कला म्हणजे काय? 1
प्रकरण पहिलें
[कलेसाठी खर्च होणारा काळ - कलेसाठी घेतले जाणारे श्रम - कलेच्या सेवेंत मातीमोल होणारीं मोलवान जीवनें - कलेसाठी नीतीचें बलिदान- एका संगीत तमाशाचें वर्णन.]
कोणतेंहि वर्तमानपत्र किंवा मासिक घ्या. त्यांत रंगभूमि व संगीत यांना थोडी तरी जागा दिलेली आढळेलच. प्रत्येक अंकांत एखाद्या विशेष चित्राचें किंवा एखाद्या कलात्मक प्रदर्शनाचें वर्णन तुम्हांला दिसून आल्याशिवाय राहणार नाहीं. कलात्मक नवीन कृतींवर अभिप्राय, कविता, लघुकथा, नवलकथा- इत्यादींवर अभिप्राय त्या अंकांतून तुम्हांला सदैव वाचावयास मिळतील.
एखादें नवीन नाटक रंगभूमीवर येण्याचाच अवकाश, कीं ताबडतोब त्या नाटकांत कोणी कोणती भूमिका कशी वठववली, एकंदरींत प्रयोग कसा झाला, नाटकाचे गुणदोष काय, त्यांतील संविधानक काय या गोष्टींसंबंधीं साग्र चर्चा वर्तमानपत्रांत तुम्हांला वाचावयास मिळेल. गायनाच्या जलशांत एखाद्या गवयाने गाणें कसे सुंदर म्हटलें, त्यानें हावभाव, हातवारे कसे केले, आलाप किती घेतले, ताना कशा घेतल्या हें सारें साद्यंत वर्तमानपत्रांत वाचावयास मिळेल. जसें गाणा-यासंबंधीं तसेंच वाजविणा-यासंबंधींहि वर्णन यावयाचें. प्रत्येक मोठया शहरांत नवीन चित्रांचे प्रदर्शन वर्षांतून एकदां तरी भरत असतेंच. त्या प्रदर्शनांतील चित्रांच्या गुणदोंषांचें बारीकसारीक विवेचन टीकाकार वर्तमानत्रांतून करावयाचे व मग चर्चा बराच काळ चालावयाची.
असा एकहि दिवस सुना जात नाहीं कीं ज्या दिवशीं नवीन कविता, नवीन कादंबरी, नवीन गोष्ट स्वतंत्रपणें किंवा मासिकांतून प्रसिध्द होत नाही. या कलाप्रसूतीची साद्यंत हकीगत गुणदोषविवेचनासहित देणें, प्रव्यहीं होणा-या या कलानिर्मितीची छाननी करणें हें आपलें कर्तव्य आहे असें वर्तमानपत्रें मानीत असतात.
रशियांत कलेला उत्तेजन देण्यासाठी लक्षावधि रुपये सरकार खर्च करीत असतें. निरनिराळया रंगभूमींना, संग्रहालयांना, प्रदर्शनांना, कलाधामांना सरकारांतून पैशाचें साहाय्य मिळत असतें. (सर्व लोकांना साक्षर करावें म्हणून याच्या शतांशहि खर्च करण्यांत येत नाहीं.) फ्रान्समध्यें दरसाल २ कोटि फ्रँक कलेला उत्तेजनार्थ म्हणून बाजूला काढून ठेवण्यांत येत असतात. अशाच प्रकारच्या सरकारी मदती जर्मनी व इतर सर्व प्रमुख देशांतून दरसाल देण्यांत येत असतात.
प्रत्येक मोठया शहरीं कलासंवर्धनसाठीं म्हणून उभारलेल्या भव्य व टोलेजंग इमारती दिसतील. कोणत्याहि मोठया शहरांत जा. तेथें संग्रहालयें, अजबखाने, नाटकगृहें, कलाधामें, गायनवादनसमाज, नृत्यगृहें दिसून येतील. सुतार, गवंडी, चित्रकार, रंगारी, शिंपी, न्हावी, धोबी, जवाहिऱ्ये शेंकडों प्रकारचे व धंद्याचे लोक आपली जीवनेंच्या जीवनें कलांसाठी लागणा-या साहित्याच्या निर्मितीत खर्च करीत असतात. एक लष्कर वगळलें तर दुस-या कोणत्याहि इतर मानवी कार्यक्षेत्रांत इतकी शक्ति व इतका उत्साह यांची उधळपट्टी होत नसेल.