कला म्हणजे काय? 80
ते निष्प्राण होईल वा प्राणवान होईल; या लहानसान फरकांत एकदम प्राण घालण्याची किंवा घेण्याची शक्ती असते. कलाकृती बारीकसारीक अनंत अंशांनी बनलेली असते. कलावानाला हे लहानसान अंश ज्या मानाने सापडतील, त्या मानाने त्यांची कला स्पर्शप्रद अशी होईल. बाह्य साधनांनी हे सूक्ष्म भेद शिकविणे कठीण आहे; अगदी अशक्य आहे. मनुष्य स्वत:च्या भावनेला वश झालेला असला, स्वत:च्या भावनेने वेडा झालेला असला म्हणजे हे सारे आपोआप त्याला येते, ते सारे चित्रकाराच्या हातात येते, संगीतज्ञाच्या बोटांत येते, गाणा-याच्या कंठांत येते, कवीच्या लेखणीत येते; नाचणा-याला योग्य ताल व वेळ कितीही शिकवा, गाणा-याला ताना कशा घ्याव्या ते कितीही शिकवा, चित्रकाराला अनंत रेखांतील योग्य तीच रेखा घेणे कितीही शिकवा, कवीला योग्य त्याच शब्दांची जुळणी करणे कितीही शिकवा या गोष्टी शिकवून येणार नाहीत, या गोष्टी शिकवून येत नसतात. या गोष्टी भावनाच आपणांस शिकविते, भावनाचा आणून देते. जणू भावनेबरोबरच त्या असतात. भावनाच खरा गुरू, भावनाच सारे काही करते-सवरते, कलेची नक्कल कशी करावी हे कलागृहे शिकवितील; परंतु अस्सल कलाकृती कशी निर्माण करावी हे तो शिकवू शकणार नाहीत.
हे थोडेथोडे फेरफार लक्षात येऊ लागताच शाळांतील शिक्षण संपले कारण कलेला तेथे प्रारंभ झाला; कलेचे दर्शन होऊ लागले.
कलेचे अनुकरण करण्याची सवय लावल्याने सत्कला समजण्याची शक्ती नष्ट होते आणि म्हणून धंदेवाईक कलागृहांतून शिकून जे बाहेर पडतात त्यांना सत्कला फारच थोडी समजते असे दिसून येते. धंदेवाईक शाळा दंभ निर्माण करतात. धार्मिक पाठशाळांतून धर्मोपदेशक बनवू पाहण्याने ज्याप्रमाणे धार्मिक दंभ निर्माण होतात, त्याप्रमाणे ही कलाभवने कलाप्रांतांत दंभ निर्माण करतात. धर्म हा अंतरीच्या जिव्हाळयाचा अनुभव आहे. खरा धर्मोपदेशक आतून तयार होतो. तो ग्रंथ पढवून तयार करता येत नसतो. तो तयार धर्मोपदेशक खंडीभर वचने बोलेल, परंतु त्या वचनांनी कोणाचे हृदय हलणार नाही. त्याच्या ओठावर धर्म असतो, पोटांत नसतो. कलेचेही असेच आहे. खरा कलावान शिकवून तयार करता येत नसतो, तो स्वयंभू असतो, त्याच्या आंतरिक प्रेरणेने व स्फूर्तीने तो बनत असतो.
कलागृहे कलेचा दोन प्रकारे नाश करीत असतात. एक म्हणजे खरी कला निर्माण करण्याची शक्ती ती मारतात. जे कोणी दुर्दैवाने अशा शाळांत जातात, त्यांची ईश्वरदत्त प्रतिभा तेथे मारली जाते. त्या शाळांतून सात-आठ वर्षांचा भला जंगी अभ्यासक्रम आखलेला असतो. त्या सर्व चाकोरीतून त्याला जावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे कलागृहे नकली कलेच्या इतक्या अपरंपार कृती तयार करतात की, त्यामुळे बहुजनसमाजाची रूची बिघडते. आज या असत्कलाकृतींना सर्वत्र पूर आला आहे.
पूर्वीच्या कलावानांनी ज्या ज्या कलांना अलंकृत केले. त्या कलावानांच्या पध्दती जन्मजात कलावानाला माहीत असाव्यात, म्हणून प्रत्येक प्राथमिक शाळेतूनच चित्रकला, संगीत यांचे वर्ग असावेत. या प्राथमिक संस्कारानेच जर एखाद्यांत ईश्वरी देण्याचा स्फुल्लिंग असेल तर तो त्या कलांचे नमुने पाहून त्यांचा उपयोग करून स्वत: स्वतंत्रपणे आपल्या विशिष्ट कलेत कुशल व पारंगत होईल. त्यासाठी ७३८ वर्षे अभ्यासक्रम आखणा-या विशिष्ट व स्वतंत्र शाळा नकोत.
कलावानांचा धंदेवाईकपणा, कलेचे टीकाशास्त्र आणि ही कलागृहे यांनी अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, आजकाल पुष्कळांना कला काय व कशाशी ती खातात हेच मुळी समजत नाहीसे झाले आहे. सत्कलेची, अभिजात कलेची त्यांना कल्पनाच मुळी नाही. अत्यंत हीन, घाणेरडी, अभद्र व दांभिक अशी कलाच कला म्हणून ते उराशी धरत आहेत!