कला म्हणजे काय? 16
फिक्टेच्या पाठोपाठ फ्रेडरिक श्लेगेल व ऍडॅम मुलर हे आले. त्यांनीही सौंदर्याच्या व्याख्या केल्या आहेत. १७७२-१८२९ हा श्लेगेलचा काळ होय. कलेतील सौंदर्याचा अर्थ आपण अर्धवट करतो, एकांगी करतो, असे त्याचे म्हणणे आहे. कलेतील सौंदर्याचा एकत्वाने व संपूर्ण असा अनुभव आपणांस येत नाही. सौंदर्य केवळ कलेतच नसते, तर ते निसर्गात व प्रेमातही असते म्हणून जे खरे सुंदर आहे, ते कला, निसर्ग व प्रेम यांच्या संमीलनातच मिळू शकेल. नैतिक व आध्यात्मिक कला ही ललितकलांपासून अलग करता येणार नाही इत्यादि ह्याची मते आहेत.
ऍडॅम मूलर (१७७९-१८२९) ह्याने सौंदर्याचे दोन प्रकार केले आहेत. सूर्य ज्याप्रमाणे ग्रहांना आकर्षून घेतो, त्याप्रमाणे बहुजनसमाजाला आकर्षून घेणारे जे सौंदर्य-ते सर्वसाधारण सामान्य सौंदर्य होय. हे सौंदर्य विशेषत: प्राचीन कलांतून दिसून येते. सौंदर्याचा दुसरा प्रकार म्हणजे व्यक्तिनिष्ठ सौंदर्य. हे सौंदर्य प्रेक्षकाच्या आत्म्यातूनच निर्माण होते. जणू तो स्वत:च सर्व सौंदर्याला खेचून घेणारा सूर्य बनतो. अर्वाचीन कलेत हे सौंदर्य आहे. जेथे सर्व विरोध विरतात व एक संगीत निर्माण होते, ते परमोच्च सौंदर्य होय. विधात्मक दिव्य संगीताचे आविष्करण प्रत्येक कलावस्तूंत होत असते. जीवनाची कला ही परमोच्च कला होय.
फिक्टे व त्याचे अनुयायी ह्यांचाच समकालीन शेलिंग आहे. १७७५ ते १८४५ हा ह्याचा काळ. अर्वाचीन काळातील सौंदर्यविषयक कल्पनांवर त्याच्या विचारांचा फार परिणाम झालेला आहे. शेलिंगच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वस्तूंच्या कल्पनेची रचनाच अशी करावयाची की दृश्य व द्रष्टा एकरूपच होतील. सान्तांत अनंत पाहणे, सोपाधिकांत निरुपाधिक पाहणे, बध्दांत मुक्त पाहणे म्हणजेच सौंदर्यप्रतीति होय. कलावस्तूंत अनंतत्वाचा अनुभव निरुपादिकत्याचा स्पर्श न कळत झाली पाहिजे. द्रष्टा व दृश्य, जड व चेतन यांचे संमीलन करणे हे कलेचे काम आहे. कला हे ज्ञानाचे परमश्रेष्ठ साधन आहे. कारण जड व चेतन यांना जोडणारा सेतु म्हणजेच कला. वस्तु मूळ स्वरूपात कशा असतील, त्यांचे अंतिम सत्यस्वरूप काय - याचे चिंतन म्हणजेच सौंदर्य होय. कलावान बुध्दीने किंवा कौशल्याने सौंदर्य निर्माण करितो असे नाही, तर त्याच्या मनात जी सौंदर्यविषयक कल्पना असते, ती कल्पना सुंदर कलेला जत्र्नम देत असते.
शेलिंगच्या अनुयायांत विशेष नाव घेण्यासारखा ग्रंथकार म्हणजे सोल्गर हा होय (१७८०-१८१९). त्याच्या मते, सौंदर्याची कल्पना ही सर्व वस्तूंची मुलभूत कल्पना होय. या जगात मुलभूत वस्तूंची विकृत रूपेच आपण पाहतो. परंतु प्रतिभेच्या सामर्थ्याने कला ह्या विकृतरूपांना पुन्हा त्या मूळच्या अव्यंगधामी घेऊन जाते. कला म्हणजे वस्तूंचा पुनर्जन्म, नवनिर्मितीच होय.
शेलिंगचा क्रॉसे म्हणून आणखी एक अनुयायी झाला. १७८१-१८३२. याच्या मते, मूळ कल्पनेला विशिष्ट आकारात प्रकट करणे म्हणजे खरे स्थिर सौंदर्य. मनुष्याच्या स्वतंत्र व अमर्याद विचारप्रांतात जे सौंदर्य असते, त्याचे प्रत्यक्षीकरण म्हणजे कला. जीवनाला सुंदर करणे हे या कलेचे काम. सुंदर मानवाला राहावयास हे जीवन सुंदर करणे-हा कलेचा प्रयत्न असतो.
शेलिंग व त्याचे अनुयायी, ह्यांच्यानंतर हेगेलचे नवमत आले. हेगेलचे मत अनेकजण जाणत वा नेणत मानीत असतात. हेगेलचे विचार पूर्वीच्या विचारांपेक्षा अधिक स्पष्ट व अधिक चांगले आहेत असे नव्हे, तर उलट अधिकच अंधारात चांचपडावयास लावणारे, अधिकच संशयांत नेणारे ते आहेत.
१७७०-१८३१ हा हेगेलचा काळ. हेगेलच्या मते, परमात्मा निसर्गात व कलेत सौंदर्यरूपाने प्रकट होत असतो, तो स्वत:लाच प्रकट करीत असतो. ईश्वर स्वत:ला दोन प्रकारांनी प्रकट करितो. द्रष्टद्यांत व दृश्यांत, आत्म्यात व सृष्टीत - दोन्ही ठिकाणी तो प्रकट होतो. त्या मूळ चिच्छक्तीचे जड वस्तूत प्रकाशणे म्हणजे सौंदर्य होय. जडांत झळकणारी चित्कला म्हणजे सुंदरता. या जगात फक्त आत्मा सुंदर आहे व जे जे आत्म्याचे आहे ते सुंदर आहे. सृष्टिसौंर्द्य म्हणजे आत्मसौंर्द्याचेच ते प्रतिबिंब. जे सुंदर आहे ते आध्यात्मिक आहे. परंतु जे आध्यात्मिक आहे त्याला इंद्रियगोचर व्हावयास आकार घ्यावा लागतो. आत्म्याचे इंद्रियगम्य आविष्करण म्हणजे सुंदर दिसणे होय. सौंदर्यातील खरा अर्थ म्हणजे हे आत्म्यचे दर्शन होय. चैतन्याला, आत्म्याला, बाह्यरूपाने प्रकट करणे म्हणजे कला. परमोच्च आध्यात्मित ज्ञान, गहन अशी सत्ये-मनुष्याच्या बुध्दिक्षेत आणून सोडणारे कला हे एक प्रभावशाली साधन आहे. धर्म व तत्त्वज्ञान ह्याप्रमाणे कलेचाही या कामी फार उपयोग होतो. या कलेच्या साधनामुळे मनुष्याला मानवी जीवनाच्या सागरात उडी घेता येते, ज्ञानांबरांत उड्डाण करता येते.