कला म्हणजे काय? 50
वरच्या वर्गातील लोक, ज्यांच्याबरोबर आपण बसतो, उठतो, वावरतो, त्यांचे अनुभव व भावना यांतच वैचित्र्य व महत्त्व आपणांस दिसून येते. परंतु आपल्या या वरच्या वर्गातील लोकांच्या भावनांचे जर पृथक्करण केले, त्या भावनांचे जर खरे स्वरूप पाहिले, त्या भावना जर उपलब्ध करून पाहू लागलो तर काय दिसेल? तीनच अत्यंत क्षुद्र, अति सामान्य अशा भावना आपणांस तेथे दिसून येतील. गर्व, वैषयिकभोग व जीवनाचा कंटाळा या तीन भावना वरच्या वर्गातील लोकांच्या जीवनांत दिसून येतील. या तीन भावनांचाच सारा खेळ, या तीन भावनांचेच सारे विलास व विलाप. या तीन भावनांचेच त्यांचे त्रैलोक्य. या तीन भावना व त्यांतून फुटणा-या तत्सदृश लहानमोठया दुस-या भावना एवढाच फक्त काय तो श्रीमंत वर्गाच्या कलेला विषय असतो. वरच्या वर्गाची कला बहुजनसमाजाच्या कलेपासून विमुक्त झाली तेव्हा आरंभी आरंभी या कलेचा वर्ग किंवा फाजील अभिमान हा मुख्य विषय होता. नवयुग व नवयुगानंतर काही वर्षे वरिष्टांच्या स्तुति हाच कलेचा धंदा होता. पोप, राजे महाराजे, अमीर उमराव, सरदार दरकदार यांचे पोवाडे गाणे हेच त्यावेळेस कलेचे काम असे. या श्रेष्ठांच्या व वरिष्ठांच्या सन्मानार्थ गीते रचिली जात, नाटके लिहिली जात, प्रेमगीते गायिली जात. स्तोत्रांतून त्यांची स्तुती केली जाई, दगडांतून त्यांचे पुतळे खोदण्यांत येत, चित्रांत त्यांचे रुबाबदार चेहेरे रंगविण्यात येत. कलेने नानाप्रकारांनी श्रीमंतांची पूजा चालविली होती, खुशामत चालविली होती.
यानंतर कलेत रतिभावाने अधिकाधिक शिरकाव केला. नाटके, कादंब-या यांतून दुसरा विषयच नसे. दुस-या भावनेचा स्पर्शही त्यांना होत नसे. थोडे फार अपवाद वगळले तर असे म्हणण्यास हरकत नाही की, श्रीमंत वर्गाच्या प्रत्येक कलावस्तूंत रतिभाव हे एक प्रमुख व आवश्यक अंग आहे. मग ती कलावस्तू काव्य असो, चित्र असो, पुतळा असो, की काही असो.
श्रीमंतांच्या कलेतील तिसरी भावना म्हणजे जीवनाचा कंटाळा. ही भावना जरा उशीरानेच यांच्या कलेत शिरली. १९व्या शतकाचे आरंभी ही भावना काही अपवादात्मक व्यक्तींकडूनच प्रकट करण्यात आली होती. ही भावना प्रकट करणारे पहिले कलावान्, म्हणजे वायरन्, लीओपार्डी व हेन हे होत. परंतु आता तर ही भावना प्रकट करणे म्हणजे फॅशनच होऊन बसली आहे. जो उठतो तो जीवनाचे रडगाणे गाऊ लागतो. अगदी सामान्य व क्षुद्र लोकही ही भावना प्रकट करीत असतात. फ्रेंच टीकाकार डोमिक याने अलीकडच्या नवीन ग्रंथकारांचे जे वर्णन केले आहे, ते अत्यंत न्याय्य व योग्य असे आहे. तो म्हणतो. ''या नूतनोदित ग्रंथकारांच्या जीवनाबद्दलचा कंटाळा, सद्य:कालाबद्दल तिटकारा, कलेच्या चष्म्यांतून मागे होऊन गेलेल्या युगांकडे पाहून त्याबद्दल हळहळ करीत बसणे, विरोधाची आवड, इतरांपेक्षा काहीतरी निराळे आपण आहोत असे दाखविण्यासाठी चाललेली आटापिटा, साधेपणाबद्दलची वरवरची दिखाऊ इच्छा, जे आश्चर्यकारक आहे. त्याच्याबद्दल एखाद्या लहान मुलाप्रमाणे कुतूहलवृत्ती दाखविणे, आत्मपरीक्षण करण्याची दुबळी व रोगट वृत्ती, कमजोर मज्जातंतू, आणि सर्वांत अधिक दिसून येणारी गोष्ट म्हणजे विलासमुखाची पुन: पुन्हा केलेली कंटाळवाणी मागणी-हे असे सारे दिसून येत असते.'' अहंकार, विलासप्रियता व जीवननैराश्य या तीन भावनांतील विलासप्रियतेतील विषयभोगेच्छेची, जी सर्वांत निकृष्ट, तुच्छ व हीन अशी भावना (जी भावना मानवांचाच विशेष आहे असे नसून पशुपक्ष्यांनाही जो आहे व जिचा ते अनुभव घेऊ शकतात.) तीच अर्वाचीन काळांतील कलाकृतींना प्रामुख्येकरून विषय झाली आहे.