्रकारचे सौंदर्य तो प्रकट करू शकतो.
वरील नामांकित लेखकांशिवाय दुसरेही दुय्यम लेखक जर्मनीत पुष्कळ झाले. हार्टमन, कर्चमन, श्नासे त्याचप्रमाणे काही अंशी हेल्महोल्ट्स, बर्गमन, जंगमन वगैरे कितीतरी लेखक झाले.
हार्टमन (१८४२) च्या मते सौंदर्य बाह्य जगात नसते. किंवा वस्तूच्या मूळ रूपातही ते नसते; ते मनुष्याच्या अंतरात्म्यांतही नसते. कलावानाने निर्माण केलेला जो देखावा, निर्मिलेली जी सृष्टी-त्यात ते असते. वस्तू मुळात सुंदर नसते. कलावान तिला सौंदर्य देतो.
श्नासे (१७९८-१८७५) ह्याच्या मते, निर्दोष व संपूर्ण असे सौंदर्य जगात नाही. निसर्गात जे सौंदर्य दिसते ते त्या ध्येयभूत अव्यंग सौंदर्याच्या जास्तीतजास्त जवळ गेलेले असते. निसिर्ग जे देऊ शकत नाही, ते कला देते. स्वतंत्र व निरुपाधिक असा जो अहं-तो अहं निसर्गात न ऐकू येणारे दिव्य संगीत ऐकतो-त्या अहंच्या उत्साहांतून, त्याच्या सामर्थ्यातून, स्फूर्तीतून सौंदर्य प्रगट होत असते.
कर्चमन (१८०४-८४) याने प्रयोगात्मक सौंदर्यमीमांसेवर लिहिले आहे. इतिहासातील सारी स्वरूपे केवळ यहृच्छेने जोडलेली असतात. इतिहासाचे तो सहा भाग पाडतो. ज्ञानप्रांत, द्रव्यप्रांत, नितिप्रांत, श्रध्दाप्रांत, सौंदर्यप्रांत. या शेवटच्या प्रांतातील व्यापार म्हणजे कला.
हेल्महोल्ट्झ (१८२१-९४) संगीतसंबंध सौंदर्यावर ह्याने लिहिले आहे. संगीतात जे सौंदर्य असते ते काही अविचल व अभंग अशा नियमांच्या पालनाने निर्माण होत असते. हे नियम कलावानास माहीत नसतात. परंतु तो सहज नकळत, सौंदर्य निर्माण करीत असतो. आपण नियम पाळून सौंदर्य निर्माण करीत आहोत याची त्याला जाणीव नसते. म्हणून सौंदर्याचे पृथक्करण करता येत नाही. सौंदर्य निर्माण करीत आहोत ही जाणिवही नसते, ते पृथक्करण कसे करावयाचे? जेथे स्मृतीच नाही तेथे कायदे काय शोधणार?
वर्गमन (१८४०) हा म्हणतो की, सौंदर्याची व्यक्तिनिष्ठ व्याख्या करता येईल, परंतु वस्तुनिष्ठ करता येणार नाही. सौंदर्य हे स्वसंवेद्य आहे. कोणाला कशाने आनंद होतो ते सांगणे एवढेच सौंदर्यशास्त्राचे काम आहे.
जंगमन हा १८८५ मध्ये मरण पावला. त्याच्या मते सौंदर्य हे अतींद्रिय असे वस्तुस्वरूप आहे; सौंदर्याचे चिंतन केल्यानेही मनाला आनंद होतो; सौंदर्य हे प्रेमाचे उगमस्थान आहे. आता अर्वाचीन काळातील इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांतील प्रमुख विचारवंतांचे सौंदर्यविषयक विचार पाहू या.
या काळातील फ्रान्समधील नाव घेण्यासारखे सौंदर्यसमीक्षक म्हणजे कोझीन, जोप्लाय, पिक्टेट, रॅव्हेसॉन, लेव्हेकी वगैरे होत.