कला म्हणजे काय? 10
सुंदर हे विशेषण माणसाला, घोडयाला, घराला, एखाद्या देखाव्याला, एखाद्या हालचालीला लावतां येईल. परंतु कृत्यें, विचार, वर्तन, शील इत्यादि गोष्टींस सुंदर शब्द लावता येत नाहीं-रशियन भाषेंत तें बरें दिसत नाही. ज्या गोष्टींनी आपणांस संतोष व आनंद होतो, त्यांना आपण चांगल्या म्हणूं व ज्या गोष्टी संतापदायक आहेत, त्यांना वाईट म्हणूं. जें दृष्टीला सुखविते त्यालाच फक्त सुंदर असें रशियन भाषेंत म्हणतां येतें. ‘सत्’ या शब्दांत सुंदरतेचा अंतर्भाव असतो, परंतु सुंदरतेंत सतचा अंतर्भाव असेलच असें नाही. रशियन सौंदर्याच्या कल्पनेंत सतचा समावेश नाहीं. वस्तूचें बाहय रुप आकर्षक वाटल्यावरुन जेथें तिला आपण चांगली असें म्हणतों-तेथें चांगली याचा अर्थ सुंदर एवढाच असतो. परंतु जेव्हां आपण ती वस्तु सुंदर आहे असें म्हणतो तेथें ती वस्तु चांगली आहे असा त्यांतून बोध निघत नाहीं.
रशियन भाषेंतील सौंदर्य शब्दाचा हा असा अर्थ आहे. लोक आपापल्या भाषानुरुप सुंदर व सत् या शब्दांना विशिष्ट अर्थ देत असतात. या शब्दांतून विशिष्ट भाव प्रकट करीत असतात.
कलेचें मुख्य स्वरुप म्हणजे सौंदर्य-हें तत्त्व ज्या ज्या देशांत प्रचलित आहे त्या त्या सर्व देशांच्या भाषांतून सौंदर्य हा शब्द मुख्यत्वेंकरुन रुपालाच उद्देशून योजितात. त्या भाषांतून सौंदर्यानें रुपाचाच बोध विशेषेंकरुन होतो. परंतु असें जरी असले तरी सुंदर या शब्दानें त्या भाषांतून सत्यं शिवं चाहि अर्थ प्रकट केला जात असतो. त्या अर्थीहि हा शब्द वारंवार वापरण्यांत येत असतो. सौंदर्यवाचक शब्द सत्-शब्दाचे पर्यायवाचकच झाले आहेत असें म्हणाना.
हया सर्व भाषांतून सुंदर कृत्य असा प्रयोग हमेशा करण्यांत येत असतो व तो कोणाच्या कानाला कटु लागत नाहीं. हया भाषेंतून ज्या शब्दानें केवळ आकार सौंदर्य संबोधिले जाईल असा शब्दच उरला नाहीं ! आणि म्हणूनच “पहावयास सुंदर” अशाप्रकारचे शब्दप्रयोग आकारसौंदर्य, रुपसौंदर्य यांची कल्पना आणून देण्यासाठीं वापरावे लागतात.
रशियन भाषा व इतर भाषा यांच्यामध्यें सौंदर्य व सुंदर या शब्दांना जे भिन्न भिन्न छटांचे अर्थ प्राप्त झाले आहेत, ते पाहिले म्हणजे असें स्पष्ट दिसून येंतें की रशियेतर सर्व राष्ट्रांत- जी राष्ट्रें सौंदर्य म्हणजे कलेचा प्राण असें मानतात अशा सर्व राष्ट्रांत-सौंदर्य या शब्दानें ‘सत्’ चाहि अर्थ प्रतीत होतो. हया देशांत सौंदर्य शब्दालाविशेष अर्थ प्राप्त झालेला आहे. ‘सत्’चाहि अंतर्भाव त्यांत झाला आहे.
परंतु यूरोपांतील इतर देशांचे कलाविषयक विचार रशियांतहि रुढ होत असल्यामुळें, रशियन भाषेंतहि सौंदर्य शब्दाची उत्क्राति होत आहे ही विशेष गोष्ट होय. ‘सुंदर संगीत’ ‘कुरुप कृत्यें’ एवढेंच नव्हे तर सुंदर व कुरुप विचार असे शब्दप्रयोग कांहीएक आश्चर्य न वाटतां रशियन लेखक बिनधोक करीत आहेत. ४० वर्षापूर्वी ज्या वेळेस मी तरुण होतों, तेव्हां सुंदर संगीत, कुरुप कृत्य वगैरे शब्दप्रयोग दुर्मिळ होते, एवढेंच नव्हे तर दुर्बोधहि होते. युरोपीय विचारानें सौंदर्य या शब्दाला जो नवीन अर्थ दिला आहे, तो रशियन समाजाच्याहि अंगवळणी पडत आहे, पचनीं पडत आहे.
सौंदर्य शब्दाचा हा जो अर्थ युरोपियन राष्ट्रें करतात, तो अर्थ तरी नीट आहे काय ? त्या अर्थाचें तरी स्वच्छ व स्पष्ट रुप काय?