कला म्हणजे काय? 121
कलेने दिलेल्या भावना व शास्त्राने दिलेले ज्ञान यांचे मूल्यमापन त्या त्या काळातील ज्या श्रेष्ठ व थोर धर्मभावना असतील त्यांच्यावरून करावयाचे असते. त्या त्या काळात जीवनाचे जे ध्येय निश्चित केलेले असेल, जीवनाचा जो अंतिम अर्थ मान्य केला असेल त्यावरून कलादत्त भावना व शास्त्रदत्त विचार यांचे मोल व महत्त्व ठरविले जात असते.
जीवनाच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ज्या ज्ञानाची जास्तीत जास्त मदत होईल, त्या ज्ञानाचा अधिक व आधी अभ्यास केला जाईल; जे ज्ञान या ध्येयाकडे जाण्यास कमी मदत करील, त्याचे कमी व बेतानेच परिशीलन होईल; व ज्या ज्ञानाचा या ध्येयाकडे जाण्यास अजिबात उपयोगच नाही त्या ज्ञानाला हातही लावण्यात येणार नाही-व जर कोणी अशा अनुपयुक्त ज्ञानाचा अभ्यास करील तर त्या अभ्यासाला शास्त्र हे तोर नाव देण्यात येणार नाही. याप्रमाणे सतत चालत आले आहे व आजही असेच असले पाहिजे. मनुष्याचे जीवन व ज्ञान यांच्यामध्येही असा संबंध आहे. परंतु आजच्या वरच्या वर्गातील लोकांचे शास्त्र ते कोठलाच धर्म मानीत नाही. धर्म म्हणजे एक अरान्त भावना आहे, भोळसटपणा व मूर्खपणा आहे असे या शास्त्राचे मत आहे. असले धर्महीन शास्त्र मी जो वर ज्ञानासंबंधी भेद सांगितला तसा भेद करणार नाही. सर्वच ज्ञान सारख्याच किंमतीचे, सर्वच ज्ञान अभ्यसनीय असे हे शास्त्र मानील.
आजकालचे शास्त्रज्ञ सांगतात, ''आम्ही प्रत्येक वस्तूचा अभ्यास करूव तिचे स्वरूप शोधू. आम्हाला उपयुक्त व अनुपयुक्त असे नाही. ज्ञानासाठी म्हणून ज्ञान ही आमची दृष्टि. नि:पक्षपातीपणाने, समदृष्टीने सृष्टीतील सर्व वस्तूंचा अभ्यास करणे हा आमचा धर्म. खरे अभ्यासनीय आहे, त्याज्य काहीच नाही. ''ते असे म्हणाले तरी सृष्टि अनंत व अपार आहे. या चराचरातील प्रत्येक अणुरेणूचा अभ्यास करणे-तितक्याच कसोशीने प्रत्येक वस्तूचा अभ्यास करणे हे ध्येय ठीक आहे, परंतु ते व्यवहार्य नाही. आणि हे शास्त्र तोंडाने जरी वरीलप्रमाणे बोलले तरी त्यांचे वागणे त्या बोलाप्रमाणे थोडेच असते. प्रत्येक वस्तूचा ते अभ्यास करीत नाहीत एवढेच नव्हे तर जो काही अभ्यास ते करतात तोही निरपेक्ष, निर्हेतुक व नि:पक्षपाती असा नसतो. त्या वस्तूचाच अभ्यास केला जातो, त्या पदार्थांचेच संशोधन केले जाते, ज्याची जरूर असते. मागणीप्रमाणे पुरवठा हे तत्त्व येथेही आहे. ज्याचा शोध करण्याची आवश्यकता भासते, त्याचा शोध सुरू होतो. आणि पुष्कळ वेळा अशाच वस्तूंचा अभ्यास करण्यात येत असतो, की ज्या सुखे वाढवतील, श्रम वाचवतील, संपत्ति आपल्या हातात आणून देतील, याच दृष्टीने वस्तूंची निवड शास्त्रज्ञ करीत असतो. शास्त्रात मग्न असणा-या वरच्या वर्गातील लोकांना जर काही पाहिजे असेल तर त्या दोन गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे ज्या सामाजिक रचनेत त्यांचे सारे विशिष्ट हक्क अबाधित राहतील ती सामाजिक रचना टिकविणे; व दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष उपभोगता येतील अशा अत्यंत सुखप्रद वस्तूंची चंगळ, आणि ज्यांना फारसा बौध्दिक किंवा मानसिक प्रयत्न लागणार नाही अशा कर्महीन जिज्ञासेला तृप्त करणा-या काही गोष्टी.
अर्वाचीन शास्त्रांचे दोन भाग आहेत. एका भागाला आपण सामाजिक म्हणू व दुस-या भागाला भौतिक भौतिक म्हणू, सामाजिक शास्त्रामध्ये धर्म, तत्त्वज्ञान यांचाही समावेश होतो. तसेच चालू परिस्थितीप्रमाणे ज्यांनी रूप धारण केले आहे असे अर्थशास्त्र व इतिहासशास्त्र यांचाही त्यातच समावेश होतो. ही सामाजिक शास्त्रे सध्या चालू असलेलीच विषम अशी सामाजिक जीवनपध्दती पुढेही चालू राहावी, हीच पध्दती टिकावी, तिचा भंग करण्यात येऊ नये. एतदर्थ मतप्रचार करण्यात दंग झालेली आहेत. सध्याच्या सामाजिक विषमतेचे समर्थन करण्यात ती मग्न आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की आजची जी सामाजिक रचना आहे ती सृष्टीनियमांनीच बनलेली आहे. विषमता ही सृष्टीचा कायदाच आहे. सृष्टीचे कायदे आपल्या गोड लहरीप्रमाणे माणसाला बदलता येणार नाहीत, आणि सध्याची समाजरचना भग्न करण्याचे सारे प्रयत्न, आजची घडी मोडून टाकण्याचे सारे श्रम व खटाटोप अंती विफळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे सारे प्रयत्न चुकीचे, अयोग्य व अपायकारक आहेत. शास्त्रातील दुसरा भाग जो भौतिकशास्त्राचा त्यात कितीतरी शास्त्रांचा अंतर्भाव होतो. यांना प्रायोगिक शास्त्रेही कोणी कोणी म्हणतात. रसायनशास्त्र, सृष्टिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र-नाना शास्त्रे आहेत. ही सारी शास्त्रे आज काय करीत आहेत? ज्या गोष्टींचा मानवी जीवनाच्या ध्येयाशी अर्थाअर्थी काही संबंध नाही, अशा गोष्टींच्या अभ्यासात ही शास्त्रे रंगून गेली आहेत. ज्या वस्तू केवळ पोकळ जिज्ञासा तृप्त करणा-या आहेत, तसेच ज्या वस्तू चमत्कृतिमय आहेत, आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्या वस्तूंचा उपयोग केवळ वरच्या वर्गातील लोकांच्या फायद्यासाठीच करून घेता येईल-अशा वस्तूंच्या संशोधनात ही शास्त्रे मग्न झालेली आहेत. अभ्यासनीय वस्तूंची ही जी निवड तिचे समर्थन करण्यासाठी शास्त्रासाठी म्हणून शास्त्र, ज्ञानासाठी म्हणून ज्ञान अशी एक कलेच्या मीमांसेप्रमाणेच मीमांसा या शास्त्रज्ञांनी निर्माण केली आहे. कलेसाठी म्हणून कला या विचारपध्दतीचे पर्यवसान सुख देणारी ती कला यात ज्याप्रमाणे झाले, त्याचप्रमाणे शास्त्रासाठी म्हणून शास्त्र या सिध्दांताचे पर्यवसान जे जे फायद्याचे ते शास्त्र यात झाले आहे. ज्याचा अभ्यास केल्याने फायदा होतो ते शास्त्र अशी व्याख्या शास्त्रासाठी म्हणून शास्त्र या गोंडस तत्त्वातून निघाली आहे!